आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने काश्मीर नव्हे, अमेरिकेतून प्रचार करावा; आम्ही शेतकरी, बेरोजगारांचे ज्वलंत प्रश्न मांडणार - सत्यजित तांबे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण ब्रह्मपूरकर 

औरंगाबाद - निवडणूक राज्याची असली तरी भाजप काश्मिरातील ‘कलम ३७०’च्या मुद्द्यावरून प्रचार करत आहे. त्यांनी  काश्मीरच काय तर आणि अमेरिकेतूनही जरी प्रचार केला तरी काँग्रेस पक्ष शेतकरी, बेरोजगारी, मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था हेच ज्वलंत मुद्दे प्रचारात मांडणार, असा दावा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. २०१४ मध्ये राज्यात ज्या ६० जागांवर काँग्रेसचा अत्यल्प मतांनी पराभव झाला या जागांची जबाबदारी आम्ही घेतली असून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी विजयासाठी काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 

> प्रश्न : या विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे?
तांबे : युवक काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून ‘वेक अप महाराष्ट्र’ अभियान राबवले. लाेकांचे प्रश्न जाणून घेत जनतेचा जाहीरनामा तयार करण्याची माेहीम राबवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून २ कोटी लोकांसोबत संपर्क साधला. यामध्ये ‘मैं भी नायक’ या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नांवर जाहीरनामा घेऊन येत आहाेत.


> प्रश्न : मग काँग्रेसचा वेगळा आणि युवक  काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा असेल
का?
तांबे : हाे, युवक काँग्रेसचा स्वतंत्रच जाहीरनामा असेल. युवकांच्या प्रश्नांवर यात फोकस असेल.

> प्रश्न : प्रचारात युवक काँग्रेसची भूमिका काय ?
तांंबे : राज्यातील ६० मतदारसंघांत युवक काँग्रेसचे काम सुरू आहे. यामध्ये २०१४ मध्ये ज्या जागी काँग्रेसचा निसटता पराभव झाला त्या ठिकाणी आम्ही जास्त लक्ष दिले आहे. 

> प्रश्न : मराठवाड्यातील असे किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
तांबे : फुलंब्रीसह १४ मतदारसंघ.

> प्रश्न : काँग्रेसच्या यादीत युवक काँग्रेसला किती जागा असतील?
तांबे : आम्ही ६० जागा मागितल्या आहेत. किमान ३५ तरी मिळतीलच. 
 

> प्रश्न : पक्षाच्या पदरी अपयश आल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत...?
तांबे : जेवढे माेठे नेते निघून चाललेत तेवढ्या मोठ्या संख्येने युवक पक्षात येत आहेत. भाजपने गेल्या ५ वर्षांत फसवले याची आता लाेकांनाच खात्री पटू लागलीय. नाेकऱ्या, राेजगार नाहीत. 

> प्रश्न : काँग्रेसकडील मतदारसंघ आता कमी झालेत. तुमच्या जागा आघाडीतील मित्रपक्षांना जात आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
तांबे : नाराजी असणे साहजिकच आहे. मात्र २०१९ ची निवडणूक वेगळी आहे. शिवसेना-भाजपला पाडायसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट आवश्यक आहे. त्यामुळे दाेन पावले मागे जाण्याची काँग्रेसची तयारी आहे. आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आमचे प्रयत्न असतील.
 

प्रश्न : भाजपने ३७० कलमाच्या मुद्द्यावर प्रचारात जाेर दिला आहे
तांबे : भाजपने काश्मीरच काय, अमेरिकेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. ते अमेरिकेत जाऊन महाराष्ट्राचा प्रचार करताहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, राज्यातली ढासळलेली अर्थव्यवस्था, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, मराठवाड्यात दुष्काळात झालेली दुरवस्था या सर्व मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राला मंदीचाही माेठा फटका बसलाय, हे लाेकांसमाेर आम्ही मांडणार आहाेत. 

बातम्या आणखी आहेत...