आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरच आजारी! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आणि मोदींच्या सत्तारोहणाच्या धामधुमीत काहीशी दुर्लक्षित राहिलेली पायल तडवी या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या कुणाही विचारी माणसाचे मन सुन्न करणारी आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला आरक्षित कोट्यातून प्रवेश घेतल्याने पायलला काही वरिष्ठ विद्यार्थिनींकडून सातत्याने टोमणे मारण्यात येत होते, अपमानास्पद वागवले जात होते आणि त्याच जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने जातीय विद्वेषाचे विष समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अजूनही किती भिनलेले आहे तेच सिद्ध होते. 


पायल ही जळगावच्या एका अतिसामान्य आदिवासी कुटुंबातून मोठी झालेली मुलगी. पण, अंगभूत बुद्धिमत्तेला प्रचंड मेहनतीची जोड देऊन तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. वडील जिल्हा परिषदेच्या सेवेत, घरचे एकंदर वातावरण अगदी सामान्य कुटुंबात असते तसे असल्याने तिच्यासारख्या मुलीने एमबीबीएसला प्रवेश मिळवणे आणि पुढे विशेष प्रावीण्य संपादनासाठी पी.जी. करण्याचा निर्णय घेत थेट मुंबईच्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणे हे सर्वांसाठी खरोखरच कौतुकास्पद. पण, तथाकथित जातीयतेची उतरंड आजही मनात बाळगणाऱ्यांसाठी मात्र तिची ही वाटचाल मनाचा जळफळाट करणारी ठरली. त्याच मानसिकतेतून तिच्यापेक्षा एक वर्ष पुढे असलेल्या तिच्याच शाखेच्या म्हणजे गायनाॅकॉलॉजीच्या तीन ज्येष्ठ विद्यार्थिनी जातिवाचक बोलणे, आरक्षणातून प्रवेश घेतल्याने तिला हीन लेखणे, ऑपरेशन थिएटरमध्ये येऊ न देणे अशा प्रकारे तिचा सातत्याने छळ करत होत्या आणि त्यातूनच तिने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे तडवी कुटुंबाचे म्हणणे आहे. यासंदर्भात तिने आपल्या वरिष्ठांकडे दाद मागण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही असेही सांगण्यात येते. याबाबत तिने लेखी तक्रार दिल्याचे अद्याप समोर आले नसले तरी अनेकदा आपले करिअर खराब व्हायला नको या भीतीपोटी विद्यार्थी संबंधित संस्था-महाविद्यालयाविरोधात अशी तक्रार देत नसल्याचे यापूर्वीच्या अनेक घटनांतून पुढे आले आहे. नेमके काय ते पोलिस तपासात यथावकाश समोर येईलच, पण अशा पद्धतीने परिस्थितीविरोधात झगडून वर येऊ पाहणाऱ्या पायलसारख्या विद्यार्थिनीवर जातीयतेच्या मुद्द्यावरून  आत्महत्येची पाळी येणे एक समाज म्हणून आपल्यासाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. या प्रकरणी रॅगिंग आणि अॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधित तीन विद्यार्थिनींवर दाखल झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकरण आता तापायला लागले असल्याने लवकरच संबंधित विद्यार्थिनींना अटक होईल यात शंका नाही. या प्रकरणात दोषी असतील त्यांना कठोरातले कठोर शासन व्हायला हवे. पण, मुळात अशा घटना घडूच नये यासाठी समाजाची आणि विशेषत: युवा वर्गाची मानसिकता घडवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी समुपदेशन आणि तत्सम उपायांवर अधिक भर द्यायला हवा.

 

 

बातम्या आणखी आहेत...