आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोहित’ची गगनभरारी! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची परीक्षा सुरू होऊनदेखील टीम इंडियाचा पहिलाच पेपर इतरांपेक्षा खूप उशिरा होता. जोरदार अभ्यास आणि दमदार सराव करून पहिल्या पेपरसाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाने जेव्हा हा पेपर सोडवायला घेतला तेव्हा ते पैकीच्या पैकी गुण मिळवणार याची जवळपास प्रत्येकालाच खात्री होती आणि नेमके तसेच घडले. त्याचे कारण म्हणजे बांगलादेशने अगोदरच कंबरडे मोडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कागदावर आणि मैदानावरही टीम इंडियाच्या पुढे कमकुवतच वाटत होता. ईदच्या बुधवारच्या पवित्र दिनी विराट कोहलीच्या संघाने तमाम भारतीयांना गोड शिरखुर्म्याची “”ईदी’ दिली. असे असले तरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या सामन्यांच्या वेळापत्रकावर आरडाओरड सुरू झाली आहे. इतर सर्व संघांचे किमान दोन सामने झाल्यानंतरही भारतीय संघाचा पहिला सामना न झाल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही भारतीय संघाच्या विश्वचषक वेळापत्रकावरून प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एखाद्या स्पर्धेत उशिराने सामना खेळणं याचा पुढील सामन्यांवर परिणाम होऊ शकतो. यादरम्यानच्या काळात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी द्यायची, असा सवाल गावसकरांनी बीसीसीआयला विचारला आहे. मात्र तरीही टीम इंडियाचा पहिलावहिला विजय हा साजरा करायलाच हवा. पहिल्याच सामन्यात वडिलकीच्या नात्याने खेळणाऱ्या रोहित शर्माला कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सलाम ठोकला आणि त्याला कारणही तसेच होते. एकट्या रोहित शर्माने २२७ धावांचा पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला होता. चहलचे गोलंदाजीतले कर्तृत्व व्यर्थ जाणार नाही हे रोहितच्या विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या शतकाने पाहिले. फलंदाजीसाठी अवघड अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठ रोहित शर्माने सादर केला. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाची घसरण होईल अशी चिन्हे दिसत होती, मात्र रोहितने पडझड टाळत चिकाटीने फलंदाजी केली. रोहित शर्मा “हिटमॅन’ या नावाने ओळखला जातो. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके आहेत. विश्वचषक मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात रोहितने १२२ धावांची संयमी खेळी केली. एरवी कमीत कमी चेंडूंत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने या खेळीसाठी पुरेसा वेळ घेतला. रोहितला या खेळीसाठी वेळ आणि फटके पुरवून पुरवून उपयोगात आणावे लागले. मात्र जराही घाम गाळावा लागला नाही. याचं कारण साऊथम्पटनचं तापमान होतं १६ अंश सेल्सियस. ५० षटके क्षेत्ररक्षण  केल्यानंतर रोहितने जवळपास तितकीच षटके बॅटिंगही केली. मात्र हे शतक शारीरिकदृष्ट्या दमवणारे नव्हते. कारण इंग्लंडमधलं सुखद हवामान... दीड महिना चाललेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जेतेपदाची कमाई केली होती. आयपीएलमध्ये राेहितला दमदार मोठी खेळी साकारण्यात यंदा अपयश आलं होतं. ही उणीव त्याने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात खणखणीत शतकी खेळीसह भरून काढली. 

बातम्या आणखी आहेत...