आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आकडों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान लगता है - सुप्रिया सुळे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती राऊत

नाशिक - ‘आधीच्या सरकारच्या तुलनेत आमची कामगिरी सर्वाेत्तम, हा महायुती सरकारचा दावा पूर्णपणे फसवा आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनीच आर्थिक मंदीची कबुली दिल्याने त्यांचे अपयशही जनतेच्या समाेर आले आहे. २००८ मधील मंदीच्या काळात देशातील महागाईवर बोलताना भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी ‘आकडों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान लगता है...’ असे वाक्य वापरले हाेते. आता हेच या सरकारला सांगण्याची आज वेळ आली आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील भाजप सरकारला सुनावले आहे. राज्यातील शिवसेना-भाजप युतीकडे बोलण्याचा मुद्दा नसल्याने ते भावनिक मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आराेपही त्यांनी केला. विविध विषयांवर त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा सारांश...
 

> प्रश्न : ‘सर्वोत्तम कामगिरी’चा दावा हे सरकार करतंय, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय? 
सुप्रिया : सरकारी आकडेवारीच सरकारचा हा दावा खोडून काढत आहे. केंद्र सरकारचे बेरोजगारीचे आकडे सांगताहेत देशाला आणि राज्याला आर्थिक मंदीचे चटके बसताहेत. लोकांच्या नोकऱ्या जाताहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे अडचणीत आहेत. माहितीच्या अधिकारात बेरोजगारीची माहिती दिली जात नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच आर्थिक मंंदीची कबुली दिली आहे. मुख्यमंत्रीच या वास्तवापासून खूप दूर आहेत. दुसरीकडे, सरकारच्या जिवावर भाजप प्रचार करत आहे.  करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे अधिकार यांना दिले कुणी? 
 

> प्रश्न : शिक्षण, आरोग्य, वंचितांचे कल्याण या विषयावर तुमच्यापेक्षा जास्त कामे केल्याचे सत्ताधारी सांगतात? 
सुप्रिया : थोतांड आहे. एकीकडे तुम्ही म्हणता, निधी नाही म्हणून अंगणवाडी सेविकेला पगार देऊ शकत नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ शकत नाही. मग जाहिरातींसाठी ५०० कोटी आले कुठून? सरकारचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. खरा विकास केलाच नाही म्हणूनच यांना आता भावनिक मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे.  मला सुषमाजींचे एक भाषण आठवते ‘आकडों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान लगता है... ‘ असे त्या म्हणाल्या हाेत्या. हेच वाक्य आता भाजप सरकारसमाेर म्हणण्याची वेळ आली आहे. 
 

> प्रश्न : तुमचा निवडणुकीचा मुद्दा कोणता असणार?
सुप्रिया : आमचं राजकारण कायमच विकासाचं असतं. पक्ष आणि सत्ता लोकांच्या आयुष्यात चांगले बदल करण्यासाठी असते, असे आम्ही मानतो. कलेक्शनसाठी सत्ता नसते. पक्ष म्हणजे एक विचार असतो, जबाबदारी असते. दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर सर्वाधिक घसरला आहे. विकासाच्या मुद्द्यावर कुणी बोलत नाही. 
 

> प्रश्न : पक्षातील गळती राेखण्यात अपयश आलंय?
सुप्रिया : कशाला रोखायचं?  प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आम्ही यांच्यासारखी दमदाटी करत नाही. ईडी, सीबीआयचा वापर करून, त्यांच्या प्रश्नांवर अडवणूक करून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची कारस्थानं करीत नाही. जाणाऱ्यांसोबत एक भावनिक नातं असतं, त्यामुळे वाईट वाटतं. पण ते गेल्याने दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते.

> प्रश्न : तुमचे अनेक नेते गेले. हर्षवर्धनही दुखावले 
सुप्रिया : भास्कर जाधवांबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदरच आहे. कार्यक्षमतेने त्यांनी काम केलं. पक्षानेही त्यांना मंत्री केलं, प्रदेशाध्यक्ष केलं. त्यांच्यावर कोणता अन्याय केला, त्यांनी सांगावं. तसा ‘अन्याय’ झाला तर चालेल मला. इंदापूरच्या जागेचा विषय निघण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी एकतर्फी निर्णय घेतला.   

> प्रश्न : पक्षातील लोक सोडून जात असल्याने शरद पवारांची खूप दमछाक होत असणार..
सुप्रिया : ते दमणारे कधीच नव्हते. त्यांनी खूप फाइट केली. मला वाईट त्या वडिलांचे वाटते ज्यांना मुलांसाठी या वयात तडजोडी कराव्या लागत आहेत. माझे वडील स्वाभिमानाने जगलेत, जगताहेत. इतरांना मात्र मुलाच्या करिअरसाठी दुसऱ्याच्या दारात जावं लागणं यापेक्षा दुर्दैव नाही. 
 

प्रश्न : घरातही मुलाच्या तिकिटावरून वाद झाला?
सुप्रिया : नाही. तशी फक्त चर्चा होती. पवारसाहेब म्हणाले, मी लढणार नाही, पार्थला लढू द्या - आम्ही निवड केली. तो वाद नव्हता.
 

> प्रश्न : राेहित पवारच्या निमित्ताने कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात येताेय?
सुप्रिया : राेहितचं काम उत्तम आहे. तो अतिशय कष्ट करतो, ग्राउंडवर असतो. त्या भागातल्या लोकांकडून त्याचे नाव पक्षाकडे आले आहे. बघूया काय निर्णय होतो तो. रोहितचं नेतृत्व लोकांनी ठरवलंय, कुटुंबानं नाही.
 

> प्रश्न : धनगर समाजातील मंत्र्याला पाडण्यासाठी पवार कुटुंबाने जामखेडची लढत प्रतिष्ठेची केल्याची चर्चा आहे?
सुप्रिया : हा आरोप हास्यास्पाद आणि संतापजनक आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करणे दुर्दैवी आहे. त्याच मतदारसंघाला लागून इंदापुरात आमचे दत्तात्रय भरणे आहेत. आमची सक्षणा राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष आहे. तिला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. व्यासपीठावर आम्ही मागे बसतो आणि ती पहिल्या रांगेत असते. प्रश्न : ३७० कलमावर तुम्ही विरोधात मतदान केलं असं अमित शहा सोलापूरच्या सभेत म्हणाले..
सुप्रिया : मी आधीही सांगितलं की हा आराेप खाेटा आहे. मी मतदान केलं नाही हे संपूर्ण देशाने पाहिलं. ३७० कलमाबाबत मी आणि अखिलेश यादव आम्ही दोघांनीही एकत्रच सभात्याग केला. एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती खोटं बोलते, हे याेग्य नाही. 
 

> प्रश्न : गटबाजीमुळे पक्षात धुसफूस असल्याचे बोलले जाते.. नव्याने आलेल्या अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली, याबाबत जुन्यांमध्ये नाराजी आहे?
सुप्रिया : आमच्या पक्षात ना गटबाजी आहे ना नाराजी. प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येकाला कामे वाटून दिली आहेत. मीही त्या यात्रेत नाहीये. माझ्याकडे वेगळे काम दिलेले आहे. 
 

प्रश्न : उमेदवार कधी जाहीर हाेणार?
सुप्रिया : जाे लढायला इच्छुक आहे त्याने पूर्ण ताकदीनं फील्डवर काम केलं पाहिजे. निवडणूक आली की कामाला लागायचं हा कुठला नियम?  त्यामुळे काम करणाऱ्याला जागावाटप, तिकीट वाटप यानं काही फरक पडत नाही.
 

डेंग्यूची लागण झाल्याने तूर्त प्रचारापासून लांब
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना प्रचारातून अंग काढून घ्यावे लागले. कारण त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. खुद्द सुप्रिया यांनीच फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ‘ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला...! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे,’ असे त्यांनी सांगितले.