धोक्याची आकाशवाणी (अग्रलेख)

दिव्य मराठी

Apr 19,2019 09:22:00 AM IST

देशातील पहिली खासगी विमान कंपनी जेट एअरवेजने बुधवारी रात्री अखेरच्या उड्डाणानंतर तात्पुरती विश्रांती घेतली. किंगफिशरनंतर गेल्या दशकात बंद होणारी ती दुसरी भारतीय विमान कंपनी ठरली. दिवसाला ६५० विमानांचे उड्डाण करणाऱ्या जेटचे बंद होणे धक्कादायक आहे.जेटवरील संकट एकाएकी आलेले नाही. याची सुरूवात २००७ पासूनच झाली होती. जेटने कर्जात बुडालेल्या 'एअर सहारा'ला १४५० कोटी रूपयात विकत घेऊन जेटलाईट असे नाव दिले. जेटलाईट फायद्यात आलीच नाही. परिणामी कर्जाची रक्कम २० हजार कोटींवर पोचली. जेटला इएमआय चुकवणेही कठीण झाले. या काळात इंडिगो, गोएअर आणि स्पाईस जेटसारख्या लो- कॉस्ट एअरलाईन्सने बाजार व्यापले. जेटने त्याकडे दुर्लक्ष केले. रूपयाची घसरण आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या सतत बदलणाऱ्या किंमतीही जेटच्या पडझडीसाठी कारणीभूत ठरल्या. आजघडीला जेटवर देशी आणि परदेशी अशा २६ बँकांचे सुमारे ८५०० कोटी रूपयांचे कर्ज आहे. कंपनी सुरू ठेवण्यासाठी जेटला ४०० कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीची गरज आहे. पण सोय न झाल्याने अखेर सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला.


निवडणुकांच्या तोंडावर जेट बंद होण्याचा चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून केंद्राने नागरी हवाई वाहतूक विभागाला कामाला लावले. तिढा सोडविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रिकामे झालेले स्लॉट देण्यासाठी विमान कंपन्यांची बैठक बोलावली आहे. जेटचा परवाना कायमसाठी रद्द करण्यावरही मंत्रालय विचार करत आहे. आर्थिक संकट सोडवण्यासाठी जेटला बोली प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. निवडणुकानंतर सत्तेत येणाऱ्या सरकारच्या धोरणांवर गुंतवणूकदारांचा निर्णय अवलंबून असेल. सेवा बंद झाल्याने सर्वांची कुटुंबे संकटात आली आहेत. जेटमध्ये १६ हजार पूर्णवेळ आणि ६ हजार कंत्राटी तर ६,३०० अप्रत्यक्ष कर्मचारी आहेत. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने ते त्रस्त आहेत. सरकारने एअर जेटला वाचवण्यासाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी गुरूवारी दिल्लीत आंदोलन केले. बंद विमानसेवेमुळे जगभरातील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. कंपनीने तातडीने प्रवाशांना ईमेल, एसएमएस आणि फोन कॉलद्वारे माहिती पाठवली आहे. कंपनी कायमची बंद झाली तर त्याचा जागतिक पातळीवर चुकीचा संदेश जाऊ शकतो. भविष्यात भारतीय विमान क्षेत्रात गुंतवणुकीसाठी नवीन कंपनी तयार होणार नाही. सरकार नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी स्टार्टअपसारख्या योजना राबवत आहे. आणि, इथे आहेत ते उद्योग बंद पडत आहेत. 'मेक इन इंडिया'च्या नावाने नारेबाजी सुरू असताना, 'इझ इन डुइंग बिझनेस'ची स्थिती काय आहे? जेटचे बंद होणे भारताच्या एकूणच उद्योग क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील भारताच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

X