आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीर्घ प्रतीक्षेतला ‘पाकिजा’...

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील करार म्हणजे बॉलीवूडमध्ये गाजलेला व अनेक वर्षे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेला चित्रपट ‘पाकिजा’, असा गमतीशीर उल्लेख परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला. ‘पाकिजा’ या बॉलीवूडच्या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती १९५६ मध्ये सुरू झाली. त्याचे अनेक ट्रेलर पडद्यावर आले. पण चित्रपट पडद्यावर यायला १६ वर्षे लागली. फेब्रुवारी १९७२ मध्ये ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. तीच अवस्था अमेरिका-तालिबान कराराची आहे. गेली अनेक वर्षे करार होणार असल्याचा गाजावाजा होतोय. अमेरिका गेली १९ वर्षे अफगाणिस्तानमध्ये तालिबान व इतर दहशतवादी गटांशी युद्ध करते आहे. तेव्हापासून समझोत्याच्या गोष्टी येणारे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष करतच होते. डोनाल्ड ट्रम्पदेखील वारंवार कराराची भाषा करायचे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतला हा करार शनिवारी अस्तित्वात आला. राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवण्यापूर्वी ट्रम्प यांना या करारास मूर्त रूप द्यायचे होते. ते दोहा येथील कराराने साध्य झाले. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी न्यायचे. त्याचबरोबर अफगाणिस्तानची सीमा सुरक्षा, दहशतवादासाठी अफगाणी जमिनीचा वापर अतिरेक्यांना करू न देणे, याबाबत स्वतंत्र बोलणी १० मार्चपासून होणार आहेत. अफगाणिस्तानामध्ये शांतता प्रस्थापित होणे, तेथील लोकशाही, मानवाधिकार, महिलांचे अधिकार या मुद्द्यांवर चर्चा व्हायची आहे. ज्यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये तालिबान्यांच्या पाडावानंतर अफगाणिस्तानात सैन्य पाठवले, त्याबाबतचे निर्णय अजून झालेले नाहीत. दहशतवादासाठी अफगाणिस्तानचा वापर करू देणार नाही, असा शब्द तालिबान अमेरिकेला देते. स्थिती अशी आहे की, दिलेल्या शब्दाची पूर्तता तालिबान करू शकत नाही. शब्दपूर्तीबाबत अमेरिका व भारतातही शंका घेतली जाते. तरीदेखील अमेरिकेने अफगाणिस्तान तालिबान्यांकडे सोपवण्याची तयारी कशी दाखवली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही पद्धतीने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नूतन राष्ट्राध्यक्ष घनी यांचे सरकार सत्तेवर आले. या नव्या सरकारचे काय करायचे याचाही मागमूस सध्या कोणाला नाही. पण सैन्य माघारीचे वेळापत्रक मात्र ठरले आहे. सगळे अर्धे-कच्चे असताना करार करण्याची घाई ट्रम्प यांना झाली होती ती तेथील निवडणुकांमुळेच. त्यामुळे जगातला दहशतवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना निवडणूक प्रचारासाठी एक मोठा मुद्दा मिळाला. हा करार घडवून आणण्यात पाकिस्तानची मध्यस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिकेचे सहयोगी देश वा व्यक्तींवर दहशतवादी हल्ला न करण्याचा शब्द तालिबानने दिला आहे. अमेरिकेच्या सहयोगी देशांमध्ये भारताचा समावेश आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. भारताची यावरची प्रतिक्रिया सावध आहे. भारतीय सीमेलगतच्या अफगाणिस्तानामध्ये काय चालते ही भारतासाठी नेहमीच काळजीची गोष्ट आहे. एकीकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या ‘आयएसआय’च्या दहशतवादी कारवाया, बांगलादेशातून भारतात घुसू पाहणाऱ्या रोहिंग्यांचा दबाव, या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हाती जाणे ही भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...