आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divyamarathi Editorial On Delhi Election And Ram Mandir Trust

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राम’ भरोसे दिल्ली निवडणूक

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली. त्यानंतर त्या संदर्भात संसदेत भाषणही केले जे टीव्ही वरून दिल्लीसह देशभरात प्रसारीत करण्यात आले. त्या पाठोपाठ अमित शहा यांनी सलग ट्विट करून हा कसा ऐतिहासिक निर्णय आहे हे देशाला समजावून सांगितले. हे सगळे घडले ते दिल्ली विधानसभेसाठीची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना. भाजपला या निवडणुकीत राम पावला पाहिजे, म्हणून मोदी यांनी साधलेले हे ‘टायमिंग’ आहे अशी टीका म्हणूनच विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधार भाजप घेत असला तरी सर्वोच्च न्यायालयाने ऐन दिल्ली निवडणुकीत ही घोषणा करा, असे सांगितलेले नव्हते. त्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा अवधी सरकारला दिला होता. सरकारने ती मुदत संपायला दोनच दिवस शिल्लक ठेवले आहेत. अर्थात, मोदी आणि त्यांच्या भाजपसाठी ही संधी असेल तर ती त्यांनी घेतली यात अाश्चर्य वाटायचेही कारण नाही. इथे भाजपऐवजी दुसरा पक्ष असता तर त्यांनी ही संधी साेडली असती, असेही नाही. तेवढी नैतिकता कोणत्याच पक्षात शिल्लक राहिलेली नाही, हे आजचे वास्तव आहे. स्वच्छ आणि वेगळ्या राजकारणाचा (भाजप प्रमाणेच) गवगवा करून सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कोणती पातळी गाठली आहे हेही आता उघड झाले आहे. शाहीनबागमध्ये मोर्चेकऱ्यांवर गोळीबार करणारा कपिल नावाचा तरूण हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही भाजपला बदनाम करण्याची ‘आप’ची खेळी होती, अशी ओरड भाजपने सुरू केली आहे. काही इलेक्ट्राॅनिक माध्यमे तर भाजपच्याही दहा पावलं पुढे गेली आहेत. हा तमाम हिंदूंना बदनाम करण्याचाच डाव होता, अशीच ‘आरडाओरड’ त्यांच्या चॅनलवरून सुरू आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमित शहा यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. त्याकडे शहा यांनी जशी पाठ फिरवली आहे. थेट पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपने दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, हे केजरीवालांचे आव्हानही भाजपने स्वीकारलेले नाही. त्या बाबत त्या माध्यमांचीही तोंडे बंद आहेत. मागच्या निवडणुकीत किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपने समोर आणले होते. ती मात्रा आपच्या लोकानुनयी घोषणांपुढे फिकी पडली, याचा अनुभव भाजपने घेतला आहे. त्यामुळे तशाच घोषणांवर यंदा भाजपचा जोर आहे. कोण जास्त लोकानुनय करतो याचीच स्पर्धा त्यामुळे दिल्लीत सुरू आहे. वेगळ्या राजकारणाच्या गप्पा मारता मारता आम आदमी पक्षही दाक्षिणात्य पद्धतीच्या लोकानुनयी राजकारणाच्याच पदपथावरून चालू लागला आहे. त्यांच्या ‘मोफत’लाल जाहीरनाम्यातून तेच समोर आले आहे. मतदारांना लाचार करण्याऐवजी सक्षम करण्याकडे या देशाचे राजकारण वळेल, तो सुदिन म्हणायचा. तोपर्यंत  पक्ष ‘राम’ भरोसे आणि मतदारही ‘राम भरोसे’च असतील.