आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींचे मन वळवणे सोपे नव्हते! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शिवसेनेने भाजपची साथ सोडावी, यासाठीची खेळी शरद पवारांची होती हे खरे; पण पाठिंब्यासाठी सोनिया गांधींचे मन वळवणे सोपे नव्हते. अखेर सोनिया गांधी राजी झाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग स्पष्ट झाला. सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये शरद पवारांसोबत पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे योगदान मोठे होते, असे समजते. ‘आणखी काही वर्षे सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण मूल्यांशी तडजोड करता कामा नये,’ अशी भूमिका सोनिया गांधींची होती. अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगेही सत्तास्थापनेस फारसे अनुकूल नव्हते. शिवसेनेसोबत गेल्याने पक्षाला दीर्घकालीन फटका बसेल आणि व्होट बँक दुरावेल, अशी भीती हाेती. सोनियांनी त्यासंदर्भात राहुल आणि प्रियंका यांच्याशीही चर्चा केली. त्या दोघांनाही सोनियांनी व्यक्त केलेली भीती साधार वाटली. तरीही एकदा फेरविचार करायला हवा, अशा मानसिकतेत प्रियंका होत्या. मात्र, सध्याच्या वातावरणात अशा प्रकारची खेळी खेळणे आणि ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर रोखणे ‘धोक्याचे’ आहे, असे सोनियांना तरीही वाटत होते. मात्र, ‘आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे,’ असे जाहीरपणे सांगणारे शरद पवार निकालापासूनच सत्तास्थापनेच्या दिशेने पावले टाकत होते. या खेळाची व्यूहरचना पवारांची असली तरी चेहरा मात्र संजय राऊत हा होता! पुढे प्रकरण एवढे पुढे गेले की सोनियांना निर्णय घेणे भाग होते. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ती जबाबदारी पेलली. या दोघांची ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमा महत्त्वाची ठरली. पृथ्वीराज यांचे कुटुंबच दिल्लीच्या राजकारणात होते. ते स्वतः पीएमओचे मंत्री होते. हायकमांडची निर्णय प्रक्रिया त्यांना माहीत आहे. शिवाय, त्यांच्या काँग्रेस निष्ठेविषयी कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांनी शास्त्रशुद्ध विवेचन करत भूमिका मांडली. दुसरीकडे, पृथ्वीराज यांच्याप्रमाणेच बाळासाहेब थोरात यांचा वारसाही निःसंशय काँग्रेसी. शिवाय, गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या चमकदार कामगिरीतही त्यांचा वाटा मोठा. लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधींनी थोरातांकडे एक मुक्काम केला होता. या नेत्यांनी केलेल्या मनधरणीमुळे सेनेसोबत सरकार स्थापन करताना मूल्यांशी तडजोड होणार नाही, या निष्कर्षापर्यंत सोनिया आल्याचे समजते. या संदर्भात ए. के. अँटनी, जयराम रमेश यांची भूमिकाही सकारात्मक होती. ही ‘खेळी’ बूमरँग ठरणार नाही, हे पवारांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि आम्ही दोघे प्रादेशिक पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू. म्हणजे, काँग्रेस शिवसेनेसोबत गेली, असा प्रचारही तांत्रिकदृष्ट्या कोणी करू शकणार नाही, हा सल्लाही पवार यांचा असल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने  सांगितले.बातम्या आणखी आहेत...