आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या शपथविधीपर्यंत माध्यमांशी बोलू नका; उद्धव यांचे नेत्यांना आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना नेते, नवनिर्वाचित खासदार आणि राज्यातील शिवसेना मंत्र्यांची बैठक मातोश्री येथे बोलावली होती. मात्र बैठकीनंतर काही नेते माध्यमांना बातम्या देत असल्याने माहिती बाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा शपथविधी होईपर्यंत कोणतीच माहिती माध्यमांना देऊ नका, असे आदेश उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या एकाही नेत्याने बैठकीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 


३० मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान,  सोमवारी दुपारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ही भेट संभावित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती, असे म्हटले जात आहे. मात्र भाजपकडून त्यास दुजोरा मिळाला नाही. उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना नेते, लोकसभेतील विजयी आणि पराभूत उमेदवार, पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, मनोहर जोशी, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, रामदास कदम, संजय राऊत, अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. 


आदित्य ठाकरेंना निवडणूक रिंगणात उतरण्याची गळ : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी युवा सेनेचे सचिव व आदित्य यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवरून केली आहे. “हीच वेळ आहे.. हीच संधी आहे. लक्ष्य - विधानसभा २०१९!! महाराष्ट्र वाट पाहतोय,’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.  ठाकरे कुटुंबीयांतून आजपर्यंत कोणीही निवडणूक लढवलेली नाही, परंतु या मागणीमुळे आता निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे. 

 

केंद्र आणि राज्यातील मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालांचा विभागवार आढावा घेण्यात आला तसेच आगामी विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी कशी असावी यावर चर्चा झाली. संभाव्य राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील मंत्रिपदाबाबत काही चर्चा झाली का, असे शिवसेनेच्या एका नेत्याला विचारले असता त्याने याबाबत कसलीही चर्चा झाली नसून उद्धव ठाकरे स्वतःच याबाबत योग्य वेळी माहिती देतील असे सांगितले आणि आणखी माहिती देण्यास नकार दिला.