Home | Jeevan Mantra | Dharm | Diwali 2018 balipratipada and padawa importance in marathi

जाणून घ्या, बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा

रिलिजन डेस्क | Update - Nov 08, 2018, 12:07 AM IST

बलिप्रतिपदा हा दिवाळीचा पुढचा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवताला सुरूवात होते.

  • Diwali 2018 balipratipada and padawa importance in marathi

    कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्‍यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते. मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे. या दिवसानिमित्त अनेक कथा पुराणात प्रसिद्ध आहेत. पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. तसेच असूराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा होता. दानशूरात अग्रेसर होता. त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला. लक्ष्मीला दासी केले. देवांचे स्वातंत्र्य हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली. एकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती.


    भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे झाले. बळीने विचारले ‘काय पाहिजे’ बटू म्हणाला ‘मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन दे’.बळी म्हणाला ‘मी वचन देतो, तुला हवे ते माग’.बटू म्हणाला ‘तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळलोकात गेला. गविर्ष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.


    पाडवा
    पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.

Trending