Home | Divya Marathi Special | divyamarathi editors diary : Sajay Avate

पुण्याची विद्या माहेर सोडून कोणत्या सासरी गेली म्हणे?

संजय आवटे | Update - Apr 25, 2019, 09:19 AM IST

‘आपला देश उभा आहे, ताे मूठभर अतिशहाण्यांमुळे नाही, तर इथल्या सामूहिक समंजसपणावर..’

 • divyamarathi editors diary : Sajay Avate

  माढा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान झालं. त्यासाठी पुण्यातून माढ्याकडे जात असताना वाटेत एक छान ढाबा लागला. हल्ली हे ढाबा प्रकरण देशभर दिसत असतं. ‘नॅशनल परमिट’ असणाऱ्या पंजाबी ट्रकचालकांनी देशभर ढाबे सुरू करवले आणि पंजाबी जेवणही सर्वदूर पोहोचवलं. अशाच एका ढाब्यावर एक ट्रकचालक भेटला. तो उमरग्याजवळच्या मुळजचा. ट्रकच्या निमित्ताने अवघा देश चाकांखाली घालणारा हा बालाजी सांगू लागला, ‘साहेब, ज्यांना आपण शहाणे म्हणतो ना, त्यांनीच या देशाचा इस्कोट करून टाकलाय. उलट अडाणी माणसं बरोबर निर्णय घेतात. त्यांना राजकारण नीट कळतं. हे अतिशहाणे लोक वरच्या भपक्याला भुलतात.’
  ढाब्यावर काम करणाऱ्या केराबाईंनी त्याच्या म्हणण्यात आपला होकार मिसळला. त्या म्हणाल्या, ‘अगदी बरोबर. अहो, सगळ्यांनी गोळामेळ्यानं राहायचं सोडून काय ही सारखी लढाईची भाषा? कशाला भांडण आणि कशाला काय?’ झाडू मारत असलेल्या अन्वरनंही मग चर्चेत भाग घेतला आणि आमची मैफल बराच काळ सुरू राहिली. पण बालाजीचं ते वाक्य डोक्यात घर करून राहिलं - ‘ज्यांना आपण शहाणे म्हणतो ना, त्यांनीच या देशाचा इस्कोट करून टाकलाय.’


  संध्याकाळी पुण्यातल्या मतदानाची आकडेवारी समजली आणि धक्काच बसला. बालाजीचा मुद्दा अगदीच कमी महत्त्वाचा नव्हता. एरवी शहाणपणाचा मक्ता स्वतःकडे असल्याच्या थाटात वावरणारे लोक राजकीय प्रक्रियेबद्दल मात्र उदासीन असतात किंवा राजकारणाविषयीचे त्यांचे आकलनच अपुरे असते. थेट जमिनीशी नातं नसल्यामुळे वरच्या भपक्याचे त्यांना आकर्षण वाटते.

  पंडित जवाहरलाल नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आलं ते चाळीसच्या दशकात. नेहरू त्यात प्रांतिक मंडळाच्या निवडणुकांचा अनुभव सांगतात. नेहरू म्हणतात, खेड्यापाड्यात जाऊन प्रचारसभा घेणं महाकठीण असतं. कारण, तिथं लोकांना जमिनीवरचे मुद्दे माहीत असतात. राजकारणाविषयीचं आकलन अधिक सखोल असतं. शहरी आणि उच्चवर्गीयांपुढं बोलणं फार सोपं. जरा चटपटीत बोललं तरी ते बळी पडतात. कारण, त्यांना ना राजकारण नीटपणे समजतं, ना जमिनीवरचे प्रश्न. नेहरू हे तेव्हा म्हणाले, ‘जेव्हा शहरीकरण हाच अपवाद होता. आज शहरीकरण वाढत असताना हे प्रकर्षाने जाणवत जातं.’

  पुण्यासारख्या शहरांत जे मतदान झालं, त्यातही उपनगरांचा आणि स्थलांतरितांचा, झोपडपट्ट्यांचा वाटा मोठा आहे. ज्यांना ‘अस्सल पुणेकर’ म्हटले जाते, अशा सोसायट्यांमधील मतदान अत्यल्प आहे. एरवी, सर्वाधिक ‘व्होकल’ मानला जाणारा हा वर्ग. म्हणजे पुण्यात प्रत्येक जण विचारवंत असतो आणि त्याच थाटात तो बोलतो. चंद्रपूरच्या एखाद्या मराठीच्या प्राध्यापकालाही दडपण येईल अशा शैलीत अस्सल पुणेकर शिपाईही बोलत असतो. दूर कशाला, मतदार जागृतीचे जेवढे कार्यक्रम पुण्यात झाले, त्याच्या निम्मेही उर्वरित महाराष्ट्रात झाले नसतील. निवडणुकांवर राजकीय चर्चा पुण्यात जेवढ्या झडल्या, तशा कुठेही घडल्या नसतील. टीव्ही चॅनल्सवरचे सर्वाधिक अभ्यासक पुणेस्थित आहेत. तरीही पुणेकर मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. आमच्या गडचिरोलीतला आदिवासी, बीडच्या दुर्गम गावातला शेतमजूर भरदुपारी उन्हातान्हात जाऊन मत देतो. त्यासाठीचा रोजगार बुडवतो. आणि, एरवी शिळोप्याच्या गप्पा मारणाऱ्यांना आणि दुपारची वामकुक्षी व्रतस्थपणे सांभाळणाऱ्यांना मात्र राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यात काहीच रस नसतो, हे काय सिद्ध करते?
  तो संवाद प्रसिद्ध आहे. गांधीजींना लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले होते, ‘तुमच्या देशात सगळे अडाणी लोक. आम्ही तुम्हाला एवढ्या शिस्तीचं गव्हर्नन्स दिलं. आमच्या पश्चात मात्र इथं फक्त गोंधळ असेल.’ गांधी हसले आणि म्हणाले, ‘गोंधळ असेलही, पण तो आमचा गोंधळ असेल.’ गांधीजी एके ठिकाणी म्हणाले होते, ‘कथित शहाण्यांपेक्षा इथल्या साध्या-भाबड्या माणसावर माझा भरवसा अधिक आहे.’

  कॉर्पोरेटी चकचकीतपणाचं गारूड असलेल्या अशा पुणेरींनीच या देशाला ‘अराजकीय’ करण्याचा चंग बांधलाय. त्यांना पंतप्रधान एखाद्या सीईओसारखा हवा. सगळं चकचकीत हवं. त्यांना झोपडपट्ट्या नकोत. ओंगळवाणं काही नको. एखाद्या कुशल व्यवस्थापकासारखे नेते हवेत या देशात. त्यांना सगळं कॉर्पोरेट करायचं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं बहुपेडी राजकारण, सहकाराचं अर्थकारण यांना समजलं नाही. डिसिप्लिन, मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट अशा परिभाषेत राजकारणाविषयी भाष्य करणाऱ्यांना जमिनीवरचं राजकारण कळावं ते कधी? सुनील खिलनानी आपल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणं, ‘या देशात राजकारण खूप आहे हे खरंच, पण त्याहून खरं हे की, राजकारणामुळंच भारत आहे!’ आणि, हे ‘राजकारण’ इथल्या साध्यासुध्या माणसाला नीट समजले आहे. पुणेकरांच्या ‘बस की बात’ नाहीए ती!

  हा देश उभा आहे, ते मूठभर अतिशहाण्यांमुळे नाही, तर इथल्या सामूहिक समंजसपणावर, हेच अशा घटनांमधून अधोरेखित होत असते. बाकी, त्यांना गप्पा मारू द्यात, आपल्याला हा देश वाचवायचाय. वाढवायचाय. असो...

Trending