आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येस... वुई आर गिल्टी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्यास ठेच मागचा शहाणा... असा एक वाक्प्रचार आहे. देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती पाहता येथे समस्त बहिरे, आंधळे राहतात असेच म्हणायची वेळ आली आहे. कारण पुढच्याला अनेक ठेचा लागल्या तरी बँकिंग क्षेत्राला त्याचे काही देणे-घेणे नाही. गेल्या दशकभरात वर्षाकाठी दोन-चार खासगी बँकांचे, एखाद्या सरकारी बँकांतील घोटाळे समोर येत आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकांशी संबंधित ६८०० हून अधिक गैरव्यवहारांची प्रकरणे आणि त्यात ७१,५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अलीकडच्या काळात बँकांतील घोटाळ्यांच्या रकमेत ७३ टक्के वाढ झाल्याची माहिती खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेनेच दिली होती. एवढेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ११ आर्थिक वर्षात एकूण ५३,३३४ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यात २.०५ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने वर्षापूर्वी ही माहिती दिली होती. त्यानंतरचे घोटाळे यात नाहीत. कधी हर्षद मेहता येतो, कधी नीरव मोदी तर कधी विजय मल्ल्या येऊन फसवतो. कधी पीएनबी तर कधी पीएमसी आणि आता येस बँक. वर्ष बदलते, स्वरूप बदलते, नावे बदलत राहतात, मात्र घोटाळे होतच राहतात. मग सरकार खडबडून जागे झाल्याचा आव आणते, सामान्य ठेवीदारांच्या हितासाठी धावपळीला सुरुवात होते. येस बँकेच्या बाबतीतही हेच घडले. आपापले हित जपू, सगळे नातेवाईक मिळून खाऊ, अशी जणू प्रथाच पडली आहे. येस बँकेच्या आधी आयसीआयसीआय बँकेतही हेच घडले. आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यांत आपल्या कुटुंबाच्या हितासाठी बँकेतील सर्वेसर्वा असणारी व्यक्ती अहोरात्र झटत असल्याचे समोर आले. येस बँकेतही हेच घडले. राणा कपूर यांनी आपले साडू अशोक कपूर यांच्यासह १७ वर्षांपूर्वी ही बँक स्थापन केली. अशोक कपूर यांच्या मृत्यूनंतर येस बँकेची सर्व सूत्रे राणा यांच्या हाती आली. त्यांनी याचा पुरेपूर फायदा उठवत आपल्या कुटुंबाची झोळी खचाखच भरली. त्यासाठी त्यांनी मनमानी पद्धतीने कर्ज वाटप केले. सीबीआयने आता त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र हा घोटाळा एप्रिल ते जून २०१८ या काळात सुरू झाला. त्या वेळी डीएचएफएल ही गैरव्यवहाराने बरबटलेली गृहवित्त पुरवठादार कंपनी येस कंपनीच्या दारी आली. राणा कपूरला जणू सावजच भेटले. मग राणा यांनी पद्धतशीरपणे हा मासा गळाला लावला. येस बँकेने डीएचएफएलमध्ये ३७०० कोटी रुपये गुंतवले. त्याबदल्यात डीएचएफएलचे प्रवर्तक व संचालक कपिल वाधवान यांनी राणा यांच्या डू इट अर्बन व्हेंचर्सला अवैधरीत्या ६०० कोटी रुपये दिले. डू इट अर्बन व्हेंचर्समध्ये राणांच्या कन्या रोशनी, राधा आणि राखी यांची १०० टक्के हिस्सेदारी आहे. कमी मूल्य असलेल्या संपत्तीच्या आधारे राणा यांना हे कर्ज देण्यात आले होते. तत्पूर्वी येस बँकेने अनिल अंबानी समूह, आयएलअँडएफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर आदी कंपन्यांना कर्ज दिले. यापैकी काही कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आणि येस बँक गोत्यात आली. आता सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय राणा व त्याच्या कुटुंबाच्या मागे लागली आहे.  ही झाली घोटाळ्याची कथा. आता सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात की, गेल्या तीन वर्षांपासून आमची येस बँकेवर नजर होती. सरकारची नजर किती तीक्ष्ण आहे, हेही या निमित्ताने समोर आले. अशा आंधळ्या सरकारने आता येस बँक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एसबीआय आणि एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी येस बँकेत पैसे ओतावेत, असा सरकारचा सूर आहे. एसबीआय आणि एलआयसी या तुमच्या-आमच्या पैशांनी चालतात. या घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नसताना, आपले पैसे मात्र एखाद्याला वाचवण्यासाठी द्यायचे. हा तर सरळसरळ सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडाच म्हणावा लागेल. आपण सर्व ‘अर्थ’ निरक्षर असल्याचा हा परिणाम आहे. सरकारच्या अशा धोरणाविरुद्ध आपण आवाजच उठवत नाही. किंबहुना सर्वसामान्यांना अार्थिक समीकरणे कळेपर्यंत दुसरा कोणीतरी राणा, नीरव मोदी, हर्षद मेहता, विजय मल्ल्या देश बुडवण्यास सज्ज झालेले असतात. सर्वसामान्यांच्या कच्च्या अर्थगणिताचा फायदा ही मंडळी उठवत आहेत. यात दोषी आपणच आहोत. म्हणूनच म्हणावे वाटते की, येस... वुई आर गिल्टी!

बातम्या आणखी आहेत...