आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी पोलिसी राज्य (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या पुढे ‘पुराेगामी’ शब्द लावण्याची प्रथा आहे. ती आता बंद करायला हवी. कारण, महाराष्ट्रधर्माची सात्त्विक भूमी अलीकडं पोलिसी राज्यात परावर्तित होते आहे. कालचं उदाहरण बघा. शहरी नक्षलवादप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. वर्नन गोन्साल्विस आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर माओवादाचा ठपका ठेवलाय. त्याच्या पुष्ट्यर्थ पोलिसांनी गोन्साल्विस यांच्या घरातून जप्त केलेल्या दोन सीडी व एक कादंबरी न्यायालयात सादर केली आहे. त्यातली एक सीडी पुण्याची सांस्कृतिक संघटना असलेल्या कबीर कला मंचाची आहे. दुसरी सीडी आनंद पटवर्धन यांनी निर्मिलेली जयभीम काॅम्रेड या माहितीपटाची आहे. पुरावे म्हणून  बिस्वजित राॅय यांची ‘वाॅर अँड पीस इन जंगलमहल’ ही कांदबरी सादर केली आहे. आपल्याकडं आरोपींवर पुरावे सरकार पक्षाने ठेवायचे असतात. त्याकामी पोलिसांना सरकारी वकील सल्ला देत असतात. शहरी नक्षलवादप्रकरणी पोलिसांनी मार्क्सवादी साहित्याचा जो आधार घेतला आहे तो विचारस्वातंत्र्याचा संकोच करणारा आहे, तसेच पोलिसांचा सांस्कृतिक अडाणीपणा चव्हाट्यावर आणणारा आहे. या न्यायाने अर्नेस्टोचे गुव्हेराचे चित्र असलेले टी शर्ट घालणाऱ्या लाखो युवकांना अटक करणार का?  फिडेलचे ‘अन् क्रांती’ या अरुण साधूंच्या पुस्तकावर बंदी घालणार का?  अर्थात, पोलिसांना आरोप ठेवण्याची मुभा आहे. न्यायालय त्याचा योग्य तो निवाडा करेलच, पण सुनावण्यांच्या छळात कार्यकर्ते भरडले जातात. आरोप सिद्ध होणार नसल्याचा पोलिसांना अंदाज असतो. पण त्यांना त्यायोगे भय पसरवायचे असते. व्यवस्थेच्या विरोधकांना इशारा द्यायचा असतो. या पोलिसी व्यवस्थेमागे सरकारही असते. कारण, पोलिसांच्या नियंत्रणावर शासन संस्थेचे स्थैर्य अवलंबून असते. राज्यकर्त्यांच्या वतीने पोलिस अधिकार वापरत असतात. त्यातून भयाची निर्मिती करत असतात.   २० व्या शतकात युरोपात अशी डझनावरी राज्यं निर्माण झाली अन् अंतही पावली. भारतात आणीबाणी त्यातलाच प्रकार होता. त्याची किंमत तत्कालीन राज्यकर्त्यांनी मोजली. त्या इतिहासाची भारतात पुनरावृत्ती होतेय. हिंसाचार विकासाचा मार्ग नाही. माओवादी विचारसरणी मनुष्यविरोधी आहे. त्यावर बंदी हवीच. पण, मार्क्सवादी साहित्य घरी सापडले म्हणून माओवादाचा शिक्का मारणे सर्वथा चूक आहे. मार्क्सवाद ही अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती आहे. मानवाच्या भटक्या अवस्थेपासून ते औद्योगिक कालखंडापर्यंतच्या दहा हजार वर्षांच्या कालाचा अन्वयार्थ लावण्याचे अचाट काम याच विश्लेषण पद्धतीने केले आहे.  मार्क्सवादी पद्धती आज आंतरविद्याशाखीय अभ्यासपद्धती म्हणून मान्यता पावली आहे. वर्नन गोन्साल्विस यांच्याकडे केवळ आणि केवळ मार्क्सवादी साहित्य सापडलं म्हणून तो नक्षलवादी असेल तर देशातल्या विद्यापीठीय प्राध्यापकांना तुरुगांत पाठवावे लागेल. कला व सामाजिक विज्ञान या शाखा बंद कराव्या लागतील. सरकार कुठल्या पक्षाचं असो, कायद्याचं राज्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं. कार्यकारी व कायदे मंडळ पाेलिसी राज्याचे कदाचित पाठीराखे हाेतील, पण भारतीय माध्यमव्यवस्था आणि न्यायव्यवस्था येऊ घातलेल्या सर्वंकष व्यवस्थेला वेसण घालतील याविषयी शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...