आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागच्या दाराचे राजकारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह. घटनाकारांनी विशिष्ट हेतूने या सभागृहाचा भारतीय लाेकशाहीत समावेश केला. मात्र राजकारण करणाऱ्यांनी या सभागृहाचा अपवाद वगळता सातत्याने आपल्या सोयीसाठीच वापर केला. हे सांगायचे कारण म्हणजे एप्रिलमध्ये होऊ घातलेली राज्यसभा निवडणूक. महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर राज्याच्या कोट्यातून या वेळी सात जण जाणार आहेत. या सातही जणांची बिनविरोध निवड होईल हे जवळपास निश्चित झाले असून भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना-काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेत जाईल. सध्याच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता यात काही अडचण येणार नाही. राज्यसभेसाठी राज्याच्या कोट्यातील सात जागांपैकी तीन जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट होते. उर्वरित चार जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांत चांगलीच जुंपणार असे चित्र निर्माण केले गेले. दरम्यान, आपला शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात त्याच वेळी राजकीय भूकंपाची तयारी सुरू होती. काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे या युवा नेतृत्वाने बंडाचे निशाण फडकवत भाजपला जवळ केले. परिणामी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खेळीत काँग्रेसला बॅकफूटवर जाणे भाग पडले. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवर दावा ठोकत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खिंडीत पकडण्याच्या मोहिमेवर असलेल्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या हालचालींना मध्य प्रदेशातील बंडाने लगाम बसला. परिणामी अशा संधीचा फायदा उचलण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुरिणाने डाव साधत चौथ्याची उमेदवारी जाहीर करत मोका साधला. बदलते वारे लक्षात घेत काँग्रेसनेही राजीव सातव यांच्या रूपाने युवा नेतृत्वाला संधी देत राज्यात मध्य प्रदेशातील बंडाचा प्रभाव जाणवणार नाही याची काळजी घेतली. भाजपनेही रामदास आठवले आणि उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करून आपणही व्होट बँकेच्या राजकारणात मुरल्याचे सिद्ध केले. तिसरा उमेदवार म्हणून भाजपने पंकजा मुंडेंच्या जवळचे भागवत कराड यांचे नाव जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेनेने पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव जाहीर करत युवा नेतृत्वाच्या पदरात माप घातले. राज्यातून राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सातपैकी शरद पवार आणि रामदास आठवले वगळता इतरांना नव्याने संधी नाकारण्यात आली आहे. राज्यातील पाच नवे चेहरे अाता राज्यसभेत दिसणार आहेत. त्या-त्या पक्षातील अनेक इच्छुक दिग्गजांच्या आशेवर पाणी पडल्याने ते नाराज आहेत. मात्र हे करण्यासाठी गेले महिनाभर मागच्या दाराने जे राजकारण रंगले त्याचा अर्थ समजून घेण्याची ही वेळ आहे. देशातील तसेच राज्यातील कोणतीच निवडणूक जात-पात-धर्म-प्रांत आणि व्होट बँकेपलीकडे जात नसल्याचे पुन्हा एकदा दिसले. मागच्या दाराने का असेना पण खासदार होणाऱ्या या सदस्यांनी तरी आता मागच्या दारी राजकारण न करत बसता विकासासाठी पुढाकार घ्यावा हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. असे झाले तरच या मागील दाराच्या राजकारणाचे खरे सार्थक होईल.

बातम्या आणखी आहेत...