आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची ‘दक्षिण सल…’ (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकची सत्ता मिळवून भाजपला दक्षिणेत पाय रोवण्यासाठी मैदान तयार करायचे होते. पण ऐनवेळी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला  (जेडीएस) पाठिंबा देऊन भाजपला रोखले. विधानसभेत सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही सरकार टिकवता न आल्याची सल भाजपचे कर्नाटकातील दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या मनात नसती तर नवलच. त्यामुळे आता कर्नाटकमधील एक वर्ष जुने काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे. आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते अस्थिर करण्याचा किंवा अस्थिर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. यापूर्वीही सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र त्या वेळी तयारी पूर्ण नव्हती. आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तगडे डावपेच आखण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी येदियुरप्पा करत आहेत.


भाजपकडून या वेळेसचे ऑपरेशन लोटस दोन टप्प्यांत राबवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या घडामोडी दुसऱ्या टप्प्यातील आहेत. आधीपासूनच संपर्कात असलेल्या काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना भाजपने पहिल्या टप्प्यात म्हणजे गेल्या दहा-पंधरा दिवसांत गळाला लावले. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपने ठरवल्याप्रमाणे धक्कादायक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, याचा अर्थ असा, की भाजपच्या या दुसऱ्या टप्प्याचा त्यांना थांगपत्ता लागला नसावा. १३ आमदारांनी राजीनामे दिल्याचे कळताच ते दौरा अर्धवट सोडून परतले आहेत. सरकार वाचवण्यासाठी आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. दोन्ही पक्षांतील असंतुष्टांना सामावून घेऊन सरकार वाचवण्याचा काँग्रेस-जेडीएस आघाडीचा हा शेवटचा प्रयत्न आहे. सरकार टिकावे यासाठी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. पण जेडीएसकडून याला समर्थन मिळण्याची शक्यता केवळ अशक्य आहे. कारण सिद्धरामय्या आणि एच. डी. देवेगौडा यांच्यामधील वितुष्ट सर्वश्रुत आहे. मागच्या वेळी सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे मंत्री डी. के. शिवकुमार या वेळीही कामाला लागले आहेत. पण सर्वार्थाने मजबूत भाजपला रोखण्यात त्यांना कितपत यश येईल, याबाबत शंका आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाट कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या भाजपने कर्नाटक सरकार पाडण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. विधानसभा भंग होऊन निवडणूक लागली तरी मोदी लाटेचा फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे. मध्य प्रदेशातही काँग्रेसला काठावर बहुमत आहे आणि गाठ आहे सर्वार्थाने सज्ज भाजपशी. सत्ता मिळवण्यासाठी भाजपही कोणत्याही थराला जाऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. सत्ता, पैसा आणि पैशांतून सत्ता हे सूत्र भारतीय राजकारणात जुनेच आहे. अशा या सूत्राला, ध्रुवीकरणाच्या राजकारणाला लोकांची पसंती मिळत असेल तर कोणता तरी पक्ष नीतिमूल्यांची चाड का ठेवेल? असे ऑपरेशन लोटस घडतच राहतील.

बातम्या आणखी आहेत...