संपादकीय / ‘निसटावंतां’ना दणका


महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक गाजली ती मेगापक्षांतरामुळे

दिव्य मराठी

Oct 26,2019 09:04:00 AM IST

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक गाजली ती मेगापक्षांतरामुळे. राज्याच्या इतिहासात कधी नव्हे एवढे पक्षांतर झाले. विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना भाजपसोबत सत्तेत बसण्याची एवढी घाई झाली की नैतिकतेला फाटा देत, जनतेला गृहीत धरून या नेत्यांनी फक्त ‘सत्तासुंदरी’लाच आपलेसे केले आणि पुढील पाच वर्षे तिच्यासोबत ‘सत्तासंसार’ करण्याची स्वप्नेही रंगवली. मात्र, हे सत्तेचे सोपान देण्याची ताकद ज्यांच्या हाती आहे त्या मतदार राजालाच मात्र ही नेतेमंडळी विसरली. खरे तर यंदाची विधानसभा निवडणूक मतदारांनीच आपल्या हातात घेतली होती.


म्हणूनच केवळ सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या दिग्गजांना याच जनतेने या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, बीडचे जयदत्त क्षीरसागर, नगर जिल्ह्यातील वैभव पिचड, बार्शीचे दिलीप सोपल आदी १७ दिग्गजांना चक्क घरचा रस्ता दाखवत, ‘आम्हाला गृहीत धरू नका’, असा कठोर संदेश या निकालातून जनतेने दिला आहे. यात सर्वात धक्कादायक पराभव हा राष्ट्रवादीतून भाजपत दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांचा झाला. केवळ सत्ताधारी पक्षात जाण्याच्या हट्टासाठी उदयनराजे यांनी अवघ्या पाच महिन्यांत पुन्हा निवडणूक लादली, ते सातारकरांना काही रुचले नाही. एखाद्या नेत्याच्या मनमानी कारभारामुळे सरकारी तिजोरीवर लाखो रुपयांचा बोजा कशासाठी, असा प्रश्न जनतेने मतदानातून विचारला आणि त्यांनाही घरचा रस्ता दाखवला. एकीकडे इनकमिंग वाढवतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या धुरीणांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे खच्चीकरण केले, हेही जनतेला पटलेले दिसत नाही.


तसेच जनतेशी नाळ तुटलेल्या, मतदारसंघात संपर्क न ठेवणाऱ्या व विकासाच्या केवळ गप्पा मारणाऱ्या मंत्र्यांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पंकजा,मुंडे, प्रा. राम शिंदे, अर्जुन खोतकर, अनिल बोंडे या मंत्र्यांचा पराभव त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले राज्यमंत्री परिणय फुके यांचा पराभव हा खुद्द देवेंद्र फडणवीसांचाच पराभव मानला पाहिजे. उद्या राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार असली तरी गेली पाच वर्षे अहंकारात वावरणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना जनतेने या निकालातून चांगला धडा देत पुढील पाच वर्षे सुधारण्याची संधी दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गेली १५ वर्षे सत्तेच्या उन्मादात मश्गुल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही २०१४ मध्ये याच जनतेने धडा शिकवून आत्मपरीक्षणाची संधी दिली होती. सध्या भाजप सरकारविरोधात असंतोष असला तरी प्रतिस्पर्धी आघाडीच्या नेत्यांनी तेवढी विश्वासार्हता न मिळवण्याने सत्ता सोपवण्याएवढे त्यांना जनतेने पात्र समजले नाही. मात्र, सक्षम विरोधी पक्ष म्हणून कामगिरी करण्याची संधी जनतेने या दोन्ही पक्षांना दिली आहे, ते ही जबाबदारी किती प्रामाणिकपणे पार पाडतात, यावरच त्यांचे भवितव्य असेल.

X
COMMENT