आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाके कोणतेही फोडा, पण दोनच तास : कोर्ट, ग्रीन फटाक्यांची अट फक्त दिल्लीसाठीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरात फटाके फोडण्याची वेळ ठरवून देणाऱ्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दुरुस्ती केली आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, ग्रीन फटाक्यांची निर्मिती, विक्री व ते फोडण्याबाबतचा आदेश फक्त दिल्ली-एनसीआरसाठीच आहे. देशभरात लोकांना नेहमीचे फटाके फोडता येतील. रात्री फक्त ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याचा नियमही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केला. राज्यांना आपल्या परंपरांनुसार फटाके फोडण्याची वेळ ठरवण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. मात्र केवळ दोनच तास फटाके फोडता येतील. तामिळनाडू, पुद्दुचेरीचे सरकार व फटाके निर्मात्यांच्या याचिकांवर न्या. ए. के. सिकरी आणि अशोक भूषण यांच्या पीठाने हा सुधारित आदेश जारी केला. सुप्रीम कोर्टाने २३ ऑक्टोबरला फटाके निर्मिती, विक्री व फोडण्याबाबत अनेक दिशानिर्देश जारी केले होते. कोर्टाने रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फक्त ‘ग्रीन’ फटाकेच फोडण्याची मुभा दिली होती.

 

दुरुस्ती : तामिळनाडू-पुद्दुचेरीत पहाटे ४.३० ते ६.३० पर्यंत फटाके.
युक्तिवाद : तामिळनाडू, पुद्दुचेरी सरकारने युक्तिवादात म्हटले की, प्रत्येक राज्य व संप्रदायाची दिवाळी साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा आहे. सुप्रीम कोर्टाची बंदी लोकांच्या धार्मिक अधिकारांवर आक्रमण आहे. घटनेतील २५ वी तरतूद लोकांना अापल्या धार्मिक परंपरांचे पालन करण्याचा हक्क देते. नरकासुराचा वधाचा आनंद साजरा करण्यासाठी पहाटेच फटाके फोडले जातात. या राज्यांना दिवाळीत पहाटे ४.३० ते ६.३० पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी द्यावी. 
आदेश : प्रत्येक राज्य आपल्या परंपरांनुसार दिवाळीत आतषबाजीच्या वेळेत बदल करू शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीत दोन तासांपेक्षा जास्त वेळ फटाके फोडू नयेत.

 

जुना स्टाॅक विकण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही

स्पष्टीकरण : एनसीआरसह दिल्लीत ग्रीन फटाक्यांचीच सक्ती
युक्तिवाद : फटाके निर्माते म्हणाले, बेरियम नायट्रेट वापरलेे नाही तरीही प्रदूषण ५० टक्केच कमी होईल. फटाके आधीच तयार असल्याने नुकसान होईल. हा आदेश २०१९ पासून लागू केला जावा. ग्रीन फटाके कुठे विकायचे हे आदेशात स्पष्ट नाही. दिल्लीत ५० लाख किलाेंचा स्टॉक संपवण्यासाठी २ आठवडे पुरेसे नाही. सकाळीही वेळ दिला जावा. 
आदेश : ग्रीन फटाक्यांचा आदेश फक्त दिल्ली-एनसीआरसाठी आहे. इतर ठिकाणी सामान्य फटाके फोडता येतील. जुना स्टॉक विकण्यासाठी मुदतवाढ नाही. उत्तरेत रात्री, तर दक्षिणेत दिवसा दिवाळी साजरी करू द्या.

बातम्या आणखी आहेत...