Editorial / या खेकड्यांनो परत फिरा रे... (अग्रलेख)

आपल्या पायाखालची वाळू सरकायला लागली की राजकारण्यांना खापर फोडायला बहुधा अलीकडच्या काळात काेणता ना काेणता प्राणी लागताे

संपादकीय

Jul 13,2019 08:14:00 AM IST

पाण्याऐवजी गाळानेच जास्त भरलेल्या धरणातील थोडेसे पाणी असलेल्या भागात खेकड्यांचे खुले अधिवेशन भरले होते. अधिवेशन पुढे सरकत असताना अध्यक्षांसह सर्व जण मागे मागे जात होते. अर्थातच एकमेकांचे पाय ओढत होते. पाय ओढणे आणि नांगी मारणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार. सर्वच जण मागे गेले तर अधिवेशनाला कोणीच राहणार नाही, हे लक्षात घेऊन अध्यक्ष खेकडाेबांनी नांगी टाकीत (म्हणजे “”हात’ जोडीत!) सर्वांना पाय न ओढण्याची विनंती केली. विषय महत्त्वाचा असल्याने तेवढ्यापुरती ती मान्यही झाली. विषय होता कोकणातील तिवरे धरण फुटल्यापासून राज्यातील खेकडा प्रजातीवर अाेढवलेले संकट हा. तिवरे धरण बांधून उणीपुरी १९ वर्षे होत नाही तोच त्याला माेठ्ठे भगदाड पडले. प्रलयंकारी हाहाकार माजला, त्यात २३ निष्पाप गावकऱ्यांचे बळी गेले. त्यांचा संसार अक्षरश: वाहून गेला. मात्र त्याचे खापर खेकड्यांच्या माथी फुटले.


आपल्या पायाखालची वाळू सरकायला लागली की राजकारण्यांना खापर फोडायला बहुधा अलीकडच्या काळात काेणता ना काेणता प्राणी लागताे. यापूर्वी खडकवासला धरणाचा कालवा फुटला त्या वेळी उंदीर आणि घुशींवर खापर फुटले. उंदीर आणि घुशींनी धरणाच्या पायथ्यातील मातीत बिळे केल्यामुळे धरण फुटल्याचे सांगत मंत्र्यांनी “महाजनकी’ मिरवली. आताही मंत्री “सावंत’गिरी करीत खेकड्यांवर खापर फोडून नामानिराळे झाले. त्यामुळे खेकड्यांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविकच. अनेक खेकडे धरण सोडून गेले. असे स्थलांतर होत राहिले तर राज्यात खेकडे उरणार नाहीत, अशी भीती निर्माण झाली. तर या अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्रातील धष्टपुष्ट अन् विदर्भ-मराठवाड्यातील कुपोषित खेकडे जातीने हजर झाले. यापूर्वी विधानसभेत धुमाकूळ घातल्यामुळे बदनाम झालेल्या उंदीर, घुशींसह अन्य भाईबंदांनाही बोलावण्यात आले हे लक्षणीय ठरावे. पाय ओढण्यात, कोणतीही गोष्ट खचवण्यात समस्त प्राणिमात्रांना गुरुस्थानी असलेल्या राजकारण्यांनी बेछूट आरोप करू नयेत. अन्यथा त्यांच्या पायाखालची वाळू खचवण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे माणसे मासोळ्यांची भूक खेकड्यांवर भागवतात. त्यांच्या बलिदानाची नोंद कुठेही नसते. म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांना गोड्या पाण्याचे सरोवर उपलब्ध करावेत, तमाम प्राण्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्यावरील दाेषाराेपणास बंदी घालावी,”नांगी ठेचणे’, “नांगी टाकणे’ अशा वाक्प्रचारांना मनाई करावी, असे ठराव पारित करण्यात आले. खरे तर राजकारणातील खेकड्यांमुळे अनेक बाबींना तडे जातात, त्या भुईसपाट हाेतात हे सिद्ध झालेले आहे. मात्र इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, घाेरपडीमुळेच नरवीर तानाजीला कोंढाणा सर करता आला. मात्र हा “तानाजी’ खेकड्यांवर मुक्ताफळे उधळू लागला आहे. राजकारण्यांमुळे धरणे असुरक्षित बनली असली तरी आपली रिअल इस्टेट साेडायची नाही, या निर्धारासह “या खेकड्यांनो परत फिरा रे...’ असं आवाहन करीत अधिवेशन समाप्तीची घंटा झाली.

X
COMMENT