आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण स्वत:ला असे कठीण प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवू?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुण चौहान

टीव्हीवरील चर्चा तुमच्या ड्रॉइंग रूममधील जागा व्यापू लागली, चर्चांचा प्रसाद गल्लोगल्ली, चौकाचौकांत सकाळ-संध्याकाळ वाटला जावू लागला, की राजकारणाचा बाण खोलवर रुतलाय, हे ओळखून घ्यायचं. चर्चांच्या या फेऱ्यांतून ज्या विचारांची प्राणप्रतिष्ठा होत आहे, त्यांचा वृक्ष आपल्या पिढ्यांना सावली देईल का, हेही ओळखणे महत्वाचे आहे. विषय नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (सीएए) उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा आहे.

हिंसा पसरवणाऱ्यांंचा कठोर बंदोबस्त केला पाहिजे. पण, गर्दी आणि समुदाय यांच्यातील भेद संपवण्याचा प्रयत्नही हाणून पाडला पाहिजे. सीएए प्रकरणात निदर्शकांच्या गर्दीत समाजकंटक घुसले असतील, तर असे अन्य प्रकरणांतही झाले आहे. त्यावेळीही पोलिसांनी कारवाई केली. समाजाने उपद्रवाला त्या समुदायांचे व्यक्तित्व मानले नाही. पण, सीएए प्रकरणात कपडे, नाव, तर कधी धार्मिक ओळखीच्या आधारे तशी धारणा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होेतो आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात कट्टरतेच्या दृश्यांवरुन वातावरण तापणे स्वाभाविक, पण बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृत भाषेचा गौरव, फिरोजच्या विरोधाबाबत आमची प्रतिक्रिया सौम्य का? तिथे तिरस्कार आणि इथे फक्त राग?

तथापि, नवा कायद्याचा विरोध, हिंसा आणि पक्ष- विरोधी पक्षांच्या भूमिकेशी जोडलेले असे अनेक पैलू आहेत. स्वत:ला हा प्रश्न विचारुन बघा, की दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियाच्या कँटीनमध्ये घुसून मुलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचा चेहरा पाहून आम्हाला आनंद का झाला? बचावासाठी टाहो फोडणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील भीती पाहून आम्हाला पाझर का फुटला नाही? हिंसाचारात ही मुले होती की कुणी बाहेरची, हे जाणून न घेताच निष्कर्ष काढण्याची घाई का होती? आपण आपल्या मुलांच्या कॉलेजांत पोलिसांनी असा धूडगूस घातल्यास त्याचे समर्थन करु? संस्थेच्या नावात जामिया असल्याने तर या मारहाणीला योग्य ठरवले जात नाही ना? परपीडेत सुख मानण्याची वृत्ती आपल्याला भेदभाव करणारा बनवतेच; शिवाय आपल्या संवेदनांसाठीही ती हळूहळू भिनणारे विष ठरु शकते. स्वत:ला असे कठीण प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली नाही, तर आपण अशा अंधाऱ्या गुहेत निघालो आहोत, जिथे अविश्वास व संशय आपल्याला जगणं हैराण करेल. तार्किकता, विवेक व परस्परांना समजून घेण्याचा,असहमतीच्या सन्मानाचा भाव मरुन गेला, तर पुढे जावून आपण शेजारी आणि आपल्या परिवाराच्या बाबतही क्रूर होऊ. त्यामुळे सीएए आणि त्यावरुन सुरू असलेल्या गदारोळात सभ्य समाज म्हणून ही चिंता केली पाहिजे, की परस्परविश्वास आणि सन्मानाच्या ज्या पायावर आपण उभे आहोत, तो कोणत्याही कोपऱ्यातून कमकुवत होता कामा नये.

अरुण चौहान, संपादक, नॅशनल न्यूजरूम
 

बातम्या आणखी आहेत...