Editorial / चटका लावणारी एक्झिट (अग्रलेख)

प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नाही, ही भावनाच अविश्वसनीय आहे

संपादकीय

Aug 08,2019 08:43:00 AM IST

अमोघ वक्तृत्वाने जनमानस जिंकणाऱ्या भारतीय राजकारणातील कणखर नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या जडणघडणीतील रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नाही, ही भावनाच अविश्वसनीय आहे. सरकारने काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी नुकताच आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने विरोधकही शोकव्याकुळ झाले आहेत.


देश असाे की विदेश, संसद असाे की संयुक्त राष्ट्राची महासभा, साऱ्याच ठिकाणी त्यांनी आेजस्वी वक्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांचे सरकार हाेते, त्या वेळी सुषमा स्वराज ज्या भावनावेगाने भारतीय पाैराणिक कथांचे दाखले देत आपल्या भाषणातून मुद्दे मांडत हाेत्या, ते एेकताना सारे पत्रकार इतके मंत्रमुग्ध झाले की, पाच मिनिटांनंतर त्यांनी लिहिणेच बंद केले हाेते, ही आठवण त्यांच्या आेजस्वी वक्तृत्वाची साक्ष देण्यास पुरेशी ठरावी. याशिवाय २०१५ आणि २०१८ मधील संयुक्त राष्ट्रसंघातील त्यांचे भाषणही ‘न भूताे न भविष्यति’ असेच ठरले. परिणामकारक प्रशासकीय काैशल्य आणि प्रभावी निर्णय क्षमतेचे अनेक आदर्श त्यांनी घालून दिले. १९७० मध्ये अभाविपच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीस त्यांनी सुरुवात केली, आणि जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणीविराेधी आंदाेलनातही उडी घेतली. नंतर भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. परंतु, ८० च्या दशकात त्या पक्षात सामील झाल्या. भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्यांमध्ये स्वतंत्र आेळख निर्माण करणाऱ्या सुषमा स्वराज यांचे हिंदीप्रमाणेच, संस्कृत, कन्नड, हरियाणवी, पंजाबी आणि इंग्रजीवर प्रभुत्व हाेते. माेदी सरकारने राजकीय नेत्यांसाठी वयाेमर्यादेचा दंडक घालून दिला असला तरी सुषमा स्वराज कधी निवृत्त हाेणाऱ्या नेत्यांपैकी नव्हत्या. तथापि, त्यांनी पक्षादेशाचे सन्मानपूर्वक पालन केले. इतकेच नव्हे, तर आपली घराणेशाही रुजवण्याचा विचारही कटाक्षाने टाळला. नि:पक्ष, स्वच्छ आणि समर्पित राजकारणाचा त्यांनी घालून दिलेला आदर्श वस्तुपाठ भारतीय राजकारणातील नवी पिढी गिरवत राहील, हे निश्चित! पंतप्रधान माेदींनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वत:कडे ठेवून घेतला, त्या वेळी काेणाही सामान्य मंत्र्याला निराशेने ग्रासले असते. परंतुु सुषमा स्वराज यांनी ‘गव्हर्नन्स’ला मानवी चेहरा देण्याचा नवा वस्तुपाठ घालून दिला. विदेशात अडचणीत असलेला भारतीय एका ट्विटवर साऱ्या परराष्ट्र मंत्रालयाला अर्ध्या रात्री जागं करू शकत हाेता. रेल्वेपाठाेपाठ हे माॅडेल अन्य मंत्रालयातदेखील अमलात आणले गेले, हे सुषमा स्वराज यांच्या द्रष्टेपणाचे यश म्हणावे लागेल. ओजस्वी वक्त्या असलेल्या सुषमा अखेरीस फक्त श्रोत्या झाल्या. त्यांचे हे एकाकीपण त्यांच्यासोबतच निघून गेले.

X
COMMENT