आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतने छोटे को काम पर नहीं रखते, इन्हे सिखाओ, काबिल बनाओ..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - अरे, इतने छोटे काे काम पर कैसे रख रहे हो, इने कुछ सिखाओ, पढाओ। हम इतने छोटे काे काम पर नहीं रख सखते। बालकामगारांना कामावर ठेवण्याऐवजी कामगारांच्या पालकांना सकारात्मक विचार देणारे हे उद्गार आहेत बेकरी मालकाचे. किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक किंवा गॅरेज चालकही बालकामगारांना कामावर ठेवण्याच्या विरोधात आहेत. बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’टीमने मंगळवारी(दि.१३) उस्मानाबाद शहरातील व्यावसायिकांची बालकामगारांबद्दल मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बालकामगारांबाबत व्यापारी कमालीचे जागरूक असल्याचे अधोरेखित झाले.


भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी देशभर बालदिन साजरा करण्यात येतो. या दिवशी बालकांबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या समाजात बालकांबद्दल खरेच आस्था आहे का, बालकांना अजूनही अवजड कामांमध्ये जुंपून शिक्षणपासून वंचित ठेवले जाते, याची पडताळणी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने विविध भागात व्यापाऱ्यांची मानसिकता जाणून घेतली. यामध्ये व्यापारी, उद्योजक बालकामगारांबद्दल अत्यंत जागरूक असल्याचे समोर आले. किराणा दुकानदार, बेकरी, गॅरेज, हॉटेल, फ्रुट स्टॉल, अशा अनेक ठिकाणी बालकाला पाठवून कामावर घेतले जाते का, याचा अंदाज घेतला. व्यापाऱ्यांनी संबंधित लहान मुलाला कामावर न घेता उलट शिकण्याचा सल्ला दिला. ही मानसिकता सकारात्मक असून, त्यामुळेच बालकामगारांवर कामाचं ओझं लादण्याचा प्रकार शहरात आढळून येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत बाल कामगार आढळत असले तरी सुट्यांच्या काळात हलकी कामे करून ही मुले कुटंुबाला हातभार लावतात.

 

कार्यालयाला कारवायांची गरजही पडली नाही कारण बालकामगार आढळत नाहीत
२०१५ पासून जिल्ह्यात एकही बालकामगार आढळून आलेला नाही, असे जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने सांगण्यात अाले. शिवाय यासंबंधीची कुठलीही तक्रार कार्यालयाला प्राप्त झालेली नसल्याचे प्रभारी जिल्हा कामगार अधिकारी अजय काशिद यांनी सांगितले.

 

काय सांगतो कायदा

१४ वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, हे बाल कामगार अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषतः १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे. 

 

मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानल्या गेलेल्या उद्योगात मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. पूर्वपरवानगीने कामावर ठेवल्यास कारखान्यांवर अधिनियमाद्वारे नियंत्रण ठेवले जाते. 

 

दोषींवर कडक दंडात्मक तसेच तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून १ वर्षापर्यंत तुरुंगवास, त्यासोबत १० हजार ते २० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. 

 

हे करण्यामागे आमचा उद्देश काय होता?
कुठल्याही प्रकारे बालकांना कामावर ठेवले जाऊ नये, बालवयात अवजड कामे करून घेतली जाऊ नयेत, असा सरकारी नियम आहे. याबद्दल समाजात जागृती आहे का, हे शोधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने पडताळणी केली. पाठविलेल्या बालकाला कामावर ठेवण्याचा किंवा दुकानदारांना दोषी ठरविण्याचा हेतू नव्हता.

 

बातम्या आणखी आहेत...