आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ज्ञानप्रबोधिनी’तील लैंगिक शोषणप्रकरणी 66 विद्यार्थ्यांची चौकशी, 152 पानी अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता हराळी (ता.लोहारा) येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेवर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने संस्थेवर प्रशासक नेमण्याबाबत नोटीस पाठवली आहे. विशेष पथकाच्या पाहणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. पथकाने  १५२ पानी अहवाल सादर केला असून यामध्ये ६६ मुले व मुलींचे जबाबही घेण्यात आले आहेत.


हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तेथील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विशेष पथकाने शाळेची कसून चौकशी केली आहे. यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत अहवाल सादर केला आहे. शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना अहवाल दिला. अहवालात गंभीर बाबी आढळून आल्यामुळे आता ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना शिक्षणाधिकारी चंदनशिवे यांनी नोटीस बजावली आहे.


प्राप्त अहवालामध्ये संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याची बाब अधोरेखित झाली आहे. यामध्ये लोहारा पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, विद्यालयाने अद्यापही महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी नियमावलीनुसार काहीच कारवाई झालेली नाही. या नियमावलीनुसार तातडीने कारवाई करण्याबाबत नोटीसमध्ये बजावण्यात आले. अहवालामध्ये शाळेच्या वेळेतच शाळेच्या परिसरात संबंधित अनाथ मुलीवर अत्याचार झाल्याचा किळसवाणा प्रकार घडल्याचे चौकशीत समोर आले असल्याचे नमूद आहे. ही घटना ज्ञानप्रबोधिनीच्या संकुलात मागील दोन वर्षांपासून सुरू होती. तरीही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे अनाथ मुलगी ज्या वसतिगृहात प्रवेशित  होती त्या वसतिगृहाला शासकीय व प्रशासकीय परवानगी नाही. तसेच वसतिगृहाच्या कामकाजासंदर्भात कोणतीच कागदपत्रे नाहीत. अध्यक्ष व सचिव यांचे विद्यालयातील कोणत्याच उपक्रमावर  नियंत्रण नाही. यामुळे संस्थेवर प्रशासक नेमण्यासंदर्भात कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे यांनी ही नोटीस संस्थेच्या अध्यक्ष व सचिवाला बजावली आहे.


कायद्यानुसार नाही प्रवेश : शासनाने वयानुरूप प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीई कायद्याअंतर्गत अशी बाब प्रकर्षाने नमूद करण्यात आली आहे. तरीही या अनाथ मुलीला  पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच मुलीसंदर्भातील कोणतेही शैक्षणिक अभिलेखे विद्यालयात उपलब्ध नाहीत.   मुख्याध्यापक व सहशिक्षक याला   जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करून त्यांच्यावर कारवाई अग्रेशित केली आहे.


पालकांशी शाळेच्या प्रशासनाचा संपर्कच नाही  
विद्यालयात नियमानुसार विविध प्रकारच्या समित्यांची स्थापना करून शाळा व पालक यांच्यातील संबंध व संपर्क दृढ करण्याचे कायद्यात तरतूद आहे. मात्र, ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ आदी समिती स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पालक व शाळेचा संपर्कच नाही. यातूनही आरटीई कायद्याचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भातही संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई झालेली नाही.


१५२ पानांचा अहवाल
जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या विशेष पथकाने गेल्या आठवड्यात हराळीच्या विद्यालयात दिवसभर चौकशी केली. यावेळी ३३ मुली व ३३ मुलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामधून मिळालेल्या माहितीवरच अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तब्बल १५२ पानी आहे. यामध्ये हजेरी पुस्तकापासून अनेक  विवरण जोडलेत. 


‘माणुसकीला काळिमा’
अहवालात संस्थेवर कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशी नेमून आणखी एकदा मुलीची चौकशी करण्याचीही बाब नमूद आहे. विशेष म्हणजे अहवालामध्ये हे प्रकरण म्हणजे ‘माणुसकीला काळिमा’ फासण्याचा प्रकार असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. 


आणखी प्रकरणे उलगडणार?
हराळी येथील प्रकरणाची महिला व बालविकास विभागानेही चौकशी केली आहे. यामध्ये पोलिसांना अहवाल देण्यात आला आहे. संस्थेत आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनी संयुक्त चौकशी करण्याची शिफारस या विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...