आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मेगामरगळ! (अग्रलेख)

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

आजपासून अवघा महिना-सव्वा महिना हातात आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता १९ सप्टेंबरला होतेय. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा तत्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यापासून १४८ मतदारसंघांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचा प्रचार रथ चौखूर उधळत निघाला आहे. त्याला लगाम घालण्याची जबाबदारी असलेल्या विरोधकांची मात्र पक्षातील शिलेदारांनी नाचक्की केली आहे. लढाई तोंडावर आली. खंगलेल्या अर्थव्यवस्थेचे चटके जनतेला बसू लागले आहेत. आणि अशा परिस्थितीत ज्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकायचं ते विरोधी पक्षातील सरदारच सत्ताधाऱ्यांना शरण जात आहेत. सैरभैर सैन्य आणि हतबल सेनापती अशा विरोधकांच्या केविलवाण्या अवस्थेमुळे राज्यातील जनतेची घोर निराशा झाली आहे. राष्ट्रवादीचे कोणते नेते भाजपच्या वाटेवर आहेत आणि काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला याशिवाय दुसऱ्या बातम्या नाहीत. दर दिवशी नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची जणू साथच आली आहे. आपापले सुभे सांभाळण्यासाठी रात्रीत रंग बदलणाऱ्यांचा हा आजार नवीन नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड जुनीच. यावेळचा संसर्ग आणि फैलाव अधिक जीवघेणा आहे, तरी विरोधकांचे नेते आपल्या सरंजामी कोषातून बाहेर येत नाहीत हे चित्र खरोखरच दुर्दैवी आहे, असे म्हणता येईल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा आजार मोठ्या प्रमाणात बळावला आणि विधानसभेच्या तोंडावर चांगलाच चिघळला आहे. या आजाराची मूळ कारणे शोधून त्यावर उपाय करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते विरोधी नेतेच गलितगात्र होणे हा विरोधकांनी स्वत:चाच केलेला पहिला पराभव आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या साथीचे वर्णन करताना ‘ही मेगाभरती’ नव्हे, शक्तिसंचय आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचेही ब्रँडिंग केले आहे. भाजपमधील या मेगभरतीमागील कारणे काहीही असो, पण  या संचयाने सत्ताधाऱ्यांची ‘शक्ती’ निश्चितच वाढली आह. यासोबतच विरोधकांमधल्या ‘गळती’ने लोकशाहीसमोरील धोका गहिरा केला आहे. डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ आली तरी एकमेकांचे पाय ओढण्याची, एकेक जागेसाठी आडून बसण्याची राजकीय नेत्यांमधील खोड कायम आहे. काँग्रेसची ‘पोलखोल’ यात्रा विदर्भापुरती सीमित झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेला पक्षातील नाराजांनी गालबोट लावलं आहे. एकूणच, महाराष्ट्रात सुरू असलेली ही प्रक्रिया म्हणजे फक्त विरोधकांचा शक्तिपात नाहीये तर लोकशाहीचा आत्मघात आहे.