आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का घडतात हैद्राबाद आणि उन्नाव सारख्या घटना..? सांगत आहेत मनोविकारतज्ज्ञ डाॅ. सुधीर भावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'किमान आणखी दोन तीन पिढ्या असे प्रकार सुरूच राहील'
  • 'पुढे ते होऊ नये म्हणून आतापासूनच समानतेचे संस्कार करावे लागतील'

अतुल पेठकर

नागपूर- उन्नाव, हैद्राबाद, वाशिम वा नागपूर जिल्ह्यातील घटना असो. या सर्व घटनांच्या मूळाशी आपले पुरूषप्रधान संस्कृतीचे संस्कार आहेत. घराघरांत लहानपणापासून हे संस्कार मुलांच्या मनावर बिंबवल्या जातात. मुलांची मानसिक जडणघडणही तशीच होते. त्यातून स्वामित्त्वाची भावना मूळ धरत जाते. त्यामुळे अशा घटना थांबवायच्या असतील तर आतापासूनच मुला-मुलींवर समानतेचे संस्कार रुजवणे सुरू केले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन मध्यभारतातील ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ डाॅ. सुधीर भावे यांनी ‘दिव्य मराठी’शी बातचित करताना केले.
लग्न, मुंज वा घरातील कोणत्याही समारंभात मुलांना प्राधान्य दिले जाते. मुलांचा जानोसा वर असतो तर मुलीवाले खालच्या वा तळमजल्यावर थांबतात. मुलीकडच्यांनी वराकडच्यांची सेवा करायची असे अनेक प्रकार होतात. रुढीवादी आणि परंपरावादी घरातून हे अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यातून मुलींकडे दुर्लक्ष होते. आपले चित्रपट, नाटक वा गाण्यातूनही स्वामित्त्वाची भावना बळावतील असेच दाखवले जाते. हीच हीरोईन हवी असे हीरोने एकदा ठरविल्यानंतर शेवटी तो कसाही असला तरी हीरोईनला मिळवतोच. त्याचे परिणामही मुलांच्या मनावर होतात, याकडे डाॅ. भावे यांनी लक्ष वेधले.


मी पुरूष आहे आणि मी हिच्यापेक्षा वरचढ आहे, ही स्वामित्त्वाची भावना अगदी लहानपणापासून घरात तयार होते. घरात वडीलांचे स्थान नेहमी वरचे असते. आईने वडीलांची सेवा करणे गृहीत असते. उलटे क्वचितच पाहायला मिळते. मुलाकडे थोडे जास्त लक्ष दिले जाते. त्यातून स्वामित्त्वाची भावना बळावत जाते. घरातील भावाने काही मागितले तर ते बहिणीने द्यायला हवे. पण, याउलटे अपवादानेच होते, असे डाॅ. भावे म्हणाले. मी ईच्छा दाखवली तर ही माझी व्हायलाच हवी अशी भावना वाढीस लागत आहे. या शिवाय समाजात उग्रपणा वाढीत आहे. ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’ म्हणजे मला हवी असलेली गोष्ट ताबडतोब आणि आत्ताच मिळायला हवी, अशा सवयी मुलांना लहानपणापासून घरातूनच लागतात. आई-वडीलांनीही मुलांवर असे संस्कार होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.


मी परदेशात बऱ्याचदा गेलोय. तिथे मुली अगदी उघड्या नागड्या, कमीतकमु कपड्यातल्या असल्या तरी तिथे स्वामित्त्वाची भावना कधी पाहायला मिळाली नाही. अगदी तिथे कोणी नृत्यांगना वा वारांगणा असली तरी तिला लोक सेक्स आॅब्जेक्ट म्हणून भलेही पाहातील. पण, माझा हिच्यावर अधिकार आहे, अशी भावना अजिबात नसते. आदरयुक्त वागणे हा पाश्चात्य संस्कृतीमध्ये नेहमी दिसून येते. ते आपल्याकडे दिसून येत नाही, असे डाॅ. भावे यांनी स्पष्ट केले.


तिथे लहानपणापासून मुला मुलींवर समानतेचे संस्कार केले जातात. हे संस्कार हळूहळू आपल्या समाजात रूजतील आणि स्वामित्त्वाची भावना कमी होईल, तेव्हा अापल्याकडे असे प्रकार होणार नाहीत. पण, किमान आणखी दोन तीन पिढ्या असे प्रकार सुरुच राहील. पुढे ते होऊ नये म्हणून आतापासूनच समानतेचे संस्कार करावे लागतील, असे डाॅ. भावे म्हणाले.
निर्भयानंतर कायद्यात अनेक बदल घडले, अनेक कठोर तरतुदी झाल्या. पण, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. आणि होणार नाही. समाजात मूलभूत बदल होईपर्यत काहीही होणार नाही. आणि त्यासाठी एकमेकांकडे आदराने पाहाणे व स्वामित्त्वाची भावना काढून टाकणे हाच त्यावर उपाय आहे.

काॅस्ट बेनेफिट अॅनेलिसीस


मानवी वागणुकीत नेहमी एक काॅस्ट बेनेफिट अॅनेलिसीस असते. म्हणजे एखाद्या कृत्यातून फायदा किती व तोटा किती होईल याचा आरोपी विचार करतो. समजा दारू पिऊन घरी येऊन पत्नीवर बलात्कार केला. तर त्यात सेक्सची पूर्ती झाल्याचा फायदा व समाधान आहे. पण, त्या नंतर त्यांचे आपसातले संबंध दुरावतील, प्यायलेला नसेल तेव्हावी पत्नी त्याला नाकारेल, घरातील स्रीयांवर बलात्कार केला तर समाजात लांछन लागेल भीती असे तोटे असतात. समाजात बहिष्कृत करील, अशी भीती असते. लहान पाच वर्षांच्या मुलीबाबत असे प्रश्न उभेच राहात नाही, याकडे भावेंनी लक्ष वेधले.


(देश, विदेश आणि मनोरंजनासह आपल्या शहरातील अपडेट बातम्यांसाठी इंस्टॉल करा Divya Marathi App)