Home | Editorial | Agralekh | divyamarathi editorial on BJP fighting in amalner

'पार्टी विथ डिफरन्सेस'

संपादकीय | Update - Apr 12, 2019, 09:54 AM IST

'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भाजपचे रूपांतर सध्या 'पार्टी विथ डिफरन्सेस'मध्येच झाल्याचे म्हणावे लागेल

  • divyamarathi editorial on BJP fighting in amalner


    चैत्रातील उन्हाचा कडाकाही सौम्य भासावा एवढे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना त्या पक्षात जशी लहानमोठ्या कारणांवरून सतत साठमारी चालायची तशीच काहीशी स्थिती सध्या सत्तेच्या सावलीला चटावलेल्या भाजपमध्ये पाहावयास मिळते. अमळनेरमध्ये बुधवारी भाजपच्या मेळाव्यात झालेला राडा त्याचाच प्रत्यय देतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक अशी ख्याती मिळवणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने थेट व्यासपीठावरच माजी आमदाराच्या श्रीमुखात भडकावली. एवढेच नव्हे, तर उभय गटांच्या समर्थकांमध्ये लाथाबुक्क्या आणि गुद्दागुद्दीचा दे दणादण 'लाइव्ह शो' त्यानंतरही सुरूच होता. परिणामी, 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भाजपचे रूपांतर सध्या 'पार्टी विथ डिफरन्सेस'मध्येच झाल्याचे म्हणावे लागेल.

    राजकारण आणि त्यातही निवडणुकीचा हंगाम म्हटला की मतभेद, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप हे आलेच. दोन भिन्न पक्षांमध्ये तसे होणे अपेक्षितही असते. मात्र, सध्या इतर पक्षांमध्ये मोठा मित्रपरिवार आणि स्वपक्षातील सहकाऱ्यांमध्ये अंतर्गत इर्षा असे चित्र जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये पाहावयास मिळते. त्यातही जो पक्ष सत्ताधारी असतो त्यामध्ये सत्तापदांवरून हेवेदावे जास्त प्रमाणात असतात. केंद्रात आणि राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आलेल्या भाजपमध्ये आयारामांची जी रांग लागली आहे आणि पक्षभेद, विचारभेद बाजूला सारून भाजपही सर्व स्तरांतील ज्या गणंगांना स्वपक्षात घेऊन पावन करून घेत आहे ते पाहता असे घडणे अपेक्षितच होते. अमळनेरमध्ये झालेल्या हाणामारीला जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कट करत आमदार स्मिता वाघ यांना प्रथम तिकीट जाहीर होणे आणि अगदी शेवटच्या क्षणी वाघ यांनाही डावलून गिरीश महाजन समर्थक आमदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी अधिकृत होणे ही पार्श्वभूमी कारणीभूत आहे. अर्थात, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अमळनेरमध्ये झालेला राडा हा तर केवळ ट्रेलर असून खरा पिक्चर तर अजून बाकीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेष म्हणजे, एरवी साधन शुचितेच्या गप्पा मारणाऱ्या, पक्षनिष्ठेचे दाखले देणाऱ्या आणि 'काँग्रेसी संस्कृती'ची खिल्ली उडवणाऱ्या भाजपमध्येच आज सर्वाधिक बंडाळी आणि अंतर्गत असंतोष दिसून येत आहे.

    भाजपने गेल्यावेळी लोकसभेत एकहाती सत्ता संपादल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जणू सत्ता हे साधन नसून साध्य आहे या पद्धतीने 'नेटवर्किंग'ला सुरुवात केली. त्यातूनच शहा यांनी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे पक्ष विस्तार आणि वाढीचे उद्दिष्ट ठेवले. राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनीही तोच कित्ता गिरवत मग कशाही पद्धतीने पक्ष वाढ आणि विरोधकांचे खच्चीकरण हाच एकमेव उद्देश समोर ठेवून धोरणे आखायला सुरुवात केली. त्यातून पक्षाच्या यशाचा आलेख तात्पुरता चढता राहिला. मात्र, कुठलाही आलेख एका विशिष्ट बिंदूनंतर खालच्या दिशेनेच झुकतो या नियमाची जाणीव अमळनेरमधल्या 'लात की बात'मुळे आता भाजपच्या धुरिणांना व्हायला हरकत नसावी.

Trending