Home | Divya Marathi Special | divyamarathi ground report of west Maharashtra loksabha Constituency

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट : पश्चिम महाराष्ट्र , काेणता झेंडा घेऊ हाती?

संजय आवटे | Update - Apr 19, 2019, 10:17 AM IST

शिक्षणसम्राट, सहकारसम्राट नेत्यांना आपल्या गळाला लावण्यात भाजपला मिळाले यश

 • divyamarathi ground report of west Maharashtra loksabha Constituency

  पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे अनेक मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रातील. काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रच प्रामुख्याने त्यांच्यासोबत उभा राहिला. २०१४ च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या चार जागा जिंकल्या, त्या याच विभागातील. सहकार, साखर कारखाने यांचे जाळे असणारा आणि तुलनेने समृद्धी असणारा असा पश्चिम महाराष्ट्र. विदर्भ वा मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्राची स्थिती बरी असली तरी इथले प्रश्न आणखी वेगळेच आहेत. छोट्या-छोट्या गावांमध्ये गेल्यावर या प्रश्नांचे गांभीर्य जाणवते.

  पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त आहेत, असे म्हटले जाते. गावागावात तालेवार आणि धनाढ्य नेते दिसतात. शिक्षणसम्राट, सहकारसम्राट नेत्यांची किती तरी नावे सांगता येतील. अशा अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावण्यात भाजपला यश आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच ही प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपच्या दिशेने सरकले. अर्थात, नेत्यांनी पक्षांतर केले म्हणून कार्यकर्ते आणि सामान्य मतदार त्यांच्यासोबत असतीलच, अशी खात्री नाही. त्यामुळेच या विभागातील सर्व मतदारसंघांतील लढती चुरशीच्या आहेत. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत २३ ला, तर शिरूर, शिर्डीमध्ये २९ एप्रिलला मतदान होत आहे. सोलापुरात १८ एप्रिललाच मतदान होत आहे.

  पुणे : काँग्रेसची पक्षसंघटना दुबळी
  अगदी शेवटपर्यंत उमेदवारच मिळू नये, एवढी लाजिरवाणी अवस्था काँग्रेसची होती. अखेर मोहन जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपने विद्यमान मंत्री गिरीश बापट यांना रिंगणात उतरवले आहे. गेल्या वेळी भाजपच्या अनिल शिरोळेंनी तीन लाखांहून अधिक मताधिक्याने ही जागा जिंकली होती. भाजपचे मजबूत संघटन, पालिकेवरील सत्ता, सर्व विधानसभा मतदारसंघांवरील पकड, पुण्यातील विकासकामे, शहरी मतदारांचे मोदीप्रेम यामुळे भाजपचा आत्मविश्वास थेटपणे जाणवतो आहे.

  शिरुर : चौकार अवघड!
  शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव- पाटील चौथ्यांदा रिंगणात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. ते शिवसेनेचेच संपर्क नेते होते. आढळरावांविषयीची आत्यंतिक नाराजी, काँग्रेस- राष्ट्रवादीचे जोरकस पक्षसंघटन, डॉ. कोल्हे यांचा करिष्मा आणि मोठ्या संख्येने असणारी माळी मते हे डॉ. कोल्हेंचे बलस्थान आहे. अर्थात, आढळरावांचा व्यक्तिगत संपर्क लक्षात घेता ही निवडणूक चुरशीची असणार आहे.


  बारामती : सुप्रियांची दमछाक
  शरद पवारांच्या या होमपीचवर गेल्या वेळी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या, पण त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. खासदार सुप्रिया सुळे यांना आता भाजपच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा हे आव्हान अधिक कडवे आहे हे खरेच, पण गेल्या निवडणुकीतल्या आणि या वेळच्या सुप्रिया यात खूप फरक आहे. त्यामुळे त्या आत्मविश्वासाने या आव्हानाला सामोऱ्या जात आहेत. दौंड येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या कांचन या पत्नी आहेत, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या कांचन या जवळच्या नातेवाईकही आहेत! सुप्रियांचा व्यापक जनसंपर्क, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि विकासकामे यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो आहे. मात्र, ही लढत खुद्द शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसने कमालीच्या गांभीर्याने घेतली आहे.


  माढा : कोण कोणत्या पक्षाचे?
  शरद पवार या वेळी माढा मतदारसंघातून उभे राहणार, या बातमीने माढा देशभर चर्चेत आले. शरद पवार २००९ मध्ये माढ्यातून विजयी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आणि मोदी लाटेतही ते विजयी झाले. मात्र, त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह यांच्या या निवडणुकीच्या तोंडावरील भाजप प्रवेशाने चित्र बदलले. भाजपच्या संपर्कात असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसमधून आलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून रिंगणात उतरवले. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. विजयराव मोरे किती मते खातात, यावर हा निकाल अवलंबून आहे.


  सोलापूर : तीन पायांची शर्यत
  माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा हा एकेकाळचा बालेकिल्ला. मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांच्याकडून शिंदे पराभूत झाले. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर भाजपने जय सिद्धेश्वर महाराज यांना उभे केले असून, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर स्वत: मैदानात उतरले आहेत. आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना प्रकाश आंबेडकरांसाठी एकत्र आल्या आहेत. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाचे नेते त्यांच्यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत. या मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातीचे १७, तर मुस्लिम समाजाचे १४ टक्के मतदान आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात साडेतीन लाख लिंगायत, ३ लाख पद्मशाली, तीन लाख दलित, अडीच लाख मराठा, अडीच लाख मुस्लिम, दोन लाख धनगर अशी मते आहेत. भाजप- शिवसेनेपेक्षाही कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे संघटन अधिक तगडे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीने निर्माण केलेले वातावरण कायम राहिले, तर येथे वेगळा निकाल पाहायला मिळू शकतो.


  कोल्हापूर : राष्ट्रवादी X काँग्रेस
  कोल्हापूर म्हणजे अस्सल मराठी संस्कृतीच्या राजधानीचे शहर. सहकारी संस्था, साखर कारखाने, शिक्षण संस्था, गावागावातले गट यांच्याभोवती इथले राजकारण विणले गेले आहे. निवडणुकीच्या राजकारणात कोल्हापूरने रक्ताचे सडेही पाहिले आहेत. अत्यंत गुंतागुंतीचे राजकारण असलेल्या या जिल्ह्यात महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा व्यक्तिगत संघर्ष गेल्या आठ- दहा वर्षांपासून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यातच गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा मुख्य लढत आहे. मोदी लाट असतानाही गेल्या वेळी महाडिक निवडून आले. पण, तेव्हा माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे महाडिक यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव यांचे संजय मंडलिक हे चिरंजीव. गेल्या निवडणुकीत महाडिक यांच्या पाठीशी असलेले, सतेज पाटील या वेळी थेट विरोधात उभे ठाकले आहेत. भाजप- शिवसेनेचे पक्षसंघटन लक्षात घेता, ही जागा राखणे राष्ट्रवादीला सोपे नाही.

  हातकणंगले : शेट्टींना आव्हान
  हा मतदारसंघ मुख्यत: ऊस पट्टा आणि कारखानदारीचा भाग म्हणून ओळखला जातो. ऊस प्रश्नावरील आंदोलने आणि सक्रिय राजकारणातून राजू शेट्टी यांनी या भागात आपले स्थान निर्माण केले आहे. या मतदारसंघातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजप बलदंड असतानाही लोकसभेत मात्र राजू शेट्टी बाजी मारतात. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील यांना उमेदवारी दिली आहे. २०१४च्या निवडणुकीत राजू शेट्टी जिंकले, तेव्हा ते मोदींसोबत होते. मात्र, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही, असे म्हणत राजू शेट्टी बाहेर पडले आणि काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीत सामील झाले. आता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील असे राजू शेट्टी यांचे दोन खंदे समर्थक त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. ही निवडणूक शेट्टींसाठी सोपी नाही. मागच्या दोन्ही निवडणुकांत शेतकऱ्यांनी त्यांना मतेच काय, निवडणूक लढवण्यासाठी पैसेही दिले होते. धनदांडग्या नेत्यांच्या गर्दीतील नि:स्पृह प्रतिमा हेच राजू शेट्टी यांचे बळ आहे.

  सातारा : कॉलर टाइट?
  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच बातम्यांमध्ये उमटत असतात. उदयनराजे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदारकीसाठी लढत आहेत. राष्ट्रवादीतून भाजप आणि भाजपमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही उदयनराजे तीन लाख 84 हजार मते मिळवून विजयी झाले होते. मधल्या काळात या मतदारसंघात भाजपने चांगली तयारी केली. नरेंद्र पाटीलदेखील प्रभावी आहेत. शिवाय, उदयनराजेबद्दलची नाराजी आहेच. त्यामुळे उदयनराजेंनी ही लढत गांभीर्याने घेतली आहे.


  सांगली : वंचित आघाडी निर्णायक
  भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीने निवडणुकीत उतरलेले मूळचे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यात या मतदारसंघात लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी प्रचारात आणि लोकसंपर्कात मोठी आघाडी घेऊन आव्हान उभे केले आहे. 2014 च्या निवडणुकीत संजय पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांना पराभूत केले होते. वर्षानुवर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता असलेला हा गड 2014च्या मोदी लाटेत ढासळला. आता मात्र संजय पाटील यांच्याविषयीची नाराजी प्रचंड आहे. खुद्द भाजपमध्येच त्यांनी अनेक शत्रू निर्माण करुन ठेवले आहेत. या परिस्थितीत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ऐनवेळी स्वाभिमानीकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली. या मतदारसंघात दुरंगी लढत होईल असे वाटत असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर निर्णायक ठरतील अशी स्थिती आहे. या मतदारसंघात धनगर, मुस्लिम, दलित मतांवर त्यांची भिस्त आहे. हे मतदान कोठे वळते, यावर निवडणुकीचे समीकरण अवलंबून आहे.


  नगर : कडवी झुंज
  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा डॉ. सुजय याच्या निवडणुकीसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा वाटाघाटीत मिळाली नाही. शेवटी सुजय विखे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. जगताप दोन वेळा महापौर होते. विधानसभेत त्यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला होता. 2014च्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांचा पराभव केला होता. आता काँग्रेसमधील एक गट विखेंसोबत, तर दुसरा गट त्यांच्या विरोधात आहे. भाजपचा एक गटही विखेंना विरोध करतो आहे. विखेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. विखेंना ही निवडणूक सोपी नाही.


  शिर्डी : शिवसेनेसमोर आव्हान
  शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे असा तिरंगी सामना आहे. काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतला. काँग्रेसचे कांबळे हे राधाकृष्ण विखे पाटील गटाचे मानण्यात येतात. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील कांबळे यांना किती मदत करतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात, यावेळी शिवसेनेसाठी परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षांतर्गत रोष आहे. डॉ. सुजय विखे यांचे बळ लोखंडे यांना मिळू शकते. सुरुवातीला शिवसेनेनेकडून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे गेल्यावेळी काँग्रेसमध्ये गेले. पराभव झाल्यानंतर ते भाजपसोबत गेले. शिवसेनेच्या तिकिटासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. आता अपक्ष म्हणून त्यांनी मैदानात उडी घेतली असून, ते कोणाची किती मते खातात, यावर हा निकाल अवलंबून आहे.

Trending