Sangli flood / पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत विधानसभा निवडणुका नकाे; स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी

शंभर टक्के कर्जमाफीच्या मागणीसाठी ३१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
 

प्रतिनिधी

Aug 23,2019 08:06:00 AM IST

सांगली - पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केली. या मागणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापूर निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती दिली. म्हणूनच महापूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत द्यावी. भविष्यात महापूर येऊच नयेत यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपवण्यात यावी. महापूर दहा दिवस होता. त्यामुळे ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पाण्यात राहिल्यामुळे त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना वीस हजारांची मदत करून त्यांचे नुकसान भरून येणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

शंभर टक्के कर्जमाफी द्या
घराची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.

X
COMMENT