आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजलेल्या जखमांनी पोळलेला चेहरा घेऊन मालती म्हणते, अॅसीड मुझ पे फेका है, तुम पे नही... छपाक सिनेमात चितारलेलं लक्ष्मी अग्रवालचं ते भेसूर दु:ख अहिंसेचा संदेश देणाऱ्या बापूंच्या भूमीत पेट्रोलच्या ज्वाळा बनून प्रत्येकाच्या श्वासनलिकेपर्यंत भगभगत पोहोचलं. एकतर्फी प्रेमाची (इथे ‘प्रेम’ हा शब्दच गैरलागू ठरतो खरं तर) पहिला बळी ठरलेल्या रिंकू पाटीलच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी हिंगणघाटच्या पीडितेचा जन्म झाला. ती शिकली, मोठी झाली, शिकवू लागली. पण तीस वर्षांनंतरही ती अघोरी मानसिकता कणभरही बदलली नाही. या हल्ल्यात फक्त पीडितेचे डोळे, नाक, कान जळालेले नाहीत तर संवेदनशील समाजाचेच अवयव बधीर झालेत. त्या भीषण दृष्याने डोळे मिटले, पेट्रोलच्या धुरानं श्वास कोंडले आणि किंकाळ्यांनी कान फुटले तरच माणूस म्हणवून घेण्यास आपण पात्र ठरू. अन्यथा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालेल, आरोपीला कठोर शिक्षा होईल, तिच्या उपचारांचा खर्च सरकार करेल, सभागृहांमध्ये चर्चा होतील, रस्त्यावर आंदोलनं होतील. पण पुन्हा अशी वेळ कोणत्याही रिंकूवर, विद्यावर,अमृतावर किंवा लक्ष्मीवर येणार नाही याची शाश्वती कुणीच देऊ शकणार नाही, हाच या समाजाचा पराभव आहे. ‘छपाक’ चित्रपटातील वकील न्यायालयात मांडते, असे हल्ले झालेल्या मुलींमध्ये एक समान धागा आहे- ‘ये पढाई चाहती थी, या बढाई चाहती थी...’ हिंगणघाटच्या पीडितेची आई विचारते, माझी मुलगी हुशार होती, एमएसस्सी झाली होती, कॉलेजात शिकवत होती, आमचं काय चुकलं? तिच्या रोजच्या मार्गावर पाळत ठेवणं, दुचाकीवरून दोघांनी येणं, बाटलीतून पेट्रोल फेकणं आणि चेहरा पेटवून पळून जाणं... तेच दृश्य, तीच तडफड. चेहऱ्यावर अॅसीड फेकणं काय, किंवा पेट्रोल टाकून चेहरा जाळणं या साऱ्यात तिचा ‘चेहरा’ लक्ष्य करणं हाच आजच्या पुरुषप्रधान मानसिकतेचा क्रूर चेहरा आहे आणि भळभळता पुरावाही. कष्टांच्या आधारे पुढे जाणाऱ्या, बुद्धीच्या कसोटीवर स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या आणि ‘नाही म्हणण्या’च्या स्वयंनिर्णयाची कास धरणाऱ्या स्वतंत्र महिलांचे अस्तित्व नाकारणारी, उद्ध्वस्त करणारी ही पुरातन मानसिकता. स्वत:च्या पोटी मुलगी जन्माला येऊनही माणूसपणाचा पान्हा न फुटलेली. त्यामुळे ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कितीही कठोर कायदे केले आणि कडक शिक्षा दिल्या तरी ‘ती’ चा चेहरा नष्ट करण्याची ही अघोरी कृत्ये सुरूच राहतील. माणुसकीच्या चेहऱ्यावर हल्ले करीत. मग त्यासाठी कधी अॅसीड वापरले जाईल, तर कधी पेट्रोल एवढाच काय तो फरक. कालच्या अंकातील ते भयंकर चित्र क्रौर्याचे आहे. तिचा चेहरा जाळणाऱ्या या पुरुषप्रधान मानसिकतेचा क्रूर चेहरा कसा भस्मसात करायचा, हा खरा प्रश्न आहे!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.