आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा चंद्र जगाला लावी पिसे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील आबालवृद्धांना वेड लावणाऱ्या चंद्रावर पहिले मानवी पाऊल पडले, ते २० जुलै १९६९ राेजी. चंद्रावर माणूस जाऊन आलेला असला, तरी त्याचा वेध घेणे सुरूच आहे. आजवर अमेरिका, रशिया, जपान, युरोप, चीनपाठाेपाठ भारतानेही चांद्रमोहिमा फत्ते केल्या. अर्थात, चंद्राची निर्मिती कशी झाली, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी तेथे गेलेल्या मानवरहित यानांनी नवी महत्त्वपूर्ण तथ्ये जगासमाेर आणली. ‘चांद्रयान-१’ने चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या अंशांचे अस्तित्व जसे सर्वप्रथम जगासमाेर आणले, तसेच चंद्रावर आजही हादरे बसतात हेदेखील समजावले. ‘क्लेमेंटाइन’मुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे स्वरूप कळले, आणि त्या ठिकाणी पाणी असण्याची शक्यता सुस्पष्ट झाली. ‘प्रॉस्पेक्टर’ने चंद्राच्या जमिनीजवळील चुंबकीय क्षेत्राचा नकाशा बनवला. चीनचे ‘चँग ई ४’ हे यान प्रथमच चंद्राच्या अदृश्य (पृथ्वीवरून न दिसणाऱ्या) भागावर उतरले. एकंदरीत, या माेहिमांच्या माध्यमातून चंद्राविषयीचे अनेक पैलू आपणास ज्ञात झाले. अल्पखर्ची आणि जीवितहानीचा धोका टाळणाऱ्या रोबोटिक मोहिमा या वैज्ञानिक यशाच्या दृष्टीने मानवी माेहिमांइतक्याच महत्त्वाच्या ठराव्यात. ‘चांद्रयान-२’च्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल, यात यशस्वी ठरला तर ताे जगातील चौथा देश ठरेल. साेमवारी ‘चांद्रयान-२’ची झेप यशस्वी ठरली, त्यासाठी इस्राेची सारी यंत्रणा अभिनंदनास पात्र ठरते. या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहाेचेल, जेथे अद्याप कुणीही गेलेले नाही. चांद्रमाेहिमेने पन्नाशी आेलांडली असली तरी साऱ्या जगाला ‘अपाेलाे ११’ इतकेच ‘चांद्रयान-२’ विषयी कुतूहल आहे. कारण, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवी माहिती जगासमोर येणार आहे. एकंदरीत, भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी चंद्र हा तळ ठरू शकतो, आणि तेथील वेधशाळा विश्वाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच बहुधा साऱ्या जगाला चंद्राची आेढ लागली असावी. 


चांद्रमाेहिमांचा कार्यक्रम पाहता चंद्रावर माणूस पाठवण्याची स्पर्धा पुन्हा जोर धरेल, असे दिसते. चीनने २०३५ पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी चालवली आहे, तर अमेरिका पुन्हा चंद्रावर पाऊलखुणा उमटवण्याच्या बेतात आहे. ‘अपोलो’ची बहीण ‘आर्टेमिस’चे नाव बहुधा या माेहिमेला दिले जाईल, आणि २०२८ पर्यंत अमेरिकी पाऊल पुन्हा एकदा चंद्रावर पडेल. दरम्यान, अमेरिकी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी तर २०२४ पर्यंत पुन्हा चंद्रावर पाेहाेचू असे घाेषित केले आहे. अंतराळ अभियंता रॉबर्ट झुब्रिन यांच्या विधानातील तथ्य लक्षात घेतले तर कदाचित, युरोपीय संघातील देशांच्या मदतीने अमेरिका चंद्रावर संशोधन स्थानक उभारण्याचा प्रयत्नही करेल. मात्र ही स्पर्धा सुरू हाेण्यापूर्वीच भारताचे मानवरहित ‘चांद्रयान-२’ झेपावले. भारतानेे आजवर अंतराळ संशाेधकांना सत्तास्पर्धेपासून दूर ठेवण्यासाेबतच, अंतराळशास्त्रातील प्रगतीचा वापर आधी उपग्रहांसाठी करण्याचा आदर्श पायंडा पाडला. कदाचित हा पायंडा माेडण्याचा प्रसंग येत्या दशकात भारतासमाेर उभा राहू शकताे. त्या वेळी आपली अंतराळशास्त्रातील प्रगती ही निकोप राहील, याकडे लक्ष देणे ही भारतीय अंतराळ धोरणांची कसोटी ठरेल हे निश्चित.

बातम्या आणखी आहेत...