Home | Editorial | Agralekh | divyamarathi editorial on Kartarpur

कर्तारपूरचा खडतर मार्ग (अग्रलेख)

संपादकीय, | Update - Jul 16, 2019, 09:16 AM IST

शीख समुदायाचे पहिले गुरू नानक यांची समाधी पाकिस्तानात आहे, आता हे तीर्थक्षेत्र भाविकांसाठी खुले होणार आहे

  • divyamarathi editorial on  Kartarpur

    शीख समुदायाचे पहिले गुरू नानक यांची समाधी पाकिस्तानात अाहे. आता हे तीर्थक्षेत्र भाविकांसाठी खुले होणार आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत म्हणजे गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर काॅरिडाॅर खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेद्वारे अखेर काॅरिडाॅर सुरू करण्यावर तात्त्विक सहमती झाली. शांतता, सुसंवादाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या याच मार्गाने पाकिस्तान भारतात खलिस्तानी दहशतवादी पाठवू शकतो, अशी संशयाची पाल नमनालाच चुकचुकली. एकीकडे हा काॅरिडाॅर खुला करण्यावर चर्चा झडत असतानाच स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून हाेत असल्याची टीका पाकवर सुरू झाली. ती अगदीच निराधार म्हणता येणार नाही. आपला कुटिल हेतू साध्य करण्यासाठी जगभरातील शीख समाजाला पाकिस्तान टार्गेट बनवू शकतो. तसेच खलिस्तान समर्थकांचे जथ्थे भारतात पाठण्यासाठी, त्या चळवळीला पुन्हा खतपाणी घालण्यासाठी या पवित्र स्थळाचा वापर केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिखांचे कल्याण किंवा त्यांच्या धार्मिक भावनांविषयी एक तर पाकला सहानुभूती नव्हती आणि नाही, दुसरे म्हणजे ताे काही प्राधान्यक्रमातील मुद्दा नाही. उल्लेखनीय म्हणजे कर्तारपूर काॅरिडाॅर समितीत खलिस्तानी नेत्यांना घुसवले गेले. यातून पाकिस्तानच्या हेतूविषयी शंका घ्यायला जागा असल्याचेच अधाेरेखित हाेते. दरम्यान, पाकिस्तान सरकारने पंजाब आणि सर्वदूर पसरलेल्या शीख समाजामध्ये आपली अशी एक प्रतिमा निर्माण केली की, आम्ही किती दिलदार आणि मोकळ्या मनोवृत्तीचे आहोत. त्यासोबतच खलिस्तानी चळवळीला समर्थन देत असल्याचे भारत सरकारला दाखवून दिले.


    पाकिस्तानातील कट्टरता इतकी शिगेला पोहोचली आहे की, जणू तिथल्या नेतृत्वाच्या मानगुटीवर स्वार झाली आहे. या देशाचा दुसरा गुणधर्म म्हणजे भारताशी राखलेले कट्टर शत्रुत्व. सर्वसामान्य माणूस तसा नाही. त्याला भारताशी मैत्र हवे आहे. पण, पाकिस्तानी नेत्यांना आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सतत हे स्वप्न दाखवावे लागते की, एक ना एक दिवस आपण भारत काबीज करू. म्हणूनच आपण भ्रमात राहून चालणार नाही. पाकिस्तानात अल्पसंख्य असणाऱ्या शिखांवर अनन्वित अत्याचार हाेत असताना त्या घटनांची कोणतीही दखल घेतली जात नाही. पाकिस्तानातील काही संघटना किंवा व्यक्ती ही यात्रा विस्कळीत करण्याचा तसेच जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू शकतात. याविषयी पाकिस्तान सरकारकडे भारताने चिंता व्यक्त केली, त्या वेळी भारतविरोधी कोणतेही कृत्य या कॉरिडॉरमध्ये होऊ देणार नसल्याची हमी पाकने दिली, तरीही या भूमिकेवर ताे किती काळ ठाम राहताे, हे पाहणे महत्त्वाचे. हा निर्णय चांगला आहेच, पण भाबडेपणाने त्याकडे बघून चालणार नाही. विश्वास ठेवावा, असे वर्तन पाकिस्तानचे नाही. कर्तारपूर गुरुद्वाराकडे जाणारा कॉरिडॉर हा भारत-पाक मैत्रीचा नवा मार्ग ठरणार की पुन्हा एकदा नव्या कारस्थानाची नांदी ठरणार, हा प्रश्न आता एेरणीवर अाला आहे.

Trending