आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा याद्या तरूण हाेतात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हातचे राखत आपापल्या उमेदवारांची घोषणा केली खरी. पण युती करताना झालेल्या तडजोडीवरचा पडदा अजून काही उघडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपकडून कोणते तीन लोकसभा मतदारसंघ हिसकावून घेतले आहेत ते कळायला अजून मार्ग नाही. अर्थात, दोन्ही पक्षांना तडजोडीचे हे कोंबडे फार दिवस काही झाकून ठेवता येणार नाही. येत्या काही दिवसांत राज्यातल्या २३ आणि २५ अशा सर्वच उमेदवारांची घोषणा त्यांना करावीच लागणार आहे. विरोधकांना आपले डावपेच आखण्यासाठी कमीत कमी वेळ मिळावा, यासाठी सर्वच राजकीय पक्ष अशी खेळी खेळत असतात. अर्थात, विरोधकांमध्ये आपल्या पक्षातले असंतुष्टही सर्वच पक्षांनी गृहित धरलेलेच असतात. खरे तर ज्या पक्षाच्या विजयाची सर्वात जास्त शक्यता असते त्या पक्षाकडे उमेदवारांचा ओढा अधिक असतो आणि त्यामुळेच त्या पक्षातच उमेदवारीसाठी हाणामारी होत असते, असे गृहीत धरले जाते. स्वाभाविकच अशा पक्षाचे उमेदवार जाहीर व्हायला विलंब लागताे. शिवसेना आणि भाजप त्या वातावरण निर्मितीत आहेत, असे एकूण त्यांच्या उमेदवारांच्या घोषणेवरून दिसते आहे. 

 

शिवसेनेने २१ उमेदवारांची यादी काल जाहीर केली. त्यात त्यांनी उस्मानाबादच्या रवि गायकवाड यांचा पत्ता कापला आहे. इंडियन एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकारामुळे रवि गायकवाड दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. खरे तर ती कुप्रसिद्धी होती. ज्या पद्धतीने रवि गायकवाड यांनी आणि त्यांच्या राजकीय नेत्यांनी त्या प्रकाराचे समर्थन केले होते, ते पाहाता पक्षाने गायकवाड यांची ती 'शिवसेना स्टाईल' फारशी गांभीर्याने घेतली नव्हती हे उघड होते. आता ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापून त्या प्रकरणाची शिक्षा त्यांना दिल्याचे शिवसेनेला दाखवायचे आहे, असे काहींना वाटेल. पण तशी शक्यता नाही. शिवसेना पश्चाताप करणाऱ्यांपैकी नाही. इतक्या उशिराचा पश्चाताप तर या पक्षाला मान्यच नाही. तरीही गायकवाड यांचे तिकीट कापले गेले त्याला उस्मानाबादचे स्थािनक राजकारण कारणीभूत आहे. स्थानिक पातळीवर 'मातोश्री'च्या जवळ असणाऱ्यांनी रवि गायकवाड यांच्या विरोधात ठरवून मतपरिवर्तन घडवून आणले असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवसेना फारशी साधन सुचिता पाळायला लागली, असे समजण्याचे कारण नाही. तिकडे लातूरमध्ये भारतीय जनता पक्षानेही सुनिल गायकवाड या विद्यमान खासदाराचे तिकीट कापले आहे. सुनिल गायकवाड यांच्या विषयी असे काही प्रकरण घडल्याचे ऐकीवात नाही. पण गायकवाड यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्थािनक पातळीवर नाराजी व्यक्त केली जात होती. ती अंगलट येऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी काळजी घेतलेली दिसते. विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारणे हे खरे तर एक राजकीय धाडस असते. युतीने ते पहिल्याच यादीतून दाखवले आहे. हा राजकीय जुगार सत्ताधारी दोन्ही पक्षांना फायद्याचा ठरतो की हानीचा हे २३ मे रोजीच स्पष्ट होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या भारती पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षत्याग करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. जे सुजय विखे यांनी केले तेच भारती पवार यांनी केले असल्यामुळे सुजय यांच्याप्रमाणेच त्यांनाही दिंडोरी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या तरुण हाेत आहेत. त्यामुळे भारती पवार, सुजय विखे अशा नव्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यात चव्हाणांसारख्या बुजूर्ग नेत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. खरे कारण काहीही असो, शरद पवारांनीही अापल्या तरूण नातूसाठी स्वत: रिंगणातून माघार घेतल्याचे सांगितलेले साऱ्या महाराष्ट्राने ऐकले आणि पाहिले आहे. भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांना यंदा उमेदवारी दिली नाही, अशा बातम्या आल्या आहेत. राष्ट्रवादीत शरद पवारही लालकृष्ण अडवाणीच झाले आहेत. फक्त त्यांचे अडवाणी होणे हे त्यांनी स्वत: करून घेतले आहे की कौटुंबिक गड सांभाळताना त्यांना करावी लागलेली ती तडजोड आहे, हे पुरते स्पष्ट व्हायचे आहे. ते काहीही असो, सर्वच राजकीय पक्षात नव्या रक्ताला संधी दिली जात असेल तर भारतीय राजकारणातला तो सकारात्मक बदल म्हणून त्याकडे पाहायला हवे. सध्याच्या लोकसभेपेक्षा येणाऱ्या लोकसभेचे सरासरी वय हे नक्कीच कमी असेल. नवे विचार, राजकारणाची नवी धारणा, कामाचा नवा उत्साह, प्रश्नांकडे आणि राजकीय परंपरांकडे नव्या नजरेने पाहाण्याची वृत्तीही त्यातून लोकसभेत वाढावी, ही अपेक्षा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...