आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौन की बात (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एकही जाहीर पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांचा गेल्या पाच वर्षांत मीडियाशी झालेला संवाद त्यांच्या कलाने झाला आहे. आपली प्रतिमा अधिक कशी उंचावेल, आपलाच (पक्षाचा नव्हे) करिष्मा कसा राहील अशा भावनेतून ते त्यांच्या सोयीने संवाद साधत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात तर त्यांनी सिनेस्टार अक्षय कुमारला मुलाखत देऊन स्वत:चे मनोरंजन करून घेतले. नंतर मोदींनी त्यांना धार्जिणे असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकारांनी मोदींना आंबे कसे आवडतात व ते किती तास जागरण करतात, किती कमी झोपतात, अशा प्रकारचे मूर्खपणाचे, बाष्कळ प्रश्न विचारून पत्रकारितेविषयी लोकांमध्ये संताप निर्माण केला होता. यातल्या एकाही पत्रकाराने देशाच्या सहिष्णुतेला, सौहार्दाला गेल्या पाच वर्षात संघ परिवार व भाजपने कसे योजनाबद्ध धक्के दिले, काश्मीरचा चिघळलेला प्रश्न असो की गोवंशबंदीवरून झालेल्या निष्पापांच्या हत्या असोत, आसाममधील एनआरसीचा मुद्दा असो वा वाढती बेरोजगारी, नोटबंदीचे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम, बँकांची गेलेली विश्वासार्हता, घसरत गेलेली गुंतवणूक हे मुद्दे देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींपुढे ठेवण्याचे धाडस केले नाही. अशी परिस्थिती असताना काल दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात देशातल्या तमाम मीडियासमोर मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा सोबत उपस्थित राहिले. मीडियालाच काय, पण देशाला वाटले की मोदी आता पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैऱ्यांना सहज स्वीकारतील. पण हाय रे हाय! मोदींच्या वाट्याला एकही प्रश्न येऊ नये याची खबरदारी भाजपकडून अगोदरच घेण्यात आली. दिल्लीतल्या अनेक नामवंत पत्रकारांना, सच्ची पत्रकारिता करणाऱ्यांना या पत्रकार परिषदेपासून दूर ठेवण्यात आले होते. मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकार परिषदेचा ताबाच अमित शहांनी स्वत:कडे घेतला. त्यात एक प्रश्न आपल्या दिशेने आल्याचे लक्षात घेता मोदींनी ‘आपण पक्षाचा एक साधा सैनिक असून पक्षाचे अध्यक्ष आमच्यासाठी सर्वकाही असतात,’ असे विधान केले. या विधानाला जोडून शहा यांनी ‘मोदींनी या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही,’ असे म्हणून मोदींपुढची अडचण दूर केली. एकुणात बहुमताने सत्तेवर बसवलेला पंतप्रधान आपला कार्यकाळ संपला असताना जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी घेत नाही ही लाजिरवाणी घटना म्हटली पाहिजे. मोदींच्या अशा ‘मौन की बात’ने त्यांची जी तथाकथित करारी, कणखर प्रतिमा मीडियाने उभी केली आहे ती आतून किती पोकळ व भुसभुशीत आहे हे दिसून आले. या पत्रकार परिषदेत एनडीएशिवाय भाजपला पर्याय नाही असेही चित्र दिसले. मोदींचे कौतुक करण्यापेक्षा अमित शहा यांना पक्ष व घटक पक्ष महत्त्वाचे वाटले. मोदींनाही आपला करिष्मा संपुष्टात आल्याची जाणीव झाली असेल, नाही तर पाच वर्षे देशाशी ‘मनकी बात’ करणारा हा नेता ५० मिनिटे मौन पाळून पक्षाध्यक्षाचे ऐकत बसला नसता.

बातम्या आणखी आहेत...