आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक निवडणुकांत एक हजारावर युवक-युवतींना उमेदवारी; ‘सुपर वन थाउजंड अभियाना’ची महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडून घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशाेक अडसूळ

मुंबई - २०२२ मध्ये होऊ घातलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने कंबर कसली आहे. एक हजार युवक-युवतींना या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. त्यासाठी ‘सुपर वन थाऊजंड’ अभियान युवक काँग्रेसने हाती घेतले असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. विविध विषयांवर तांबे यांनी मांडलेली भूमिका पुढीलप्रमाणे....

  • १. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यातील रोजगारांची पुरती वाट लागली. शहरातला विकास भकास झाला. ग्रामीण भागाच्या समस्यांतही मोठी वाढ झाली. सरकार बदलणे गरजेचे होते. त्यामुळे वैचारिक भिन्नता असताना तिन्ही पक्ष एकत्र आले. याचे युवक काँग्रेसने स्वागतच केले आहे.
  • २. युवक काँग्रेसने ‘वेकअप महाराष्ट्र’ नावाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्याअंतर्गत राज्यातल्या साडेचार कोटी युवकांपर्यंत आम्ही पोचलो. त्यात युवकांनी जाहीरनामा बनवला. १ लाख ९१ हजार रिक्त जागा भरा व महापोर्टल सेवा बंद करा, अशी सातत्याने मागणी केली आहे. आता आमचे सरकार आले आहे, त्यामुळे आम्ही ती लावून धरू आणि बेरोजगार युवकांसाठी अडथळा ठरलेली महापोर्टल सेवा नक्की बंद करू.
  • ३. फडणवीस सरकारच्या काळात अाम्ही अनेक आंदोलने केली. आता आमचे सरकार आले असले तरी युवक काँग्रेसची आंदोलने थांबणार नाहीत. प्रसंगी दबाव टाकून युवकांची कामे करून घेण्यास आमचे प्राधान्य राहील. सरकार आमचे असले तरी आम्ही आंदोलन करणार नाही, असे नाही. शेवटी आमचे दायित्व युवकांशी आहे.
  • ४. युवक काँग्रेसने नुकताच ‘युवा जोडो’ कार्यक्रम जाहीर केला आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात शेकडो युवकांचे सध्या प्रशिक्षण चालू आहे. त्यातून युवकांचे नेतृत्व पुढे यावे, काँग्रेस पक्षाचे भावी नेते घडावेत, असा युवा जोडो आंदोलनामागचा खरा उद्देश आहे.
  • ५. काँग्रेसच्या मंत्र्यांकडून युवक काँग्रेसच्या दोन अपेक्षा आहेत. लोकांची कामे करत त्यांनी लोकाभिमुख सरकार द्यावे तसेच काँग्रेसचे संघटन वाढवण्यालासुद्धा त्यांनी हातभार लावला पाहिजे. मंत्री काही मंत्रालयात बसण्यासाठी नसतात.
  • ६. सध्या काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. पुढच्या वेळी ८८ आमदार व्हावेत, असे युवक काँग्रेसचे धोरण आहे. युवा जोडो अभियानातील युवक प्रत्येक जिल्ह्यात पाठवणार आहोत. २०२२ मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात आम्ही या आंदोलनातील युवकांना संधी देणार आहोत. या निवडणुकांत १ हजार युवक-युवतींना उभे करणार आहोत. या कार्यक्रमाला ‘सुपर वन थाऊजंड’ असे नाव दिले आहे.
  • ७. विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने ६० विधानसभा मतदारसंघांत लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी सुपर ६० अभियान हाती घेतले होते. पण, त्यातील अनेक मतदारसंघ मित्रपक्षाला गेले. शेवटी युवक काँग्रेसने ४० मतदारसंघांत काम केले. त्यातील २८ जागी काँग्रेस उमेदवार विजयी ठरले आहेत.
  • ८. विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसला १९ तिकिटे मिळाली होती. त्यातील ६ जागी युवक आमदार निवडून आले. थोड्या मतांनी काहींना पराभूत व्हावे लागले. माझी अजून अर्धी टर्म बाकी आहे. या काळात काँग्रेस पक्ष राज्यातला पहिल्या क्रमांकाचा व्हावा, हे युवक काँग्रेसचे मुख्य ध्येय आहे.