आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधूच्या यशाला सुवर्णझळाळी (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीड्स, हेडिंग्ले (इंग्लंड) आणि बेसल (स्वित्झर्लंड) या दोन शहरांमध्ये अंतर काही मैलांचे आणि इंग्लिश खाडीचे. रविवारी या दोन ठिकाणांवर क्रीडा क्षेत्रातील दोन चमत्कार घडले. तिसऱ्या अॅशेस कसोटीतील विजयाचा घास बेन स्ट्रोक्सच्या बॅटने ऑस्ट्रेलियाच्या घशातून बाहेर काढला. बेसलला पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन रॅकेट त्या वेळी तिची ‘चोकर्स’ अशी संभावना करणाऱ्या टीकाकारांना उत्तर देत होती. दोन वेगवेगळ्या खेळांतील या दोन महान खेळाडूंच्या यशाची ही गाथा. दोन वर्षांपूर्वी बदनाम होऊन क्रिकेटमधील बंदीच्या शिक्षेपर्यंत पोहोचलेला बेन स्ट्रोक्स आज प्रत्येक ब्रिटिश नागरिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. दुसरीकडे भारतीय महिला क्रीडा क्षेत्राचा डंका त्रिभुवनात वाजवणाऱ्या पी.व्ही. सिंधूने ‘बेसल’ येथे विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला. रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिंधूचे हुकलेले सुवर्णपदक सर्वांनी पाहिले होते. ओक्साबोक्शी रडणारी सिंधू पाहिली होती. ग्लास्गोच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नानजिआंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. जकार्ता, एशियन गेम्स, गोल्ड कोस्ट, राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू अंतिम रेषा गाठता गाठता मागे राहिली. यशापेक्षाही अपमानाचे दु:ख तिच्या जिव्हारी लागले. तीच हेटाळणी, २०१६ च्या विश्वचषक स्पर्धेत कोलकाता येथे अंतिम सामन्यातील अंतिम षटकात बेन स्ट्रोक्सने अनुभवली. या दोन्ही गुणवंतांना एकाच दिवशी, रविवारी न्याय मिळावा, हा निव्वळ योगायोग. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा सायना नेहवालकडून असताना सिंधूने अनपेक्षितपणे अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पहिला गेम पिछाडीवरून पुढे येत जिंकल्यावर या वेळी तिच्या पदकाचा रंग बदलणार असे वाटत होते. पण अंतिम क्षणी ती ढेपाळली. ‘पोडियम’च्या पहिल्या स्थानावर ती कधी उभी राहणार हा प्रश्न तिला सतत विचारला जाऊ लागला. पी. व्ही. सिंधूची विश्व अजिंक्यपद जिंकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया होती, ‘त्या प्रश्नकर्त्यांना आज माझ्या रॅकेटने उत्तर दिले आहे.’ रविवारी सिंधू भारताची पहिली महिला विश्वविजेती बॅडमिंटनपटू ठरली. तमाम भारतीयांच्या अपेक्षेला आणि स्वत:च्या गुणवत्तेला तिने न्याय दिला. अपेक्षांच्या दडपणामुळे २०१६ ते २०१९ या कालावधीत सिंधूने एक-दोन नव्हे तर चक्क सात फायनल्स गमावले. रविवारी मात्र तिने मनाशी खूणगाठ बांधली होती की या वेळी पदकाचा रंग सोनेरीच असणार. २०१७ ला ज्या नोझोमी ओकुहाराने तब्बल दोन तासांच्या लढतीनंतर सिंधूला विश्वविजेती होण्यापासून रोखले होते, त्याच ओकुहाराला सिंधूने विश्वविजेती होताना हरवले. मात्र त्यासाठी अवघी ३८ मिनिटे तिला पुरेशी ठरली. आज विश्व अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळाल्याने सिंधूच्या यशाला अखेर सोन्याची झळाळी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...