column / इये मराठीचिये नकटी!

देसबुक | जो पक्ष निखळ राजकीय व सत्तालंपट असतो तो शिक्षण आधी ढवळतो.

जयदेव डोळेे

Jun 25,2019 10:08:00 AM IST

आता मराठीच्या घरी अठरा (१०+८) विश्वे दारिद्र्य नांदते हे काय आम्हाला माहीत नव्हतेॽ पण आमचे आणि गणिताचे छत्तिसा (३०+६)चे नाते आहे हे मंत्रिमहोदयांना समजले आणि गहजब झाला. त्यांनी आमच्यासारख्या गोरगरीब, वंचित, बहुजन, अल्पज्ञानी बालकांप्रति कणव येऊन आम्ही काय शिकावे, कसे शिकावे हे ठरवून टाकले. आम्ही काय खावे, काय ल्यावे, कसे बोलावे याचे धडे गेली पाच (०५) वर्षे दिल्यावरही त्यांचे ढेरपोट भरले नव्हते म्हणे ! खूप पूर्वी म्हणजे आमच्या बालपणी मराठी भाषेला म्हणे बावन्न (५०+२) कशी सोन्याची उपमा दिली जायची. नंतर बावीस (२०+२) कॅरेटची तिला संगत लाभल्याने तिला अवकळा आली. असो. आम्हाला शाळेत मराठी शिकवायला पंचविशी (२०+५) चे एक शिक्षक होते. त्यांचे नाव नवनाथ विस (२०) पुते होते. ते खूप छान हसायचे. हसल्यावर त्यांची बत्तिशी (३०+२) फार चमकून जाई. ते कडक स्वभावाचे होते. त्यांच्या तासाला कोणाची काही चूक झाली तर तो बारा (१०+२)च्या भावात गेलाच असे समजायचे. गुरुजी त्याला चौदा (१०+४)वे रत्नच दाखवत असत. खूप रागावले की ते म्हणत, तुम्ही इतके बिनडोक आहात की तुमचे आताच तेरावे (१०+३) घालायला पाहिजे. तुम्ही शहाण्णव (९०+६) कुळी नसून अक्कर (१०+१) माशी दिसता. सत्रांदा (१०+७) सांगितल्याशिवाय तुम्हाला एकही गोष्ट कळत नाही. सगळ्यांच्या पेपरात सत्राशे (१०००+७००) साठ (६०) चुका ! असे वाटते जणू या चुका तुमच्या डोक्यात अठ्ठावीस (२०+८) उभ्या आहेत. कमरेवर हात ठेवून. अगदी चोवीस (२०+४) तास बोंबललो तरी तुमच्या टाळक्यात प्रकाश पडणार नाही !


मराठीच्या या शिक्षकाच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण होते. म्हणून आम्ही मुले त्यांना छप्पन (५०+६) टिकल्या असे त्यांच्या माघारी चिडवायचो. त्यांचे शरीर पहिलवानी होते. त्यांच्या अंगात बारा (१०+२) हत्तींचे बळ होते. एकदा त्यांनी वर्गात सांगितले की, मी सांगतो ते काही सोळा (१०+६) आणे सत्य नाही. परशुराम नावाचे एक ऋषी होते. त्यांनी एकवीस (२०+१) वेळा लढाया करून पृथ्वी निःक्षत्रीय केली होती म्हणे. आपले पुराण सांगते की, कृष्णाला सोळा (१०+६) सहस्र (१०००) नारी होत्या. अशा कहाण्या शेपन्नास (१००,५०) सांगितल्या जातात. मात्र, त्या शंभर (१००) नंबरी सत्य नाहीत. मनुष्याला चौऱ्याऐंशी (८०+४) लक्ष (१०००००) योनीनंतर मानवाचा जन्म मिळतो असेही सांगितलेले आहे. गायीच्या पोटात तेहतीस (३०+३) कोटी देव असतात, असेही सांगून ठेवले आहे.


मी त्यांना विचारले की, मग आम्हा मुलांच्या पोटात दुधाबरोबर देवही जातात कायॽ म्हणून मुलांना देवाघरची फुले म्हणतात कायॽ तर गुरुजी रागावून म्हणाले, स्वतःला काय तीस (३०) मारखाँ समजतोस काय ! तुमच्यासारख्या ‘ढ’ पोरांना शिकवायचे म्हणजे मूठभर देवाला खंडीभर तेल. अडाण्याला एकवीस (२०+१) प्रदक्षिणा घातल्या तरी तो काही देव होत नाही की ज्ञानी ! तरी बरे अठरा (१०+८) पगड जातींचे देवही तेवढेच. कोणाला एकवीस (२०+१) मोदकांचा नैवेद्य, तर कोणाला अकरा (१०+१) नारळ. तुमची बारा (१०+२) खडी पाठ झालीय नाॽ मराठीत एकंदर वर्ण कितीॽ एकोणपन्नास (४०+९) ! स्वर किती सांगा... तेरा (१०+३) ... व्यंजने किती असतातॽ चौतीस (३०+४)...शाब्बास ! एवढे येतेय म्हणून ठीक. नाहीतर मला आताच चाळिशी (४०) लागेल बाबांनो. तुमच्या वर्गात फार थांबलो तर साठी (६०) बुद्धी नाठी होईल, अशी भीती वाटते मला. मराठीचे शिक्षक म्हणजे समजलात काय तुम्हीॽ पायलीला पन्नास (५०) मिळतात की काय ते ! आम्हाला काही कळायचे नाही. फक्त आमची शंभरी (१००) भरू नये असे वाटायचे. नाहीतर काय, दुष्काळात तेरावा (१०+३) !!


एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याची प्रक्रिया रोखायची नाही आणि दुसरीकडे मूळचे मराठी शब्द सुलभीकरण वा सरलीकरण यांच्या नावाखाली पर्यायी म्हणून बाजूला ठेवायचे हा काय प्रकार आहेॽ संस्कृताळलेली हिंदी, मराठी बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्राकृताची हकालपट्टी करण्याचा हा कावा तर नाहीॽ बेचाळीसचे भारत छोडो, सत्तेचाळीसचे स्वातंत्र्य, अठ्ठेचाळीसचा खून, एकाहत्तरचे युद्ध, पंचाहत्तरची आणीबाणी, चौऱ्याऐंशीची हत्या, एक्क्याण्णवचा बॉम्बस्फोट, त्र्याण्णवची घटनादुरुस्ती, अठ्ठ्याण्णवचे वाजपेयी सरकार यांची आठवण नकोशी वाटू लागली की कायॽ सुरुवात दोन हजार एकपासून करायची म्हणताॽ मोदी शतक तिथूनच सुरू होते नाही का....! बिचाऱ्या मंगला नारळीकर, त्यांना या नवभारतवाल्यांनी फार मस्त गंडवले. इतक्या बुद्धिमान बाईंना एवढे कळू नये की आपण ज्या बदलांचा आग्रह धरतोय त्यामागे अन्य काही राजकीय हेतू असू शकतात किंवा तसा संशय घेतला जाईल म्हणून. जो पक्ष निखळ राजकीय व सत्तालंपट असतो तो शिक्षण आधी ढवळतो. आपल्याला अनुकूल-प्रतिकूल तत्त्वे व विचार तो समोर ठेवतो आणि कामाला लागतो. काय असेल हा संख्याक्षरे बदलामागचा उद्देश? एकतर इंग्रजीप्रमाणे वाचन होऊन आकडेच लक्षात ठेवणे जमेल. दुसरे, एकोणसत्तर, शेहेचाळीस, पंचाण्णव असे लिखाण व उच्चार हळूहळू मागे पडले की भाषा शब्दांवर विसंबून न राहता आकड्यांवर रेलून ठेवण्याचा प्रयोग यशस्वी होईल. हुकूमशाहीवरील अनेक कल्पक लेखकांनी आपल्या पात्रांची ओळख संख्यांनी केलेलीय........

X
COMMENT