आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची उद्ध्वस्त (धर्म) शाळा! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप अथवा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी जणू चढाओढ लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभेची निवडणूक जशी जवळ येईल तसे विशेषत: भाजपमधील या मेगा भरतीला अधिकच उधाण येत जाईल. गलितगात्र काँग्रेस ही लाट थोपवण्याच्या स्थितीत बिलकुल नसताना दुसरीकडे तिच्या तडाख्याने राष्ट्रवादीच्या गलबतालाही खिंडारे पडू लागली आहेत.


केंद्रात मोदी सरकार पुन्हा सक्षमपणे सत्तारूढ झाल्यापाठोपाठ राज्यातील विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांचा धीर सुटायला लागला. त्याचे कारण अर्थातच तोंडावर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक. वास्तविक लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होईल आणि भाजपला सत्तास्थापनेसाठी इतरांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील, असा भाजप समर्थक सोडले तर सर्वांचाच अंदाज होता. परंतु, प्रत्यक्षात नेमके त्या उलट निकाल आल्याने आणि ठिकठिकाणी एनडीएच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य मिळवल्याने राज्यातील विरोधकांची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. लोकसभेप्रमाणेच भाजप आणि शिवसेना ही निवडणूकही एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांसह सर्वच जण सांगत असल्यामुळे तसे झाले तर आपण वेळीच संधी साधावी, असा रोकडा हिशेब काँगेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींचा आहे. त्यातूनच युतीतल्या ज्या पक्षाच्या वाट्यास जिथली जागा येण्याची शक्यता अधिक आहे, त्या पक्षात आतापासूनच प्रवेश करत आपली सोय लावून घेण्याची राजकीय पर्वणी ही मंडळी साधू पाहत आहेत. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची स्थिती निर्नायकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच त्यातल्या त्यात प्रबळपणे युतीचा मुकाबला करेल, असे वाटत असताना आता काँग्रेसपेक्षाही घाऊकपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या धर्तीपेक्षा राष्ट्रवादीची उभारणी कुटिल राजकारणात माहीर समजल्या जाणाऱ्या पवारांची राजकीय ‘शाळा’ याच तत्त्वावर मुख्यत्वे झाली. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या मातब्बर घराण्यांना सामावून घेत आणि प्रसंगी अशा घराण्यांमधल्या अस्वस्थतेची वाट आपल्याकडे वळवून पवारांनी राष्ट्रवादीची पायाभरणी केली. पक्षस्थापनेनंतर लगोलग राज्याच्या सत्तेत सहभागी होऊन सत्तेतला मोठा वाटाही पटकावला. पवारांनीही कायम स्वपक्षातल्या तसेच अन्य पक्षीयांना आपसात झुंजवत राष्ट्रवादीचा पसारा वाढवत नेला. मात्र, त्यातली बहुसंख्य मंडळी ही आपापल्या टापूमध्ये ‘स्वयंभू’ अाहेत. सत्ताकारणासाठी निष्ठा, विचारसरणी वगैरे सारे खुंटीला टांगून ठेवण्यास कुणी मागेपुढे पाहत नाहीत. शिवाय एवढ्या वर्षांत सत्तापदे उपभोगताना केलेल्या उठाठेवींची भीती मनात अाहेच. परिणामी भाजपची कार्यपद्धती जाणून असलेले अनेक जण आपली कातडी वाचवण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात शिरकाव करत आहेत. ते जाणूनच की काय, निवडणूकपूर्व ‘डॅमेज कंट्रोल’च्या इराद्याने पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर पक्षफोडीचे आरोप केले खरे, पण सध्याची एकूण स्थिती पाहता पक्षांतराच्या सुनामीत राष्ट्रवादीची (धर्म) शाळा उद्ध्वस्त होण्याचीच चिन्हे अधिक दिसतात.