आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वर्ष, नवे राज्य!

2 वर्षांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

देशात सध्या अराजकाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही नवे घडते आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवे सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झाले. आता त्याचा बहुचर्चित विस्तार पार पडला. मंत्रीमंडळ विस्ताराने ठाकरे सरकारला एकप्रकारे स्थैर्य प्राप्त झाले आहे. तीन तिघाडीचे हे सरकार अल्पावधीत कोसळेल, अशी भिती विरोधक व्यक्त करत होते. पण, ठाकरे सरकार आत्मविश्वासाने पावले टाकतंय हे मंत्रीमंडळ विस्तारातून दिसले. ४३ सदस्यांच्या या मंत्रीमंडळात राज्याच्या सहा विभागांना प्रतिनिधीत्व लाभले आहे. सर्व जात समूहांना सामावून घेण्याचा प्रयत्न आजच्या मंत्रीमंडळ विस्ताराने झाला. कौशल्याने मंत्रीमंडळ विस्तार केलेला दिसतो. त्यामुळे ठाकरे सरकार जनतेला आपले वाटेल, यात संशय नाही. एकदोन दिवसात मंत्र्यांना खातेवाटप होईल़. आणि, टिम ठाकरे राज्यकारभाराच्या प्रत्यक्ष कामाला लागेल. ठाकरे मंत्रीमंडळात जसे अनुभवी मंत्री आहेत, तसे १६ नवे चेहरे या मंत्रिमंडळात आहेत. एकप्रकारे प्रस्थापित मंडळींना बाजूला करण्यात या मंत्रिमंडळ विस्तारात प्रयत्न केलेला दिसतो आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ठाकरे सरकारात चार मंत्री मुस्लीम धर्मीय आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांनी मुस्लीम समुदायाला या मंत्रीमंडळात स्थान दिलेले दिसतेे.  मागच्या फडणवीस सरकारात अल्पसंख्यांक मंत्रीपदसुद्धा बहुसंख्यांक समाजातील मंत्र्यांकडे होते. देशात सध्या मुस्लिम समुदायांकडे संशयाने पाहिले जात आहे़. मुस्लिम समाजासाठी हा काळ अंधारुन आलेला असाच आहे. अशा काळात चार मुस्लिम आमदारांना मंत्रीमडळात स्थान देऊन जाणत्या धुरिणांनी राज्याचा पुरोगामीपणाच अधोरेखीत केला. खरे तर राज्य सरकारचे अधिकार तसे मर्यादितच असतात. केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय राज्याचा गाडा नीट चालणे मुश्कील असते. केंद्रातले मोदी सरकार ठाकरे सरकारला पुरेशी मदत करेल, अशी शक्यता नाही. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण, कायदा व सुव्यवस्था हा कळीचा विषय राज्यसूचीत आहे. त्याचा मोठा दिलासा या सरकारसाठी आहे. अर्थात ठाकरे सरकार हे आघाडीचे सरकार आहे. पण, जमेची बाजू म्हणजे या सरकारला कोणी बाहेरुन पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, असे म्हणायला मोठा वाव आहे. त्यात सर्वात जमेची बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. सौम्य प्रकृतीचे व मध्यममार्गी म्हणून उद्धव ओळखले जातात. त्यामुळे तीन पक्षांमध्ये काही बेकी होईल, असे वाटत नाही. काही शंका आहेत, पण आम्ही आज त्या उपस्थित करत नाही. सरकारने सावध असावे, एवढेच सूचित करतो आणि राज्याच्या हितापेक्षा मोठे काही नाही, एवढे सुचवतो. आघाडी झाली, किमान समान कार्यक्रम बनला. सरकार स्थापन झाले, मंत्रीमंडळ विस्तारही झाला. आता प्रत्यक्ष कामाला लागण्याची वेळ आहे़. सारा महाराष्ट्र आशेने नव्या सरकारकडे पाहतो आहे. रयतेचे राज्य स्थापन करावे. महाराष्ट्र धर्माचे रक्षण करावे, अशी महाराष्ट्राच्या भूमीतल्या जनतेची मनीषा आहे. ही पहाट लवकर होवो, यासाठी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाला शुभेच्छा.

बातम्या आणखी आहेत...