Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Doctor Rana's bills include 25 lakhs worth bills of sonography 

डॉ. राणाने सादर केलेल्या बिलांत 25 लाखांची सोनोग्राफीचीही बिले 

रवी गाडेकर | Update - Feb 13, 2019, 10:06 AM IST

बनवेगिरीला चाप संपूर्ण बिलांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश 

 • Doctor Rana's bills include 25 lakhs worth bills of sonography 

  औरंगाबाद- शासनाच्या ईएसआयसी हॉस्पिटलशी बनावट करार करून कामगारांवर वर्षभर सशुल्क उपचार करत ७२ लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या डॉ. सूरज राणाची बनवेगिरी दिव्य मराठी'ने समोर आणल्यानंतर शासनाने त्याची सर्वच बिले थांबवली. या प्राप्त बिलांमध्ये सुमारे २५ लाख रुपयांची बिले ही गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसह उपचारांचीही आहेत. या संपूर्ण बिलांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई ईएसआयसी आयुक्तांनी औरंगाबादच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. ही माहिती प्राप्त होताच यांची संपूर्ण चौकशी मनपा आरोग्य विभागाची समिती करणार आहे.

  डॉ. सुरेश राणा याचे वाळूज परिसरात रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर संजीवनी हॉस्पिटल २००५ पासून कार्यरत होते. ईएसआयसीच्या वैद्यकीय अधीक्षक व संचालकाशी संगनमत करून अनधिकृत करार करत २०१०-११ साली डॉ. राणाने कामगारांवर मोफत उपचार न करता सशुल्क उपचार करत ७२ लाखांवर डल्ला मारला. तक्रार झाल्यानंतर हे पैसे मिळत नसल्याने राणाने आपले राजकीय वजनही वापरले. सुरुवातीला मार्च २०१८ मध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार व नंतर स्थानिक आमदार संजय शिरसाठ यांच्यामार्फत ८ जून २०१८ रोजी थेट आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यामार्फत थकीत बिल मिळवण्याचे प्रयत्न केले.

  गेल्या पाच वर्षांपासून राणाने चालवलेल्या गोरखधंद्याचा दिव्य मराठी' पर्दाफाश केल्यानंतर मुंबई ईएसआयसी आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ७३ लाखांच्या बिलात २५ लाखापर्यंतचे उपचार हे गरोदर महिलांचे केल्याचे समोर आले आहे. ज्या गरोदर महिलांचे उपचार केले त्यांच्या संपूर्ण बिलाचे डिटेल्स आणि यादी तत्काळ सादर करण्याचे आदेश मुंबई ईएसआयसी आयुक्त कार्यालयाने औरंगाबादच्या ईएसआयसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोसलेंना दिले आहेत.

  यादी येताच मनपाची आरोग्य समिती करणार चौकशी
  राणाने ज्या गरोदर महिलांची सोनोग्राफी व उपचार केले याची यादी आल्यानंतर मनपाची विशेष समिती या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. यासाठी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असून राणाने या चौकशीतही राणाने केलेल्या अनधिकृत सोनोग्राफीचा पर्दाफाश होऊ शकतो.

  बिलांच्या चौकशीचे आदेश
  डॉ. राणाच्या रुग्णालयाची व बिलांची माहिती कार्यालयाला प्राप्त आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश स्थानिक कार्यालयाला दिले आहेत. लवकरच वस्तुस्थिती समोर येईल. - डॉ. एस. के. ढवळे, सहसंचालक, ईएसआयसी, मुंबई

  संकलन सुरू आहे
  कार्यालयाला प्राप्त झालेल्या आदेशानंतर आम्ही माहितीचे संकलन सुरू केले आहे. प्राप्त माहिती सादर केली जाईल. शिवाय मनपाला चौकशी कामी लागणारे दस्तावेज दिले जातील. - डॉ. विवेक भोसले, ईएसआयसी, वैद्यकीय अधीक्षक

  घरोघरी जाऊन चौकशी
  संजीवनी हॉस्पिटलध्ये ज्या महिलांची सोनोग्राफी झाली आहे अशांच्या घरोघरी जाऊन चौकशी केली जाईल. यातून निर्माण झालेल्या शंकेचे निराकरण होईल. - डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा

Trending