आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडत्याचा पाय खोलात... (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायातूनच खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसमधील पेचप्रसंग लोकसभा निवडणुकीतील स्फोटक पराभवामुळे अधिकच गंभीर होतो आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षातल्या काही, तर बाहेरच्या बहुतांश लोकांना ते नाटक वाटले. कार्यकारिणीत राजीनामा स्वीकारला जाणार नाही. मनधरणीनंतर पुन्हा तेच काम पाहतील, असाच कयास होता. ते निर्णयावर ठाम राहिल्याने काँग्रेससमोरील आव्हान अधिकच गंभीर बनले आहे. दिल्लीश्वरांनी राजीनामा दिल्यानंतर गल्लीपर्यंत सर्वांनीच राजीनामा देण्याचे नाटक काँग्रेसमध्ये सुरू झाले. हा कोणीच विचार करत नाही की, राजीनाम्याने होणार काय? ही असली नाटकं करण्यापेक्षा पराभवानंतर डगमगून न जाता नवी उभारणी कशी करता येईल, याचा विचार राहुल गांधींपासून सगळ्यांनी करायला हवा हाेता. एक वर्ष सात महिन्यांच्या अध्यक्षपदानंतर त्यांनी राजीनामा दिला. मुंबईत मिलिंद देवरा तीन महिन्यांतच गळपटले. राजीनाम्यांच्या नाटकापेक्षा खचून न जाता त्वेषाने कामाला लागले पाहिजे. पण फिकीर कोणालाच नाही. 


मध्य प्रदेशात कमलनाथ यांना हटवून भाजप सत्तेवर येण्याची खटपट करते आहे. कर्नाटकात अगोदरच अल्पमतात पण काँग्रेसच्या आधाराने तगून असलेले कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करतेय. आहे ते टिकवण्यासाठीही काँग्रेसला काही करायचे नाही. महाराष्ट्रात निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पण काँग्रेस जिवंत असल्याची चिन्हे लोकांना दाखवायला कोणी जागेवर नाही. कोणती रणनीती नाही. वंचित आघाडी, मनसेसारख्या भाजपच्या विरोधकांना एकत्र कसे आणायचे, याचा विचार नाही. उलट पक्षाच्या वतीने कोणत्याही प्रवक्त्याने चकार शब्द काढायचा नाही, असा फतवा काढला जातो. यातून फायदा होणार की गोंधळ वाढणार? ज्यांच्याशी झगडायचे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तरीतल्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवताहेत. पण काँग्रेसमध्ये वयाेवृद्ध नेत्यांना अध्यक्ष करण्याचा घाट घातला जातोय. काँग्रेसचा पराभव झाला असला तरीही भाजपच्या विरोधातले समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी, पुराेगामी विचारवंत असे सगळेच प्रवाह काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. काँग्रेसपेक्षाही हे प्रवाहच अधिक कार्यक्षम आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र अजूनही हतबलतेमधून बाहेर यायला तयार नाही. काँग्रेससमोर असणारी आव्हाने वेगळी आहेत. असे नेतृत्व उभे करणे, जे पक्षाला एकसंध ठेवेल. भाजपच्या विरोधातील सर्व प्रवाहांना एकत्रित करून सर्वमान्य असा पर्याय उभा करणे की जो मोदी-शहा या जोडगोळीला टक्कर देऊ शकेल. सत्ताधाऱ्यांशी सामना करू शकेल असा प्रबळ विरोधक असेल तरच ती खऱ्या अर्थाने लोकशाही असू शकते. अन्यथा पावले एकाधिकारशाहीच्या दिशेने चाललेलीच आहेत.

बातम्या आणखी आहेत...