आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर, भूकंप, आग, इमारत कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे माणसांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना घडत असतात. वेळोवेळी सरकारकडून बळींना अथवा नातेवाइकांना नुकसान भरपाईदेखील दिली जाते. पण लहान-मोठ्या अपघातात दर दिवशी चिरडल्या जाणाऱ्या, जखमी होणाऱ्यांच्या वेदना या केवळ वैयक्तिक होऊन जातात. या अपघातांमागील कारणे पाहिल्यास वाहतुकीचे नियम तुडवणे, मद्यप्राशन करून किंवा बेदरकारपणे वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षेचा विचार न करणे,अरुंद रस्ते आणि वाहनांची प्रचंड वर्दळ, रस्ते विकासाची कामे वर्षानुवर्ष रेंगाळत पडणे, ही अशी असंख्य कारणे सांगता येतील. पण या कारणांमुळे बळी गेलेल्यांची जबाबदारी कोणाची?  औरंगाबादहून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोंडाईचा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत १३ जणांचा बळी गेला. शहाद्याहून दोंडाईचाकडे येणाऱ्या अवजड कंटेनरने बसला जोरदार धडक दिली आणि एका बाजूने बस अक्षरश: चिरत नेली. प्रवासी एकमेकांवर आदळले गेले. अनेक दबले गेले होते. काहींच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. १२ जणांचा तर जागीच मृत्यू झाला. घटना रात्रीची आणि बस लांब पल्ल्याची असल्यामुळे मृतांची ओळख पटत नव्हती. राज्य शासनाची बस असल्याने या अपघाताची रीतसर चौकशी तरी होईल. अर्थात चौकशीअंती फार काही हाती लागेल, अशी आशाच नाही. पण खासगी वाहनांच्या अपघातांची केवळ नोंद होते. त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे, तसेच जबाबदारांना शासन करण्याची यंत्रणाच आपल्याकडे अस्तित्वात नाही.  रस्ते अपघातांचा वाढता धोका ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने २०११ ते २०२० हे दशक रस्ता सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे म्हणून जाहीर केले होते. जगभरात त्यावर ठोस कामेही होत आहेत. पण आपल्या देशात त्या दिशेने किती काम झाले? याची अजून कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही. गत वर्षापेक्षा या वर्षी रस्ते अपघातातील मृतांचा आकडा कमी झाला आहे, यावर मात्र आम्ही धन्यता मानतो. बस असो की खासगी वाहने, या अपघातांमधील मृतांचा आकडा किंवा प्रत्यक्ष परिस्थिती जेव्हा आपण बघतो, तेव्हा प्रचंड हळहळतो. पण थोड्याच दिवसांत घटनेचे विस्मरण होते. कोणत्याही उपाययोजना आपण करत नाही. आठवण होण्यासाठी पुन्हा तशीच एखादी घटना घडण्याची वाट पाहावी लागते. हे या देशातील नागरिकांचे दुर्दैव आहे. जळगाव-औरंगाबाद ह्या रस्त्याचे गेल्या काही वर्षांपासून विकासाचे काम सुरू आहे. या महामार्गावर जागतिक दर्जाचे अजिंठा हे पर्यटन स्थळ आहे. पण रस्ता सुरक्षित प्रवासाचा नाही. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली.अजिंठ्याचा जागतिक पातळीवरील क्रमांकही घसरला. एवढी प्रचंड अनास्था देशातील रस्ते, त्यांचा विकास आणि त्यावरील सुरक्षित प्रवासाबाबत आहे. रस्ते अपघातात दरवर्षी देशात दीड लाख लोकांना प्राण गमावावे लागतात. पण त्याचे कुणालाच सोयरसुतक नाही