आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील विसंवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


साधारण ५६ पक्ष-संघटनांची महाआघाडी स्थापन करत काँग्रेस व राष्ट्रवादीने युतीसमोर आव्हान उभे केले आहे. शनिवारी मुंबईत दणक्यात महाआघाडीचे नेते एकमेकांचे हात वर करून 'हम सब एक हैं'च्या थाटात उभे राहिलेले दिसले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, त्यांची महाआघाडी ५६ इंच नव्हे तर त्यापेक्षा मोठ्या छातीचाही पराभव करण्यास समर्थ आहे, असे विधान केले. या कार्यक्रमाचे प्रसंग असे काही वठवण्यात आले होते की काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे, जागा निश्चित झाल्याने उमेदवारांची नावेही निश्चित झाली आहेत आणि आता फक्त प्रचाराला सुरुवात करणे बाकी आहे, असे वाटत होते. प्रत्यक्षात या महाआघाडीच्या घोषणेदरम्यान अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक झाली. या क्लिपमध्ये, 'आपले पक्षात कोणी ऐकत नाही, मीच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा' उद्वेग चव्हाण यांच्याकडून एेकायला मिळाला. चव्हाणांचा उद्वेग होता तो चंद्रपूरमधल्या जागेवरून. त्यांच्या पसंतीचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना डावलून मुकुल वासनिक यांच्या पसंतीचे उमेदवार विनायक बांगडे यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण खवळले होते. या क्लिपमुळे प्रदेशाध्यक्षाने सुचवलेला उमेदवार नाकारून अन्य नेत्याच्या केवळ दिल्ली दरबारातल्या उठबसवर पक्षश्रेष्ठी नतमस्तक होतात, असा एक संदेश राज्यात गेला आणि चव्हाणांपेक्षा काँग्रेसमधील केंद्रीय नेते अडचणीत आले. असे प्रसंग या घडीला काँग्रेसमधील सुंदोपसुंदीला खतपाणी घालणारेच ठरले असते, ही भीती लक्षात घेऊन चव्हाणांच्या कलाने घ्यायचे ठरले व चंद्रपूरचा वाद निवळला. ही सारी पार्श्वभूमी पाहता ५६ इंचांचा पराभव करण्याअगोदर काँग्रेसला स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार अाहेत, हे पुरते स्पष्ट झाले. त्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपसातील विसंवाद, कुरघोडीच्या राजकारणाला विराम दिला पाहिजे, अन्यथा २०१४ ची पुनरावृत्ती फार दूर नाही. 

 

निवडणुकांच्या रणधुमाळीत तिकीटवाटपामध्ये विसंवाद असणे, पक्षाध्यक्षांचे कान भरणे, शह-काटशहाचे डावपेच, लाॅबिंग साऱ्याच पक्षांमध्ये आढळते. काँग्रेसला अशा राजकीय व अराजकीय परिस्थितीचा अनुभव नवा नाही. पण त्यांचे निदान २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुकले, ज्या वेळी देशातील अस्थिरता त्यांच्या मुळावर घाव घालणारी ठरली. या निवडणुकीत काँग्रेस आपल्या विचारधारेपासून दूर गेल्याची दिसले. नेत्यांमधला व जनतेशी अपेक्षित असलेला संवाद तुटलेला दिसला. निवडणुका येताच पक्षीय विचारधारेपेक्षा नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. अनेक काँग्रेस नेत्यांची भाजपला छुपी मदत होती. जणू काही काँग्रेस पक्ष मोदी निवडून येणार अशाच पराभूत मानसिकतेत निवडणूक लढवत होता. ही मानसिकता गेल्या पाच वर्षांत फारशी ओसरलेली नाही. या वेळेस आपल्याला सत्ता मिळणार नाही, पण मोदींचा भाजप २७३ आकडा गाठू शकणार नाही अशा मानसिकतेत ते आहेत. दुसऱ्याचा पराभव त्यांच्या कर्माने होत असेल तर होऊ दे, अशी काँग्रेसची एकूण धारणा आहे. पण यामुळे त्यांच्याच पक्षाची दारुण व करुण अवस्था हाेणार हे स्पष्ट आहे. शनिवारच्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे गैरहजर राहणे हे कशाचे लक्षण आहे? खुद्द अशोक चव्हाण आपल्या पसंतीच्या उमेदवाराला तिकीट मिळाले नाही, म्हणून प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भाषा करताना दिसले. पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे त्यांचे स्वप्न दिल्लीने धुळीस मिळवले खरे; पण त्यांचे सध्याच्या काळातले राज्यातील महत्त्व श्रेष्ठींना अखेर मान्य करावे लागले. पण राज्यातील गटबाजीही पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक अशी आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये उडी मारली आहे, तर औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांचे नाव घोषित होताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा देत स्वत:ची अपक्ष उमेदवारी जाहीर केली. रामटेकमधून मुकुल वासनिक यांच्या नावासही विरोध आहे, तेथे किशोर गजभियेंना तिकीट दिले ते अखेरच्या क्षणी. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांचे नाव रद्द करून काँग्रेस श्रेष्ठींनी चव्हाण यांना दिल्लीच्या राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याकडून लोकसभेत विजयाची अपेक्षा बाळगली. हिंगोलीच्या राजीव सातव यांचा मागील वेळी निसटता विजय झाल्याने या वेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहण्याचा त्यांनी पवित्रा घेतला, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात सनातन संस्थेशी संबंध असलेले नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिल्याने सगळेच चक्रावले आहेत. रत्नागिरीत बांदिवडेकरांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपची कोंडी केली असा युक्तिवाद करता येईल का? राहुल गांधींनी गुजरातमधील सभेत २०१९ची निवडणूक काँग्रेसची विचारधारा विरुद्ध भाजपची विचारधारा अशी राहील, असे स्पष्ट केले. नेमका त्यास हरताळ फासला जाताना पाहायला मिळताे. 
 

बातम्या आणखी आहेत...