आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पारंपरिक संकेतव्यूह नाकारणारा लेखक

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

साठोत्तरीच्या दशकातील मुुंबईतील माणसाचे निम्न मध्यमवर्गीय आयुष्य, त्यातलं खुराडेपण, शारीर व्यवहारांमधली ऊर्जा आणि अपरिहार्यता, मानवी नातेसंबंधातील विविध आयाम, समाज व व्यक्ती यांच्यातील द्वंद्व, माणसाचा अंतरीचा संघर्ष, भोवतालीचेे विपरीत वर्तमान, हिणकस राजकारण यांना काही अंशी मराठीत आणि मोठ्या प्रमाणात इंग्रजीतही एकाच ताकदीने मोकळ्या-ढाकळ्या नैसर्गिक शैलीत मांडणारे कादंबरीकार साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त किरण नगरकर यांचे मुंबईत गुरुवारी निधन झाले. मराठी चाळ संस्कृतीला जागतिक पटलावर नेणाऱ्या रावण आणि एडी, द एक्स्टाज आणि रेस्ट इन पीस या त्यांच्या कादंबरी त्रयींमधून त्यांनी मुंबईचा गेल्या सहा दशकांतील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घुसळणीचा तिरकस भाषेत आढावा घेतला. ‘सात सक्कं त्रेचाळीस, ककोल्ड, बेडटाइम स्टोरी, गॉड्स लिटल सोल्जर आदी नगरकर यांच्या कलाकृती मोलाच्या मानल्या जातात. कादंबरी, नाटके, चित्रपटांच्या पटकथा अशा विविध प्रकारच्या साहित्याचे नगरकर हे धनी होते. १९४२ मध्ये मुंबई येथे ब्राह्मो समाजाची तत्त्वे मानणाऱ्या कुटुंबात किरण यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा ब्राह्मो समाजाच्या चळवळीशी अत्यंत जवळीक साधून होते. घरची “अत्यंत’ म्हणावी अशी गरिबी. मात्र असे असले तरी त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व खूप वाटत असल्याने शिक्षणाची आबाळ झाली नाही. चौथीपर्यंत मराठी माध्यम, पण तेथून पुढे चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांनी वाळीत टाकलेल्या नगरकर कुटुंबाला इकडे तिकडे फिरावे लागले असल्याने एका ख्रिश्चन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किरण नगरकरांना प्रवेश देण्यात आला आणि तिथून सर्वच शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केले.  वयाच्या ३२ व्या वर्षी “सात सक्कं त्रेचाळीस’ ही नगरकरांची पहिली मराठी कादंबरी प्रकाशित झाली, मात्र त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये फारसे लेखन केलेच नाही. बुद्धिजीवी वर्ग वगळता या कादंबरीची फारशी कोणी दखल घेतली नाही म्हणून त्यांनी इंग्रजीकडे मोर्चा वळवला होता. “सात सक्कं’ची मोकळी-ढाकळी नैसर्गिक शैली, तिच्यात सतत जाणवणारा एक प्रकारचा तिरसटपणा, काळ आणि अवकाशाची वारंवार उलटपालट करून केलेल्या आशयसूत्रांच्या मांडणीतले नावीन्य किंवा कादंबरीची पारंपरिक चौकट नाकारणारी प्रयोगशील बांधणी यामुळे कादंबरी वादाच्या भोवऱ्यात जरी सापडली असली तरी साठोत्तर दशकातील महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये “सात सक्कं’चा अंतर्भाव केलेला दिसतो.  मध्यमवर्गीय जाणिवांवर पोसलेल्या पारंपरिक स्वरूपाच्या मध्यमवर्गीय मराठी वाचकांमध्ये नगरकरांच्या लेखनाला फारसे स्थान मिळाले नाही. मौजेसारख्या गंभीर व दर्जेदार प्रकाशनाचे पुस्तक असूनही या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला सत्तावीस वर्षे लागली होती. याउलट इंग्रजीतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या इतर कादंबऱ्यांच्या लाखोंनी प्रती संपल्या. लेखनाशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या राजकारणापासून कटाक्षानं अलिप्त राहणारा हा मनस्वी कादंबरीकार ‘निवडितो ते सत्त्व’ या धारणेनं लिहीत राहिला. कुठल्याही सभा-संमेलनातून न दिसणारे नगरकर यापुढेही त्यांच्या साहित्यातून भेटत राहतीलच!