आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाई-गडबड व गतीच्या कामातील फरक ओळखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या चांगली वाढ होण्यासाठी योग्य संगोपन आवश्यक आहे. मुलाचे चांगले पालनपोषण झाल्यास तो तितकाच चांगला माणूस बनू शकेल. जसे एखाद्या बीपासून झाड होण्यासाठी सूर्यप्रकाश आणि पाणी दोहोंचीही आवश्यकता असते, तशीच मुलाच्या वाढीत आई आणि वडील असा दोघांचाही वाटा महत्त्वाचा आहे. पाण्याची टंचाई सूर्यप्रकाश भरून काढू शकणार नाही किंवा जास्त पाणी मिळाले तर मुळे सडून झाड मरू शकते. त्याचप्रमाणे फक्त आईच्या लाडाने किंवा वडिलांच्या धाकाने मुलांची योग्य वाढ होत नाही.
आज अनुपम खेर आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आई-वडिलांना देतात. ते नेहमीच बालपणीच्या आठवणी सांगतात. ते सात वर्षांचे असताना घडलेली एक सुंदर घटना त्यांनी सांगितली. ते म्हणाले की, एकेदिवशी शाळेतून परतल्यावर आपण आता कधीच शाळेत जाणार नाही, असा निर्णय त्यांनी आपल्या आईला सांगितला. त्यांचे वडील शिमल्यात सरकारी नोकरीत लिपिक पदावर होते. ते सायंकाळी घरी आले तेव्हा आईने त्यांना ही गोष्ट सांगितली. वडिलांनी या निर्णयाचे कारण विचारले. अनुपम यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांना फक्त मित्रच चिडवत असत. मात्र, आज शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनीही त्यांचा अपमान केला आणि म्हणाले की, स्पर्धेत तू एकटा धावलास तरी तुझा दुसरा क्रमांक येईल.
वडिलांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की, तुला मुले त्रास कसा देतात हे अभिनय करून दाखव. त्यावर अनुपम यांनी एक छोटासा एकपात्री प्रयोग करून दाखवला. त्यांचा हा प्रयोग आई-वडिलांना खूपच आवडला आणि त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
दुसºया दिवशी अनुपम स्वत:च उठले आणि त्यांनी शाळेत जाण्याची तयारी केली. त्यांचे मित्र त्यांना त्रास देत तेव्हा त्यांचे हावभाव आणि बोलण्याची शैली ते बारकाईने पाहून लक्षात ठेवीत. कारण घरी जाऊन वडिलांसमोर आणखी चांगला अभिनय करून दाखवावा, असे त्यांना वाटे. हळूहळू ते शाळेत मिमिक्री आणि अभिनयासाठी ओळखले जाऊ लागले आणि त्यांनी नट होण्याचा निर्णय घेतला.
अनुपम यांनी शाळेत जावे म्हणून पालक रागावले असते तर कदाचित ते कधीच शाळेत गेले नसते; पण दोघांनीही घाई न करता त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. त्यामुळे अनुपम एक चांगले नट होऊ शकले. आयुष्यात प्रगती करण्यासाठी गडबड आणि वेग यातील फरक समजावून घेतला पाहिजे हेच यातून शिकण्यासारखे आहे.