मैदान-ए-जंग: ऐक ना! / मैदान-ए-जंग: ऐक ना! मी शिवाजी पार्क बोलतोय...

दिव्य मराठी वेब टीम

Jan 29,2019 09:49:00 AM IST

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू/मराठी बंधू-भगिनी आणि मातांना माझा नमस्कार... अशी साद घालून आपल्या तडाखेबंद भाषणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा .... भाजप-शिवसेना सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा “ऐतिहासिक शपथविधी’... आपल्या मिश्कील शैलीत बोलता बोलता विरोधकांना तोंडावर पाडणाऱ्या शरद पवार यांच्या लाखांच्या सभा.... शिवसेना आणि मनसेसारख्या पक्षांच्या स्थापनेच्या सभा... संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळेला आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आदी नेत्यांच्या जंगी सभा... पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर ‘विजय सभा’ घेणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण... अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेले मुंबईचे शिवाजी पार्क सांगतेय स्वत:च्याच आठवणी...


परवा नेहमीप्रमाणे मी एकटाच शिवाजी पार्कला फिरत होतो आणि अचानक आवाज आला- ‘मला काही सांगायचंंय...’

मी दचकलो. आजूबाजूला कुणीही नव्हतं. इतक्यात पायाला गुदगुल्या झाल्या. मी खाली पाहिलं. गवत मला सांगत होतं, ‘मी शिवाजी पार्क बोलतोय. मला तुझ्याशी जरा गप्पा मारायच्यात. किती किती राजकीय नेते मी अंगाखांद्यावर खेळवले आहेत? मला त्याबद्दल बोलायचंय.’

‘तुला काय म्हणू मी?’ मी म्हटले, ‘माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा असलास तरी तुला मी ‘मित्रच’ म्हणतो. तुझ्याबरोबरच तर बालपण, तारुण्य मी घालवलं. पण मित्रा, मी अलीकडे राजकारणावर बोलत नाहीय. उगाचच नाती तुटतात आणि तुझ्याबरोबरचं नातं तोडणं मला अशक्य आहे.’

‘कधीपासून तू मला ओळखतोस?’


‘१९६० पासून! मी दादर २८ मध्ये आलो आणि तू माझा मित्र झालास. माझा जन्म आपला देश प्रजासत्ताक झाला, त्या काळातला. मला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अस्पष्ट आठवतेय. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणा कधी तरी मधूनच कानात ऐकायला येते.’

काय आठवण काढलीस! अंगावर रोमांच उठले. एकाच स्टेजवर सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे आणि आचार्य अत्रे बसायचे. संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. अत्रे उभे राहिले की हास्याचा गडगडाट व्हायचा. एकदा इथेच अत्रेंनी जाहीर केलं की संयुक्त महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वर्तमानपत्र काढायची गरज आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याबरोबर अत्रे गरजले, ‘नुसत्या टाळ्या वाजवून वर्तमानपत्र निघत नाही. टाळ्या वाजवणारे हात खिशात जाऊ देत.’ मराठी माणसांनी तिथल्या तिथे पन्नास हजार रुपये जमवले. साधारण मराठी माणसाचा एकत्रितपणे खिशात हात जाण्याचा तो पहिला प्रसंग असावा.’

‘मित्रा, तुझ्यामुळेच मी मोठमोठे वक्ते ऐकले आणि कळत-नकळत माझ्यावर त्यांचे संस्कार झाले. कसं बोलावं, बोलताना कसा परिस्थितीचा फायदा उठवायचा, ते इथेच कळालं. एकदा तुझ्याच अंगाखांद्यावर आमचा क्रिकेटचा खेळ सुरू होता. जवळच कॉ. डांगेंची सभा सुरू होती. १९७१ ची गोष्ट असावी. अजित वाडेकरचा संघ वेस्ट इंडीज- इंग्लंडला हरवून आला होता. एक फटका थेट स्टेजवर गेला. डांगे भाषण करत होते. त्यांनी चेंडू उचलला आणि ते म्हणाले, ‘पाहा, पतौडी गेला, म्हणजे भांडवलशाही गेली. एक बँक कर्मचारी अजित वाडेकर कर्णधार झाला आणि भारतीय संघ जिंकायला लागला. आम्ही वेगळं काय सांगतो. हाच तर मार्क्सवाद आहे.’

अगदी खरंय. दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि ते पंचक आपापल्या इझमच्या घरात गेले. मराठी माणूस पुन्हा घाटी झाला. माझ्या समोरच्या घरात राहणाऱ्या एका चाळिशीच्या जवळ जाणाऱ्या तरुणाने मराठी माणसांचा एकजुटीचा नारा दिला. इथेच ती सभा झाली. अनपेक्षितपणे गर्दी झाली. त्या तिथे कट्ट्यावर बारामतीत जन्मलेला आणखी एक तरुण सभा ऐकत बसला होता. त्या वेळी मला कल्पनाही नव्हती, की हे दोघं आपापल्या परीने महाराष्ट्र ढवळून काढणार. एक व्यंगचित्रकार... बाळ ठाकरे, बघता बघता आधी बाळासाहेब ठाकरे, मग सेनापती आणि पुढे हिंदुहृदयसम्राट झाला. आणि दुसरा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षणमंत्री झाला. आठवतंय तुला?’


‘मित्रा, १९६७ मध्ये शिवसेनेने लोकसभेसाठी उमेदवार उभे केले नव्हते. पण डांगे, अत्रे, जॉर्ज फर्नांडिस, कृष्ण मेननविरुद्ध रान पेटवलं होतं. अत्रे पडले. मेनन पडले. जॉर्ज आणि डांगे निवडून आले. पण त्यानंतर मराठी कानावर बाळासाहेबांचा आवाज घुमू लागला. आवाजात जरब होती आणि जनसमुदायाशी बोलायची शैली अत्रे- डांगेंची होती. संयुक्त महाराष्ट्राचे मित्र, आता कट्टर शत्रू झाले होते. कम्युनिस्ट चळवळींचा पाया खणण्याचा विडा शिवसेनेने उचलला. तो त्यांना काँग्रेसने दिला.’

‘१९६७ ते ७५ दरम्यान खूप बदल झाले ना?’


‘होय, १९७१ मध्ये ‘गरिबी हटाव’ची घोषणा इंदिरा गांधींनी समाजवादाच्या घोड्यावरून रपेट मारता मारता दिली. आजच्याप्रमाणे महागठबंधन उभं राहिलं. त्या वेळी नाव हाेतं बडी आघाडी. त्यात जनसंघही होता. इंदिरा गांधी जिंकल्यावर ‘मतपत्रिकेवरची शाई पुसली जात होती.’ वगैरे आरोपही विरोधी पक्षाने केले. आज ईव्हीएमकडे बोट दाखवलं जातं. त्या वेळी शाईकडे बोट दाखवणाऱ्यात जनसंघ होता.’

‘मित्रा, हा विजय बाईचा नाही, गाईचा नाही, शाईचा आहे.’ हे बाळासाहेबांचं गाजलेलं वाक्य मी याच देही याच कानी, तुझ्या खांद्यावरूनच ऐकलंय. इथेच मी अनेक ‘दसरा मेळावे’ पाहिले आणि ऐकले. जॉर्ज, शरद पवार, बाळासाहेब या तात्त्विकदृष्ट्या विरोधी मित्रांना एकत्र पाहिले. त्याआधी आणीबाणी पाहिली. १९७१ मध्ये भरलेलं तुझं मैदान गाजवणारी सम्राज्ञी इंदिरा १९७४च्या आणीबाणीनंतर खलनायिका झाली. आणीबाणी संपली आणि संयुक्त महाराष्ट्राप्रमाणे सर्व पक्षांनी आपल्या भिंती तोडल्या आणि जनता दल नावाचं एक घर तयार केलं. जयप्रकाश नावाच्या १९४२ च्या लढ्यातल्या एका सेनानीनेही जादू केली. एस. एम. आणि जयप्रकाश हे १९४२ च्या चळवळीचे हीरो मी इथेच एका स्टेजवर पाहिले, तेव्हा उर भरून आला हाेता. नंतर मात्र राजकीय वातावरण हळूहळू ढवळून निघालं. अत्रे, डांगे, बॅरिस्टर नाथ पै. परलोकी गेले आणि मधुर आवाजाच्या काव्यरूप भाषेत बोलणाऱ्या अटलजींनी मनावर राज्य केले. त्या वेळीही वाजपेयी पॉज घेत. पण नंतर एवढा तो मोठा नव्हता. संजय गांधींचं मारुती प्रकरण सुरू होतं. त्या वेळी अटलजी म्हणाले होते, ‘मारोती’ क्या है! क्या माँ रोती है.’ त्या वेळी टीकेलाही दर्जा होता. आजचं गटारी रूप नव्हतं. कधी तरी याच तुझ्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘भाजपत एक अटलजी, बाकी सर्व शटलजी.’

‘द्वारकानाथ त्यानंतर वातावरण बदललं. समाजवाद, साम्यवाद शब्द इतिहासजमा झाले. हिंदुत्ववाद या इझमला वलय आलं. त्यानंतर कितीतरी वक्ते येऊन गेले मात्र मॅन ऑफ द मॅच बाळासाहेब ठाकरे असत. शिवसेनेचं राज्य आलं आणि गेलंही. भाजप मोठा पक्ष झाला. पण भाषण ऐकायला गर्दी झाली ती बाळासाहेबांसाठीच. आणि २०१४ मध्ये कमळातून नरेंद्र मोदी आले.’

‘आता कुणाचं भाषण ऐकायला उत्सुक असतो?’


‘खरं सांगू, फारसं कुणाचं नाही. सर्वच तर टीव्हीवरून बोलतात. त्यामुळे ते भाषणासाठी वाट पाहणं गेलं. ती उत्कंठा गेली. अरे म्हणूनच तर तुला हाक मारली. मला कुणाशी तरी जुन्या आठवणी बोलायच्याच होत्या....’

गप्पा संपल्या अन‌् मलासुद्धा भूतकाळाचे जिने चढत वर्तमानात येणे कठीण गेले.

‘हा विजय बाईचा नाही, गाईचा नाही, शाईचा आहे.’ हे बाळासाहेबांचं गाजलेलं वाक्य इथेच ऐकलंय....

अनेक ‘दसरा मेळावे’ पाहिले आणि ऐकले. जॉर्ज, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या तात्त्विकदृष्ट्या विरोधी मित्रांनाही एकत्र पाहिलंय...!

X
COMMENT