आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फडणवीसांचा भाजप नको, भाजपच्या नाराज नेत्यांचा सूर, पंकजा कोअर टीममधून बाहेर,'हा पक्ष माझ्या बापाचा, मी सोडणार नाही' : पंकजा मुंडे

8 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • खडसेंनी डागली फडणवीस यांच्या कार्यशैलीवर तोफ
  • चंद्रकांत पाटलांसमोर नाराजांनी मांडली व्यथा
  • गोपीनाथरावांची आठवण आली की रडावंसं वाटतं...

​​​​​बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे परळीत गुरुवारी मेळावा घेण्यात आला. यात पंकजा मुंडेंसह नाराज नेत्यांची भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे टीका केली. पक्षात लोकशाही उरली नसल्याचे सांगत पंकजांनी भाजपच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात पंकजांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांतील अप्रत्यक्षपणे बहुतांश टीका ही फडणवीस यांच्यावरच होती. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही थेट फडणवीसांवर टीका केली. मी ज्याला मोठे केले त्याने माझ्याशी असे वागायला नको होते, असे ते म्हणाले. कुणी पक्ष सोडून जा म्हणत असेल तर त्याला तुम्हीच पक्ष सोडा, असे रोखठोक उत्तर देण्याचा सल्ला चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच दिल्याने भाजपला विरोध नाही तर फडणवीसांचा भाजप नको असा सूर मेळाव्यात दिसून आला.


मेळाव्यात पंकजा नेमकी काय घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभीपासूनच धुसफूस जाणवत होती. पंकजांनी आधी आपले भाषण करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र इतर नेत्यांनी माईकचा ताबा घेतल्याने वेळोवेळी पंकजांनाच कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी माईक हातात घ्यावा लागत होता.

व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, रासपचे महादेव जानकर, माजी मंत्री प्रकाश मेहता, आ. हरिभाऊ बागडे, आ. बबनराव लोणीकर, माजी आ. पाशा पटेल यांच्यासह मुंडे समर्थक आठ ते नऊ आमदारांची उपस्थिती होती.

तुम्ही का पक्ष सोडताय, त्यांना सांगा पक्ष माझाय... 

चूका माणसाने केल्यात. त्याचा राग पक्षावर काढू नका. कुणी तुम्हाला पक्षातून जा असे म्हणत असेल तर त्याला सांगा पक्ष माझाय. तू पक्षातून जा. असा सल्ला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे व पंकजा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही नेत्यांच्या मनात काय चालले आहे याची आपल्याला कल्पना आहे. बोलू नका असे मी म्हणणार नाही.पण बोलताना जरा जपून बोला असे मी नक्कीच सांगेन, असे पाटील म्हणाले. 

पक्षात अनेकांचा जीव गुदमरत आहे. ज्यांनी पक्षाला मोठं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यांंना चुकीची वागणूक दिली जातेय. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ, असे म्हटले जायचे. गोपीनाथ मुंडेंची आठवण आली की रडावंसं वाटतं, असे सांगतानाच खडसे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. मला विचारून फडणवीसांना पक्षाध्यक्ष करण्यात आले होते. आता त्यांनी माझ्याशी असे वागायला नको होते. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे. परंतु, आता वेळ नाही. योग्य वेळी मी सगळे बोलेन, असा इशारा त्यांनी दिला. मंत्री असताना गोपीनाथ मुंडेंच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी दिलेल्या जागेत वीटही उभी करता आली नाही. परंतु, गुपचूप शपथविधीच्या नंतर २५ नोव्हेंबर रोजी कार्यारंभ आदेश दिले गेले. मला हे माहिती नव्हते. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो, त्यांना विषय सांगताच त्यांनी लागेल तितका निधी देऊ, असे सांगितल्याचे खडसे म्हणाले.

'गोपीनाथ मुंडेंनी मूठभरांचा असलेला पक्ष जनसामान्यांचा केला. आता पुन्हा जनसामान्यांचा हा पक्ष मूठभरांचा करण्याचा प्रयत्न होत आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पदाने कुणी मोठं होत नाही. पक्ष कुणाच्याही मालकीचा नसतो. मी पक्ष सोडणार असल्याचे पसरवले जातेय. पण मी पक्ष सोडणार नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे. पक्षाला मला सोडायचे असेल तर निर्णय घ्यावा. मला जुना पक्ष हवा असून आजच्या परिस्थितीत पक्षानेच मूळ गाभा लक्षात घेऊन आत्मचिंतन करावे,' असे पंकजा म्हणाल्या.

'सुखदा'पुन्हा गजबजणार; प्रजासत्ताकदिनी उद्घाटन : गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईत वरळी भागात सुखदा अपार्टमेंटमध्ये संपर्क कार्यालय होते. मुंडे यांच्या निधनानंतर हे कार्यालय बंद हाेते. आता २६ जानेवारी रोजी पुन्हा हे कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा पंकजांनी केली. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न बिकट बनल्याने २७ तारखेला औरंगाबादेत सिंचनप्रश्नी उपोषण करणार असल्याची घोषणाही पंकजांनी केली.
 

0