आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम सत्ता मतदारांची!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय आवटे आणि, अखेर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. निवडणुकांचा कार्यक्रमही घोषित झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या यात्रा सुरू आहेत. तिकडे शरद पवार ‘एकला चलो रे’ म्हणत राज्यभर फिरताहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी सूत्रे हातात घेतली आहेत. युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या नव्या नायकाच्या शोधात निघालेले आहेत. फाटाफूट झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीची धग कायम ठेवण्याचा प्रयत्न करताहेत, तर एमआयएमला नवे मतदारसंघ मिळवण्यासाठी खासदार इम्तियाज जलील पुढाकार घेताहेत. राज ठाकरे आपल्या मौनाची भाषांतरे करताहेत. डावे पक्ष आपली ‘स्पेस’ शोधताहेत!  सगळे पक्ष आपापल्या शैलीत या निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही अशी निवडणूक आहे की, कोण कोणत्या पक्षात गेले आहेत हे पाठच करण्याची वेळ यावी! एकूण, सारे नेते, सगळे पक्ष कामाला लागले आहेत. माध्यमांसाठी तर हा ‘सीझन’ असतो. त्यामुळे वाहिन्यांच्या एक्स्प्रेस राज्यभर तुफान धावताहेत. ‘डिबेट शों’चा टीआरपी वाढू लागला आहे. युती, उमेदवारी अर्ज अशा ‘ब्रेकिंग’साठी वर्तमानपत्रे कामाला लागली आहेत. गावोगावचे बातमीदार नव्या उत्साहाने लिहू लागले आहेत. सोशल मीडियावर तर माहोल अवघाचि पोलिटिकल झाला आहे!  आता काही दिवस हा ज्वर आणखी वाढत जाईल. मतदान होईल. निकाल लागेल. नवे सरकार सत्तारूढ होईल आणि सारे आपापल्या कामाला लागतील. मुद्दा आहे, या साऱ्या रणधुमाळीत आपला ‘कॉमन मॅन’ कुठे आहे? निवडणूक लढवतात ते उमेदवार आणि पक्ष त्यांचे महत्त्वाचे वाहन हे खरेच, पण या प्रक्रियेचा चालक असणारा मतदार कुठे दिसतो आहे? गेल्या काही निवडणुकांमध्ये असे जाणवले की, पक्ष आणि माध्यमांना निवडणुकीचे कौतुक असते, तसे मतदारांना मात्र नसते. तो उदासीन असतो. मतदानाची टक्केवारी वाढावी, असा प्रयत्न आपण करत असतो खरा, पण एका टप्प्याच्या पुढे यश येत नाही. त्यातही शहरी मतदाराची उदासीनता अलीकडच्या काळात अनेकदा दिसलेली आहे.  मतदाराच्या हातातून निवडणूक निसटली, तर त्या निवडणुकीला काय अर्थ असेल? युती होणार की नाही, आघाडीचे काय झाले आणि वंचितपासून एमआयएम का फुटला, अशा बातम्यांच्या पलीकडे मतदार स्वतः निवडणुकीचा अजेंडा ठरवणार की नाही? नेत्यांची टोलेबाजी, परस्परांवरील शेरेबाजी यातच आपण स्वतःचे रंजन करून घ्यायचे की ही निवडणूक आपल्या हातात घ्यायची? निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला आवाजही मतदाराला ऐकू येत नसेल, तर अशा निवडणुकीला काही अर्थच उरणार नाही.     एरवी जे प्रश्न मांडले जातात, ते ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कसे गायब होतात हे कधी कोणाला समजत नाही! रोजचं रणांगण लढताना कैक प्रश्न आपल्यासमोर असतात. त्यावर आंदोलनं उभी होतात. पण, निवडणूक आली रे आली की कोणती तरी उन्मादी अस्मिता त्याचा ताबा घेते. कधी जातीचा, तर कधी धर्माचा मुद्दा पुढं येतो. आणि, खरे प्रश्न मागच्या बाकांवर जातात. असे होणे राजकीय पक्षांना हवे असतेच. पण, आपण तसे का होऊ देतो?  महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतरचे देशातले सगळ्यात मोठे राज्य. अवघ्या जगाला पसायदान देणाऱ्या ज्ञानेश्वरांचा आणि ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ ठरवणाऱ्या तुकारामांचा महाराष्ट्र. स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. देशाला राज्यघटना देणाऱ्या बाबासाहेबांचा महाराष्ट्र. असंतोषाचे नायक होऊन देशभर स्वातंत्र्याची आकांक्षा प्रज्वलित करणाऱ्या लोकमान्यांचा महाराष्ट्र. स्वतःच्या बहिणीचं आंतरजातीय लग्न लावणाऱ्या शाहूंचा हा महाराष्ट्र. मुली-महिला शिकाव्यात म्हणून दगडगोटे खाणाऱ्या सावित्री आणि जोतिरावांचा महाराष्ट्र. हा वारसा सांगताना आरसासुद्धा पाहावा लागणार आहे!  नेत्यांच्या भूलथापा आणि आश्वासनांच्या उन्मादात आपण स्वतःलाच विसरतो आणि कोणताही विचार न करता निवडणुकीला सामोरे जातो. माध्यमं तर भूल देण्यासाठी सज्ज असतातच. माध्यमं भूल देतात आणि राजकीय नेते ‘ऑपरेशन’ फत्ते करतात. आपण स्वतःच निवडणुकीची सूत्रं त्यांच्या हातात देऊन टाकतो. या निवडणुकीचे सूत्रधार नरेंद्र वा देवेंद्र नाहीत अथवा पवार किंवा बाळासाहेब नाहीत. निवडणुकीचे मुख्य सूत्रधार असतो ते आपण. तुम्ही आणि मी. आम्ही भारताचे लोक. ते करतील आरोप, प्रत्यारोप. ते करतील बाता आणि मारतील थापाही. आपण मात्र मूलभूत मुद्द्यांबद्दल आग्रही असायला हवं. तसं मूल्यमापन करायला हवं. ही निवडणूक त्या अर्थाने फार महत्त्वाची आहे.  वाचकांना आवाहन की, त्यांनी सावध राहावे. कोठे काही खटकले, गैर वाटले तर आम्हाला कळवावे. ज्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असे वाटते त्याबद्दल आमच्याशी बोलावे. या निवडणुकीतही आमचा पक्ष एकच आहे; सर्वसामान्य नागरिकांचा. तुमच्यापैकी प्रत्येकाचा. सत्तेत कोणीही येवो, पण तुमची-माझी ही सत्ता जाता कामा नये!    

बातम्या आणखी आहेत...