आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद देताना त्यांनी आपल्या सरकारची पाठ थोपटून घेतली. हे करत असताना मोदींनी भाषणात रामनामाचा जप आळवला. मोदी संसदेत रामनाम घेत असताना तिकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास मात्र ‘दाम’ व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत होते. रिझर्व्ह बँकेने महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या कमकुवत अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली, तर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा - देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती मिळावी यासाठी आम्ही पावले उचलल्याचे मोदींनी सांगितले. मोदी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर, आम्ही सत्तेत आलो नसतो तर राममंदिर वाद, काश्मिरातील ३७० वे कलम, तीन तलाक, बोडो - मिझोरामचा प्रश्न आजही कायम असला असता, असे सांगितले. देशाच्या फाळणीवरूनही त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो तर ७० वर्षांनंतरही ३७० कलम हटले नसते, राममंदिराचा मुद्दा निकालात निघाला नसता असे सुनावत त्यांनी तिहेरी तलाक आमच्यामुळे शक्य झाले असे सांगत आपल्याच सरकारची पाठ थोपटून घेतली. हे सांगत असतानाच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे कसे जाताहेत, दीडपट उत्पादन खर्चासह आधारभूत किमतीमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे हेही मोदींनी सांगितले. देशात सध्या गाजत असलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नोंदणी - एनआरसीवरही मोदींनी भाष्य केले. सीएएचे समर्थन करताना त्यांनी काँग्रेसला शीख दंगलींची आठवण करून दिली. राममंदिर आणि काँग्रेसवर लक्ष्य हेच मोदींच्या भाषणाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले. कोपरखळ्या, शेर, कवितासह मोदी संसदेत मैदान मारत असतानाच तिकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास द्वैमासिक पतधोरण जाहीर करत होते. दास यांनी रोकड दामाबाबत चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेतील मरगळ आणि मागणीतील घट यामुळे फारसे काही करण्यास वाव नसल्याचे पतधोरणातून दिसते. अर्थचक्राला घरघर लागलेली असताना मोदींनी मात्र आपल्या भाषणात आर्थिक मुद्द्यांचा फारसा उल्लेख केला नाही. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असताना मोदी मात्र काँग्रेसला टोमणे मारत होते. आर्थिक सुधारणांसाठी, अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा यासाठी आम्ही पावले उचलल्याचे माेदींनी आवर्जून सांगितले. पतधोरणात मात्र सरकारच्या या पावलांचे प्रतिबिंब दिसत नाही. राजकारणात ‘राम’ कसा वापरायचा याचा धडा मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला, तर अर्थव्यवस्थेसाठी दाम कसा महत्त्वाचा आहे याचे प्रत्यंतर पतधोरणातून दिसले. दिल्लीतल्या निवडणुकांची वेळ लक्षात घेऊन भाजप आणि मोदींना रामनामाची आठवण येणे साहजिक आहे. मात्र त्याच वेळी ‘दामा’कडे दुर्लक्ष केल्यास अर्थव्यवस्थेवर वाईट वेळ येऊ शकते याची जाणीव होईल तो सुदिन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.