आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी विचारांचा चिखल

2 वर्षांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

कामासाठी किंवा कॉलेजसाठी घराबाहेर पडणाऱ्या देशातील प्रत्येक युवतीच्या पोटात तिची दुचाकी पार्क करताना खोल खड्डा पडतोय. आपल्यावर कुणाची पाळत आहे का, आपल्या दुचाकीची हवा काढण्याचा कुणी कट केला आहे का, दुचाकी पंक्चर झाल्यास मदतीसाठी केलेली याचना जीवघेणी ठरेल का, पोलिसांना केलेला फोन हद्दीच्या वादात अडकेल का आणि पुरुषांच्या पाशवी वासनेपाेटी आपला बळी जाईल का... अशा अनेक शंकांचे भोवरे तिचा मेंदू कुरतडत आहेत. अशा वेळी, तिला दिलासा मिळण्याऐवजी, प्रियंका रेड्डी पाठाेपाठ शेजारच्या उमरग्यातील प्रकरणानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. अशा घटनांनंतर नेहमीप्रमाणे उमटणारे प्रतिसाद या वेळीही अपवाद नाहीत. आरोपींना कठोर शासन व्हावे, दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी या मागण्या नवीन नाहीत. मात्र, या वेळी धक्कादायक आहेत त्या तीन प्रकारच्या भयंकर प्रतिक्रिया. यातील सर्वात संतापजनक आणि लज्जास्पद असा पहिला प्रकार आहे, तो या प्रकरणानंतर पोर्न साइट्सवर लाखोंनी केलेल्या सर्चचा. बलात्कार करताना आरोपींनी त्या दुष्कर्माचा व्हिडिओ काढला असेल आणि तो नेटवर उपलब्ध असेल. देशातील काही लाख माणसांच्या मनात आलेला विचार आणि त्यांनी तो व्हिडिओ शोधण्याचा केलेला प्रयत्न हाच या हिणकस मानसिकतेचा पुरावा आहे. सामूहिक बलात्काराची बीजं अशा प्रकारच्या किडक्या सामूहिक मानसिकतेत आहेत, ज्याला कोणत्याही कठोर कायद्याने शिक्षा करता येणार नाही किंवा जाणीव जागृतीद्वारे प्रतिबंधही घालता येणार नाही.  दुसरा हिणकस प्रकार आहे तो प्रियंका प्रकरणातील आरोपींपैकी एकाच्या धर्मावरून सुरू असलेले राजकारण. आणि तिसरा प्रकार आहे तो समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ खासदार जया बच्चन यांनी लोकसभेत केलेले विधान. अभिनेत्री या नात्याने बच्चन या समाजातील महत्त्वाचा आवाज आहेत. सभागृहाच्या ज्येष्ठ सदस्य या भूमिकेतून त्या देशातील कायदे आणि धोरणे तयार करण्याच्या प्रक्रियेतील जबाबदार व्यक्ती आहेत. अशा वेळी बलात्काराच्या आरोपींना रस्त्यावर ठेचून मारण्याची भाषा त्यांच्या तोंडी अप्रस्तुत ठरते. घटनेतील क्रौर्यामुळे उद्विग्न सर्वसामान्य महिलेने अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि खासदार बच्चन यांनी अशी हिंसक प्रतिक्रिया देणे यात मोठा फरक आहे. बलात्कारासारख्या हिंसेची बीजं समाजाच्या रानटी मानसिकतेत सापडत असताना, त्याच्या उच्चाटनाचे आव्हान खिजवत असताना, देशातील नेतृत्वाच्या तोंडची ही सवंग विधाने भविष्यातील हिंसेची आणि रानटी मनोवृत्तीची नांदी ठरतात. मुळात एवढी चर्चा, कठोर कायदे आणि फास्टट्रॅक कोर्ट यानंतरही बलात्काराच्या जीवघेण्या, गलिच्छ आणि अमानुष घटनांना पायबंद न बसणे हा संपूर्ण समाजाचा पराभव आहे. कारण, शेवटी कठोर कायदे आणि संसदेतील भाषणे हे झाले वरवरचे उपाय. महिला सक्षमीकरणाच्या कोरड्या आरोळ्यांनी आणि सेल्फ डिफेन्सच्या फसव्या उपायांनी हा प्रश्न सुटत नाही, कारण याची मुळे पुरुषी पाशवी विचारांच्या चिखलात घट्ट रुतलेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...