Editorial / ती ४५ मिनिटे... (अग्रेलख)

तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळण्याची क्षमता धोनीमध्ये असली तरी त्यास साथ मिळत नाही हेदेखील उघड झाले

संपादकीय

Jul 12,2019 09:58:00 AM IST

सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१५ मध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने विश्वचषकाची तयारी सुरू केली होती. यामध्ये चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजाचा शोध घेणे हा महत्त्वाचा अजंेडा होता. परंतु भारतीय संघाचा चार वर्षांचा यशस्वी प्रवास बुधवारी अवघ्या ४५ मिनिटांत संपुष्टात आला. नऊपैकी तब्बल सात सामने जिंकून अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडने उपांत्य फेरीत १८ धावांनी पराभूत केले. १९८३ आणि २०११ च्या या विश्वविजेत्या संघाला आता २०२३ पर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. चुकीची संघनिवड आणि त्यावर घालण्यात येणारे पांघरुण ही भारतीय क्रिकेटची शोकांतिका आहे. गुणतालिकेत जरी भारतीय संघ अव्वल स्थानावर असला तरी एकटा रोहित शर्मा व के. एल. राहुल आणि त्यांना अधूनमधून साथ देणारा विराट कोहली या पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांमुळे त्यानंतरच्या फलंदाजांची योग्यता आणि कुवत कधीच योग्य कसोटीवर पडताळली गेलीच नाही. उपांत्य फेरीतील अपयश हे त्याचेच फलित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले सदस्य विश्वचषकासाठी संघात निवडतात हाच मोठा विनोद आहे. पन्नास षटकांचा एकदिवसीय सामना हा कसोटी क्रिकेटचा छोटा अवतार असतो, पण त्यासाठी ट्वेंटी-२०ची कामगिरी डोळ्यासमोर ठेवून जर संघाची निवड केली तर कधी ना कधी आपण अडचणीत येणारच होतो. इतर प्रत्येक संघाकडे निव्वळ पाच फलंदाज आहेत. आपण तर पहिल्या सामन्यापासूनच चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार या प्रश्नाचे ओझे डोक्यावर ठेवून निघालो होतो. त्यातच सलामीचा फलंदाज शिखर धवन जायबंदी झाल्यामुळे तर आपल्याकडे निव्वळ तीन फलंदाज उरले आणि तेही पहिल्या तीन क्रमांकांवर खेळणारे. यापैकी दोघे किंवा तिघे अपयशी ठरले असते, तेव्हाच मोठी समस्या निर्माण झाली असती. मात्र, नेमकी ही समस्या दुसऱ्या टप्प्यात उद्भ‌वली. रोहित, राहुल आणि विराटचा आधार कोसळताच फलंदाजीतील त्रुटी उघड्या पडल्या. दिनेश कार्तिक, ऋषभ पंत हे मधल्या फळीचे फलंदाज नाहीत हे वारंवार सिद्ध झाले. तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळण्याची क्षमता धोनीमध्ये असली तरी त्यास साथ मिळत नाही हेदेखील उघड झाले. संघात चार यष्टिरक्षक आणि तीन कप्तान असल्यामुळे मतभिन्नताही उघडी पडली. २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाल्यानंतर जे दुःख करोडो भारतीयांनी सोसलं होतं, त्याची बुधवारी पुनरावृत्ती झाली. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता भारतीय संघ असा काही खेळेल याची थोडी बहुत जाणीव होतीच प्रत्येक क्रिकेटप्रेमीला. साखळी सामन्यात अविश्वसनीय पद्धतीने खेळत उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठायची आणि शेवटी हा संघ तोच का म्हणण्याइतपत लाजिरवाणा पराभव स्वीकारायचा. आता या पराभवाची अनेक कारणे दिली जातील, पण विश्वचषक आपलाच आहे, असा समज करून बसलेल्या तमाम भारतीयांना भानावर यायला वेळ लागेल.

X
COMMENT