आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्र देते, ‘कर्म’ नेते! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे महाराष्ट्राचे वर्णन केले जाते. राज्यातील अवर्षणप्रवण म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा, काही प्रमाणात विदर्भ, सोलापूर व नगर जिल्ह्यातील भागाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते. तर अशा या दगडांच्या देशात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे अंक सध्या सुरू आहेत. तसे हे प्रयोग या राज्यासाठी नवे नाहीत. २००३ -०४ मध्ये बारामती परिसरातून या प्रयोगाला सुरुवात झाली. त्यासाठी त्या वेळी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रयोगातून त्या वेळी एक ते सहा मिमी पाऊस पडल्याचे सांगतात. तसे पाहिले तर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलियात १९४७ च्या सुमारास. टँकरवाडा अशी ओळख झालेल्या मराठवाड्यात सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. यंदा कृत्रिम पावसासाठी सरकारने ३० कोटींची तरतूद केली आहे. यावर्षीच्या या प्रयोगासाठी सोलापूर आणि अौरंगाबाद येथे नियंत्रण केंद्रे आहेत. यंदाच्या या प्रयोगाच्या नमनालाच माशी शिंकली. जुलैमध्ये सरकारी अधिकारी, मंत्री प्रयोगाच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करत राहिले आणि मान्सूनचे ढग मराठवाड्याला हुलकावणी देत निघून गेले. कसे तरी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून या प्रयोगाला मुहूर्त लाभला. मराठवाड्यात आतापर्यंत दोन वेळा या प्रयोगाची विमाने उडाली. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागल्याचे दिसत नाही. २०१५ मध्ये नाशिक आणि औरंगाबाद परिसरात झालेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगातूनही हाती काही लागले नव्हते. तेव्हा औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयावर रडारही लावले होते. ते नंतर काढून घेण्यात आले. मुळात या प्रयोगासाठी योग्य ढग आण योग्य वेळी त्यात फवारणी महत्त्वाची असते. त्यात मान्सूनचा पाऊस बेभरवशाचा. त्यामुळे जूनपासूनच या भागात असे प्रयोग झाले तर योग्य त्या ढगांची उपलब्धता वाढून प्रयोग यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल. मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि नगर जिल्ह्याचे भाैगोलिक स्थान पाहता कायमस्वरूपी अशी यंत्रणा त्या त्या भागात स्थापन करणे व प्रयोगास अनुकूल स्थिती असताना विमान उड्डाण करणे हे या प्रयोगासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, हे शास्त्रीयदृष्टया महत्त्वाचे प्रयोग शासकीय शास्त्राप्रमाणे चालवले जात आहेत. हवामान बदलाच्या या काळात अशा प्रयोगांची सातत्याने गरज भासणार आहे. विशेषत: राज्यातील मराठवाड्यासारख्या पर्जन्यछायेत येणाऱ्या भागासाठी अशा प्रयोगाची आवश्यकता भासणार आहे. अशा वेळी हे प्रयोग यशस्वी कसे होतील याकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणे अत्यंत गरजेचे असताना वर्षानुवर्षे अंगात भिनलेल्या सरकारी मनोवृत्तीतून हे प्रयोग चालवले जात आहेत. पैशाची तरतूद ते आवश्यक परवानग्या यातच निम्मा पावसाळा घालवणे आणि नंतर योग्य ते ढग नसल्याने प्रयोग यशस्वी न होणे, हेच आजवरच्या राज्यातील प्रयोगांनी सिद्ध केले आहे. जोपर्यंत हे प्रयोग शासकीय शास्त्रानुसार होतील तोपर्यंत हाती काहीच लागणार नाही, गरज आहे ती सरकारी मनोवृत्ती टाळून वैज्ञानिक दृष्टी बाळगण्याची.

बातम्या आणखी आहेत...